19 October 2019

News Flash

तेजी-मंदी हिंदोळयांचा प्रत्यय

गेल्या वर्षभराचा तेजी-मंदी चक्राचा आढावा घेता प्रत्येक महत्वाच्या वळणबिंदूवर गुंतवणूकदारांना या स्तंभातून सावध केले गेले होते.

|| आशीष अरविंद ठाकूर

गेल्या वर्षभराचा तेजी-मंदी चक्राचा आढावा घेता प्रत्येक महत्वाच्या वळणबिंदूवर गुंतवणूकदारांना या स्तंभातून सावध केले गेले होते. याचा प्रत्यय त्या त्या वेळी लिहिलेल्या लेखांच्या शीर्षकावरून जरी नजर फिरवली तरी येईल. २९ जानेवारीच्या निर्देशांकांच्या उच्चांकी मुसंडीची चाहूल १५ जानेवारीच्या लेखातील शीर्षकातून दिली गेली होती. ते शीर्षक होते.. ‘निर्देशांकाची लक्ष्यपूर्ती आणी त्यानंतरचे जोखीम-नफा गुणोत्तर’ या लेखात आपण उच्चांकासमीप आहोत हे पटविण्यासाठी चतुरस्त्र कवयित्री शांताताई शेळके यांच्या वाक्याचा आधार घेतला गेला –  ‘डोक्यात असते ते काव्य आणि कागदावर उतरते ती कलाकुसर’. त्या प्रमाणे डोक्यातील निफ्टीवरील उच्चांकाचे १०,८०० ते ११,००० चे टप्पे हळूहळू प्रत्यक्षात येत आहेत तर कागदावरील कलाकुसर म्हणजे गुंतवणूकदारांचा कागदोपत्री नफा प्रत्यक्षात येण्यासाठी समभाग विकून फायदा पदरात पाडून घ्यावा, असेही त्या लेखातून सुचविले गेले. बरोबर २९ जानेवारीला सेन्सेक्स ३६,४४३ व निफ्टीवर ११,१७१ चा उच्चांक प्रत्यक्षात नोंदवला गेला.

त्या नंतर बाजारात जो घातक उतार आला त्याचे वर्णन ‘भय इथले संपत नाही’ असे ५ मार्चच्या लेखाचे समर्पक शीर्षक होते. त्या लेखात बाजार नीचांकासमीप आहे अस सुचवलेले होते, त्या प्रमाणे २३ मार्चला निर्देशांकानी ३२,४८३ / ९९५१ चा नीचांक मारला.

पुढे २८ ऑगस्टच्या ऐतिहासिक उच्चांकाची जाणीव १३ ऑगस्टच्या लेखातील शीर्षकावरून येईल – ‘तेजीचा फुगा की शाश्वत तेजी’. या लेखातील वाक्य – ‘‘या महिन्याअखेरपर्यंत निफ्टीवर ११,६००-११,८०० चे स्तर पण येतील. पण हे मोहाचे क्षण ‘लबाडा घरचे आवतण हे जेवल्याखेरीज खरे नाही’ अशा स्वरूपाचे असतील, असा हा मोह टाळून नफ्यात असलेल्या समभागांची विक्री करुन नफा गाठीला बांधून घेणे श्रेयस्कर!’’

त्या नंतर बाजारात जो घातक उतार आला त्यात अवघ्या दोन महिन्यात सेन्सेक्सवर ५,६०० व निफ्टीवर १,७५० अंशाची घसरण झाली. या घसरणीत निफ्टी निर्देशांक १०,०००चा स्तर आज तोडेल की उद्या अशा परिस्थितीत वाचकांना धीर देण्यासाठी ‘बाजारावर भरवसा नाय काय?’ या लेखातून निफ्टी निर्देशांक १०,००० चा स्तर राखेल असे सांगितले गेले. तसा तो राखत बाजारात सुधारणा सुरू झाली व ती आजतागायत चालू आहे.

तेजी – मंदी चक्राच्या वार्षिक आढाव्यानंतर आपण ऑक्टोबर ते डिसेंबर या त्रमासिकाच्या कामगिरीकडे वळूया (खालील तक्ता पाहावा).

यात ए.बी.फॅशन, केसोराम इंडस्ट्रीज हे समभाग हे लक्ष्यासमीप होते, तर कोचीन शिपयार्ड, आयजीएल, महिंद्रा सीआयई, ग्रॅन्युअल्स इंडिया, वॉटरबेस इंडिया, ग्रीव्हज कॉटन,सीजी पॉवर हे समभाग अजूनही सामान्य मार्गक्रमण पट्टयात (बँण्डमध्येच) आहेत, तरी या समभागांबाबत त्या त्या वेळेल्या सुचविलेल्या लेखातील इच्छित लक्ष्य व ‘स्टॉप लॉस’ संकल्पनेनुसार निर्णय घ्यावेत.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

First Published on December 31, 2018 12:04 am

Web Title: bse nse nifty sensex 86