19 October 2019

News Flash

बाजारातला त्रिवेणी संगम

जानेवारी महिना हा भांडवली बाजारासाठी बहुतांश वेळला नाटय़पूर्ण घडामोडींचा ठरला आहे.

|| आशीष ठाकूर

उत्तरेत अलाहाबादला गंगा,यमुना,सरस्वती या तीन पवित्र नद्यांच्या संगमाला ‘त्रिवेणी संगम’ म्हणतात त्याचप्रमाणे जानेवारी महिन्याला केंद्रबिंदू ठेवून भांडवली बाजारातदेखील त्रिवेणी संगम होत आहे. अशा या महत्वाच्या जानेवारी महिन्याच्या वळणबिंदू संदर्भात जाणून घेऊ.

जानेवारी महिना हा भांडवली बाजारासाठी बहुतांश वेळला नाटय़पूर्ण घडामोडींचा ठरला आहे. या वर्षीची तीन प्रमुख कारणे खालीलप्रमाणे.

१) तांत्रिक विश्लेषणातील ‘फेबुनासी कालमापन’ पध्दत (फेबुनासी टाईम सायकल) यातील ७ ते ११ जानेवारी हा महत्वपूर्ण कालावधी.

२) इतिहासात डोकावून पाहता निर्देशांकाचा उच्चांक हा बहुतांश वेळेला जानेवारी महिन्यांत होतो.

३) रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणानंतर निर्देशांक उच्चांकाला गवसणी घालतो.

आता आपण ‘फेबुनासी कालमापन’ पध्दत विस्तृतपणे जाणून घेऊ.

बाजाराच्या कल धारणेच्या दृष्टीने (‘ट्रेंड’च्या दृष्टीने ) ७ ते ११ जानेवारी हा महत्वपूर्ण कालावधी आहे. आता वाचकांच्या मनात प्रश्न येऊ शकतो की, आर्थिक विषयाच्या लेखात ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन या तारखा दिल्या आहेत की काय? अतिशयोक्ती करायची म्हटलं तर कुडमुडया ज्योतिषाच्या पिंजऱ्यातल्या पोपटांनी या तारखा काढून दिल्या नाहीत ना? तर तसे नव्हे.

इटलीतील भौतिकशास्त्र संशोधक फेबुनासी यांनी ही कालमापन पध्दत विकसित केली आहे त्याचा आधार घेऊन वरील तारखा काढल्या आहेत. या तारखा संदिग्ध स्वरूपात असतात. त्याचे विश्लेषण करणे ही एक कला आहे.

आता ७ ते ११ जानेवारी तारखांना तीन पर्याय आहेत.

१) निर्देशांक या दिवसात आपला उच्चांक नोंदवतो.

२) निर्देशांक या दिवसात आपला नीचांक नोंदवतो.

३)  निर्देशांक आपली ‘नरो वा कुंजरोवा’ भूमिका संपवून तेजी अथवा मंदीचे स्पष्ट संकेत देतो.

वरील तीन पर्यायांची सांगड घालण्याअगोदर आपण निर्देशांकाचा शुक्रवारचा बंद भाव ध्यानात घेऊ.

सेन्सेक्स: ३५,६९५.१०

निफ्टी: १०,७२७.४०

आता आपण शक्यता क्रमांक एककडे वळूया:  सेन्सेक्स ३५,६९५ व निफ्टी १०,७२७ वरून ७ ते ११ जानेवारीमध्ये आपला उच्चांक नोंदवतील आणि ते सेन्सेक्सवर ३६,००० ते ३६,६००, तर निफ्टीवर १०,८०० ते ११,००० असे असतील.

शक्यता दोन – निर्देशांक या दिवसात आपला नीचांक साधतील, म्हणजे सेन्सेक्सवर ३५,३०० आणि निफ्टीवर १०,६०० ते १०,४५० असा असेल.

शक्यता तीन – निर्देशांक आपली ‘नरो वा कुंजरोवा’ भूमिका संपवेल.

येथे आपण शक्यता १,२,३ चा एकत्र विचार केल्यास या आठवडय़ात सेन्सेक्सवर ३६,००० ते ३६,६०० / निफ्टीवर १०,८०० ते ११,००० चा उच्चांक गाठून एक संक्षिप्त घसरण ही ३५,३०० ते ३४,९५० आणि निफ्टीवर १०,६०० ते १०,४५० येऊन आता अशक्य वाटणारी तेजी अवतरेल. तिचे वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३७,१०० ते ३८,००० आणि निफ्टीवर ११,२०० ते ११,५०० असेल आणि जर हे प्रत्यक्षात आले तर ते वाचकांसाठीच नववर्षांचे अभिष्टचिंतन ठरेल. (क्रमश:)

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

First Published on January 7, 2019 12:08 am

Web Title: bse nse nifty sensex 87