|| आशीष ठाकूर

गेल्या लेखातील वाक्य होते – ‘येणाऱ्या दिवसात सेन्सेक्सवर ३६,३०० व निफ्टीवर १०,९०० चा स्तर केंद्रबिंदू ठेवून या स्तरावर निर्देशांक सातत्य राखून टिकल्यास निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३६,६०० ते ३७,००० तर निफ्टीवर ११,००० ते ११,२०० असेल. अन्यथा सेन्सेक्स ३६,३०० व निफ्टी १०,९०० स्तराखाली आल्यास निर्देशांकावर एक संक्षिप्त घसरण अपेक्षित असून तिचे प्रथम खालचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३५,७०० व निफ्टीवर १०,७०० असेल.’ हे विधान काळाच्या कसोटीवर तपासता निर्देशांकांनी प्रथम आपले खालचे लक्ष्य सोमवार, १४ जानेवारीला सेन्सेक्सवर ३५,६९१ व निफ्टीवर १०,६९२ साध्य करून नंतर साप्ताहिक बंद सेन्सेक्सवर ३६,३०० व निफ्टीवर १०,९०० स्तरावर दिला.

या पार्श्वभूमी वर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळूया.

शुक्रवारचे बंद भाव:-

  • सेन्सेक्स : ३६,३८६.६१
  • निफ्टी : १०,९०७.००

गेल्या पंधरवडय़ातील निर्देशांकाच्या शिस्तबद्ध, लयबद्ध हालचालीसाठी जिम्नॅस्टिकमधील एअरोबिक्स (दमसांस) खेळाची आठवण होते. आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकावर बरोबर २०० अंशांचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) निर्माण होत आहे. त्यात ही लयबद्ध हालचाल चालू आहे. यात निफ्टी निर्देशांकावर १०,९०० चा स्तर केंद्रबिंदू ठेवून यात २०० अंशांची वाढ ही ११,१०० चे वरचे लक्ष्य सूचित करते. तर १०,९०० मधून २०० अंशांची घसरण ही १०,७०० च्या भरभक्कम आधाराची आठवण करून देते. शुक्रवारचा निर्देशांकाचा बंद भाव बघता लवकरच निर्देशांक आपले वरचे लक्ष्य सेन्सेक्सवर ३६,६०० ते ३७,००० आणि निफ्टीवर ११,१०० ते ११,२०० साध्य करेल अशी आशा करूया.

आता आपण बाजारातल्या त्रिवेणी संगमावरील तिसऱ्या गृहीतकाकडे वळूया.

  • रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणानंतर निर्देशांक उच्चांकाला गवसणी घालतो आणि त्यानंतर घातक उतार येतात. हे खालील उदाहरणांवरून स्पष्ट होईल.
  • ५ मार्च २०१५ ला रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणाच्या वेळेला निर्देशांकाचा उच्चांक सेन्सेक्सवर ३०,०२४ व निफ्टीवर ९,१११ होता.
  • ४ मार्च २०१६ ला सेन्सेक्सवर २२,४९४ व निफ्टीवर ६,८२५ नीचांक नोंदविला गेला.
  • ४ ऑक्टोबर २०१६ ला पतधोरणाच्या वेळेला सेन्सेक्सवर उच्चांक २८,४०४ व निफ्टीवर ८,७८३ होता, तर २२ नोव्हेंबर २०१६ ला सेन्सेक्सवर २५,७६५ व निफ्टीवर ७,९३८ चा नीचांक स्थापित झाला.
  • २ ऑगस्ट २०१७ ला पतधोरणाच्या वेळेला सेन्सेक्सवर ३२,६८६ तर निफ्टीवर १०,१३७ उच्चांक होता, ११ ऑगस्टला सेन्सेक्सवर ३१,१२८ व निफ्टीवर ९,६८५ चा नीचांक होता.
  • ३ सप्टेंबर २०१८ ला रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणाच्या वेळेला सेन्सेक्सवर उच्चांक ३८,९३४ व निफ्टीवर ११,७५१ होता, तर २९ ऑक्टोबरला सेन्सेक्सवर ३३,३४१ व निफ्टीवर १०,००४ एवढी विक्रमी घसरण झाली.
  • आता ७ फेब्रुवारीला रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण जाहीर होत आहे, तसेच बहुतांश वेळेला उच्चांक हे जानेवारी- फेब्रुवारी महिन्यातच स्थापित होण्याचा इतिहास असल्याने या वेळेला हे दोन्ही महिने उत्कंठावर्धक असणार हे नि:संशय!

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.