कॅम्स, एंजल ब्रोकिंग, केमकॉन गुंतवणूकदारांना आजमावणार!

वित्तीय सेवा क्षेत्रातील कॉंम्प्युटर एज मॅनेजमेंट सव्‍‌र्हिसेस (कॅम्स) आणि नामांकित दलाली पेढी एंजल ब्रोकिंग यांच्यासह विशेषीकृत रसायनांच्या क्षेत्रातील कॅमकॉन स्पेशालिटी अशा तीन कंपन्या येत्या आठवडय़ात प्रारंभिक समभाग विक्रीद्वारे (आयपीओ) गुंतवणूकदारांचा कौल आजमावणार आहेत. तीन कंपन्यांकडून एकत्रित रूपात सुमारे ३,१६३ कोटी रुपये उभे केले जाणार आहेत.

गुंतवणूकदारांना दुपटीहून अधिक लाभ सूचिबद्धतेलाच मिळवून देणाऱ्या हॅपीयस्ट माइंड्स टेक्नॉलॉजीज आणि रूट मोबाईल या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या भागविक्रींनी गुंतवणूकदारांकडून नुकताच दमदार प्रतिसाद मिळविला आहे. या पार्श्वभूमीवर या तीन कंपन्यांच्या भागविक्रींकडे आशेने पाहिले जात आहे.

गेली दोन दशके भारतीय वित्तीय क्षेत्रात कार्यरत कॅम्स ही आयुर्विमा कंपन्या व म्युच्युअल फंडांना तंत्रज्ञानावर आधारित निबंधक व हस्तांतरण (रजिस्ट्रार व ट्रान्स्फर एजंट) सेवा पुरविणारी ‘सेबी’ मान्यताप्राप्त सर्वात मोठी व कर्जमुक्त कंपनी आहे. तर एंजल ब्रोकिंग ही तंत्रज्ञानाधारीत २१.५ लाख खातेधारक असलेली देशातील चौथ्या क्रमांकाची दलाली पेढी आहे. करोनाकाळात गुंतवणूकदार खात्यांमध्ये दमदार १४८ टक्क्य़ांची वाढ अनुभवणाऱ्या या कंपनीकडून १३,२५४ कोटींच्या मालमत्तेचे व्यवस्थापन पाहिले जात आहे. तर औषधी उद्योगाकडून मागणी असलेल्या आयात-पर्यायी विशेष रसायनांच्या निर्मितीतील केमकॉन स्पेशालिटी ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. सध्याच्या साथरोगाच्या काळात चमकदार कामगिरी करणारे हे क्षेत्र आहे.

कॅम्स आणि केमकॉन स्पेशालिटीची भागविक्री सोमवार २१ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या दरम्यान असून, भागविक्रीसाठी त्यांनी अनुक्रमे १,२२९ रु. ते १,२३० रु. आणि ३३८ रु. ते ३४० रु. किंमत पट्टा निर्धारीत केला आहे. एजंल ब्रोकिंगची भागविक्री २२ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर या दरम्यान प्रत्येकी ३०५ रु. ते ३०६ रु. या किंमत पट्टय़ाने होणार आहे.