25 April 2019

News Flash

बाजाराला अर्थसंकल्पाचे वेध..

अदिेशात जरी दुष्काळ, पाऊस कमी झाला असला तरी या अंतरिम अर्थसंकल्पात घोषणांचा धुवाधार पाऊस कोसळणारच!

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| आशीष ठाकूर

अदिेशात जरी दुष्काळ, पाऊस कमी झाला असला तरी या अंतरिम अर्थसंकल्पात घोषणांचा धुवाधार पाऊस कोसळणारच! कारण हे निवडणूक वर्ष आहे. या घोषणांच्या पावसातील चिंब, सुखद वातावरणात तरी सेन्सेक्स ३६,३०० व निफ्टी १०,९०० चा स्तर पार करून या स्तरावर सातत्याने टिकणार का, ते या लेखात जाणून घेऊ. तत्पूर्वी आपण निर्देशांकाचा साप्ताहिक बंद जाणून घेऊ या.

शुक्रवारचे बंद भाव:

  • सेन्सेक्स : ३६,०२५.५४
  • निफ्टी :  १०,७८०.५०

हा अंतरिम अर्थसंकल्प श्री. पीयूष गोयल सादर करत असल्याने, ते त्यांच्यातील सनदी लेखाकाराशी कितपत इमान राखतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. महसुली उत्पन्न व खर्चाची योग्य सांगड घालत वित्तीय तूट ही ३.३ टक्के अथवा खाली राखण्याची तारेवरची कसरत ते कसे पार पाडतात. तसेच अर्थसंकल्पात, व्यवहार्य आर्थिक, औद्योगिक धोरण सादर केली गेली, तर निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३६,८०० व निफ्टीवर ११,१०० आणि त्यानंतरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३७,५०० व निफ्टीवर ११,३०० असे असेल.

पण जर का निवडणूक वर्षांत आर्थिक शिस्त, आर्थिक काटकसर या दोन जुळ्या भावंडांचे पालकत्व हे आपले नसून ते येणाऱ्या नवीन सरकारचे आहे असे समजून वारेमाप, अवास्तव घोषणा केल्या (अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे अल्पकालीन सरकारी खर्चाची तरतूद ज्यात वारेमाप घोषणा, महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय अभिप्रेत नाहीत.) तर मात्र निर्देशांक आपला भरभक्कम आधार सेन्सेक्सवर ३५,७०० व निफ्टीवर १०,७०० तोडून मंदीच्या वातावरणात प्रवेश करेल. अशा समयी त्याचे खालचे लक्ष्य ही सेन्सेक्सवर ३३,३०० व निफ्टीवर १०,००० पर्यंतचे असेल.

गेल्या दोन लेखांत एक वाक्य सतत अधोरेखित केले गेले आहे. येणाऱ्या दिवसांत सेन्सेक्सवर ३६,३०० व निफ्टीवर १०,९०० चा स्तर हा केंद्रबिंदू ठेवून निर्देशांकाची वाटचाल असेल व आजही पंधरवडा उलटूनदेखील निर्देशांक त्याच स्तराभोवती घुटमळत आहे. असा हा काळाच्या कसोटीवर उतरलेला स्तर कसा वर्तविला गेला ते आज व पुढील लेखांमध्ये तांत्रिक विश्लेषणातील विविध प्रमेयांचा आधार घेत जाणून घेऊ ती प्रमेये-

  • प्रमेय १ : ‘कल निर्धारण रेषा’ (ट्रेंड लाइन)
  • प्रमेय २ : कल निर्धारण रेषा संकल्पनेच्या विस्ताराला/ आकृतिबंधाला त्रिकोण, या त्रिकोणांचे प्रमेय (ट्रँगल पॅटर्न) अशा या दोन प्रमेयांचा आधार घेऊ.

‘कल निर्धारण रेषा’ बाजाराचा तेजी अथवा मंदीचा कल ठरवते. जेव्हा दोन उच्चांकांचे अथवा नीचांकाचे बिंदू ध्यानात घेऊन ते जोडण्यासाठी जी रेषा आखली जाते त्या रेषेला ‘कल निर्धारण रेषा’ असे संबोधतात.

पुढील लेखात कल निर्धारण रेषेचा सकारात्मक वरचा छेद, त्रिकोण (ट्रँगल पॅटर्न) ही प्रमेये विस्ताराने जाणून घेऊ या.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

First Published on January 28, 2019 2:13 am

Web Title: bse nse nifty sensex 92