|| अजय वाळिंबे
एशियन ग्रॅनिटो इंडिया लि.
(बीएसई कोड – ५३२८८८)
शुक्रवारचा बंद भाव : रु. २४८
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक : रु.३१८/१०९
बाजार भांडवल : रु. ७६७ कोटी
वर्ष २००० मध्ये स्थापन झालेली एशियन ग्रॅनिटो आज भारतातील सर्वात मोठी सिरॅमिक कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीची अनेक उत्पादने जगभरातील ७८ हून अधिक देशांमध्ये निर्यात होत असून केवळ २० वर्षांच्या कालावधीत कंपनीची उत्पादन क्षमता ४० पटींनी वाढली आहे. कंपनीच्या विस्तृत उत्पादन श्रेणीत सिरॅमिक वॉल अँड फ्लोर टाइल, ग्लेझ्ड व्हिट्रिफाइड टाइल्स, पॉलिश व्हिट्रिफाइड टाइल्स, कम्पोझिट मार्बल आणि क्वार्ट्झ इ. विविध उत्पादनांचा समावेश असून एशियन ग्रॅनिटो आज भारतातील वेगाने वाढणारी कंपनी आहे.
एसएसीएमआय, इटलीच्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कंपनीने जागतिक स्तरावरील नावीन्यपूर्ण डिजिटल प्रिंटिंग तंत्रज्ञान बाजारात आणले असून अनेक आकर्षक उत्पादने कंपनीच्या पोर्टफोलिओत आहेत. गुजरातेत एशियन ग्रॅनिटोचे आठ अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प असून सध्या कंपनीची उत्पादन क्षमता ३० मिलियन स्क्वेअर मीटर आहे. कंपनी प्रामुख्याने सिरॅमिक्स, पॉलिश विट्रिफाइड, ग्लेझ्ड विट्रिफाइड आणि डबल चार्ज टाइल्स या चार टाइल्सचे उत्पादन करते. मार्बल आणि क्वार्ट्जच्या बाजारपेठेत कंपनीचा ३६% हिस्सा आहे. आपली उत्पादन श्रेणी भारतभरात सहज उपलब्ध होण्यासाठी कंपनीचे विस्तृत विपणन आणि वितरण नेटवर्क असून त्यामध्ये १,३५० हून अधिक डायरेक्ट डीलर्स आणि ६७०० टच पॉइंट्स आहेत. कंपनीच्या देशातील सर्व राज्यात ३०० हून अधिक एक्सक्लुझिव्ह डीलर्स शोरूम आहेत.
गेली दोन र्वष कंपनीचे आर्थिक निकाल तितकेसे चांगले नाहीत. मात्र कोविड कालावधीतही सप्टेंबरपाठोपाठ डिसेंबर २०२० साठी संपलेल्या तिमाहीतही कंपनीने समाधानकारक कामगिरी करून दाखवली आहे. यंदाच्या तिमाहीच्या उलाढालीत डिसेंबर २०१९च्या तुलनेत कंपनीने १३.४९ टक्के वाढ नोंदवून ती २८९.३६ कोटीवर नेली आहे तर नक्त नफ्यात तब्बल १३७.६३ टक्के वाढ होऊन तो २१.२२ कोटी रुपयांवर गेला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातही परवडणारी घरे तसेच गृहउद्योग क्षेत्राला करसवलत कायम असून घसरलेल्या व्याजदरांमुळे बांधकाम क्षेत्राला बरे दिवस आले आहेत. एशियन ग्रॅनिटोसारख्या कंपनीकडून म्हणूनच भरीव कामगिरीची अपेक्षा आहे. मध्यम कालीन गुंतवणुकीसाठी या ‘मायक्रो कॅप’चा जरूर विचार करावा.
भरणा झालेले भागभांडवल रु. ३०.९४ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ३४.०२
परदेशी गुंतवणूकदार —
बँक/ म्यु. फंड/ सरकार ३.५५
इतर/ जनता ६२.४३
संक्षिप्त विवरण
६ शेअर गट : मायक्रो कॅप
६ प्रवर्तक : कमलेश पटेल
६ व्यवसाय क्षेत्र : टाइल्स/ ग्रॅनाइट
६ पुस्तकी मूल्य : रु. १७४
६ दर्शनी मूल्य : रु. १०/-
६ लाभांश : ७%
शेअर शिफारसीचे निकष
- प्रति समभाग उत्पन्न : रु. १४.३८
- पी/ई गुणोत्तर : १७.४
- समग्र पी/ई गुणोत्तर : ६०.६
- डेट इक्विटी गुणोत्तर : ०.५९
- इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : २. ६३
- रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड : ११.८
- बीटा : ०.७
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 22, 2021 12:05 am