25 April 2019

News Flash

..मोतियाने द्यावे भरून

या पार्श्वभूमी वर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

|| आशीष ठाकूर

अगड जेजुरीचे आम्ही रहिवासी

देवाचा झेंडा वळखला दुरून

मल्हारवारी मोतियाने दय़ावी भरून

नाही तर देवा मी जातो दुरून

महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबारायाचं हे स्तुतिगीत, गेल्या आठवडय़ात जाहीर झालेल्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणाला या स्तुतिगीताची उपमा चपखल बसते. गड जेजुरीचे आम्ही रहिवासी.. अर्थात आपण सर्व जण अर्थक्षेत्रातील बीएसई व एनएसई गडाचे रहिवासी, शक्तिकांत दास हे व्याज दरकपातीचा झेंडा घेऊनच येणार हे सर्वानी ‘वळखलं होतं दुरूनच’ व गेल्या गुरुवारी व्याज दरकपातीची घोषणा झाल्यावर बाजारात तेजीने मोतियाने दिल्या भरून ओंजळी.

या पार्श्वभूमी वर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

  • सेन्सेक्स : ३६,५४६.४८
  • निफ्टी : १०,९४३.६०

आर्थिक क्षेत्रात अर्थसंकल्प, रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण यांना अनन्यसाधारण महत्त्व असते. जसे वारकरी संप्रदायात आषाढी, कार्तिकीच्या वाऱ्याना असतं तसं व या दोन घटना एकामागोमाग एक घडत असतील तर कपिलाषष्ठीचा योगच. यात निर्देशांकावर नाटय़मय चढ-उतार, घुसळण (वोलेटॅलिटी) गृहीतच असतात. जर का अर्थसंकल्प, रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणानंतर तेजी आली तर संभाव्य उच्चांक काय असेल, याची मानसिक, आर्थिक तयारी व्हावी म्हणून त्याचे उत्तर २१ जानेवारीच्या लेखात ‘बाजारातला त्रिवेणी संगम भाग-२’मध्येच दिले होते.

आपल्याकडे काळाच्या कसोटीवर उतरलेला निफ्टी निर्देशांकावरचा २०० अंशांचा सामान्य मार्गक्रमण पट्टा हे त्याचे उत्तर सांगितले होते. या पट्टय़ाचा उल्लेख आपण जिम्नॅस्टिकमधील एअरोबिक्स (दमसांस) खेळाच्या शिस्तबद्ध, लयबद्ध हालचालीशी केलेला. आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकावर बरोबर २०० अंशांचा सामान्य मार्गक्रमण पट्टा निर्माण होत आहे. त्यात ही लयबद्ध हालचाल चालू आहे, निफ्टी निर्देशांकावर १०,९००चा स्तर केंद्रबिंदू ठेवून यात २०० अंशांची वाढ ही ११,१००चे वरचे लक्ष्य सूचित करते जे रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणानंतर साध्य झाले, ज्याचा उल्लेख मोतियाने दयावे भरून असा केलेला आहे.

आता आपण उच्चांकासमीप आहोत हे अधोरेखित करण्यासाठी जानेवारीतील बाजारातला त्रिवेणी संगम भाग १ व २ या लेखांचा आधार घेऊ या.

त्या लेखात व्यक्त केलेले गृहीतक खालीलप्रमाणे –

१) इतिहासात डोकावून पाहता निर्देशांकाचा उच्चांक हा बहुतांश वेळेला जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात होतो.

२) रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणानंतर निर्देशांक उच्चांकाला गवसणी घालतो.

सुखद बातम्यांवर बाजार उच्चांकाला गवसणी घालतो. आताच्या घडीला अपेक्षित असलेल्या सर्व सुखद बातम्या प्रत्यक्षात येत आहेत. निर्देशांकांनी आपले पहिले लक्ष्य सेन्सेक्सवर ३७,००० व निफ्टीवर ११,१०० देखील साध्य केले आहे. आता दुसरे लक्ष्य सेन्सेक्सवर ३८,००० व निफ्टीवर ११,४०० ते ११,५००ची वाट बघण्यापेक्षा अत्यल्प मुदतीची धारणा असलेल्या गुंतवणूकदारांनी (गुंतवणूक अवधी तीन ते चार महिने) निर्देशांकाच्या प्रत्येक वाढीव टप्प्यावर नफारूपी विक्री करणे श्रेयस्कर.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

First Published on February 11, 2019 12:02 am

Web Title: bse nse nifty sensex 94