भांडवली नफ्यावरील कर आकारणी जाणून घ्या!

प्रवीण देशपांडे

मागील काही दिवसात शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे आणि बहुतेक समभागांच्या किमतीत विक्रमी वाढ होत आहे. समभाग विकून नफा नोंदवावा किंवा शेअर्स तसेच ठेवावेत असा विचार अनेकांच्या मनात येत आहे. समभाग गुंतवणूक दीर्घ मुदतीची असेल तर त्यावर होणारा भांडवली नफा प्रथम १ लाख रुपयांपर्यंत करमुक्त आहे आणि त्यावरील रकमेवर १० टक्के इतक्या सवलतीच्या दरात कर भरावा लागतो. याचा फायदा करदाता घेऊ शकतो आणि त्यानुसार समभागाची विक्री करण्याचा निर्णय घेऊ  शकतो.

प्रश्न : माझ्याकडे जून २०१९ मध्ये ४५,००० रुपयांना खरेदी केलेले सूचिबद्ध कंपन्यांचे समभाग आहेत. आता त्यांची किंमत २ लाख रुपये इतकी झाली आहे. या समभागाची विक्री केल्यास मला कर भरावा लागेल का? हा कर वाचविता येईल का?

’ सुषमा पाटणे

उत्तर : आपण समभागाची आता विक्री केल्यास आपल्याला होणारा भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा असेल. कारण त्याची खरेदी आपण १२ महिन्यांपूर्वी केली होती. या समभागाची खरेदी आणि विक्री शेअर बाजारामार्फत केल्यामुळे आपल्याला ‘कलम ११२ अ’नुसार सवलतीच्या दरात कर भरता येईल. या कलमानुसार महागाई निर्देशांकाचा फायदा मिळणार नाही. आपला एकूण भांडवली नफा १,५५,००० रुपये (२ लाख वजा ४५,००० रुपये) इतका होईल. प्रथम १ लाख रुपयांपर्यंतच्या नफ्यावर कर भरावा लागणार नाही आणि बाकी ५५,००० रुपयांवर १० टक्के दराने ५,५०० रुपये कर भरावा लागेल. हा कर वाचवायचा झाला तर, १ लाख रुपयांपर्यंतचा भांडवली नफा होईल एवढय़ाच समभागांची विक्री या वर्षी केली, तर काहीच कर भरावा लागणार नाही.

प्रश्न : कर्करोगावरील उपचारांसाठी केलेल्या खर्चाची वजावट प्राप्तिकर कायद्याच्या कोणत्या कलमानुसार मिळते आणि या वजावटीची मर्यादा किती आहे?

’ उदय पाटकर, मुंबई</strong>

उत्तर : स्वत:साठी किंवा अवलंबून असलेल्या व्यक्तीच्या काही ठरावीक रोगांच्या उपचारावर केलेल्या खर्चाची वजावट ‘कलम ८० डीडीबी’नुसार उत्पन्नातून घेता येते. या ठरावीक रोगांमध्ये कर्करोगाचा समावेश होत असल्यामुळे या कलमानुसार प्रत्यक्ष खर्चाच्या ४०,००० रुपयांपर्यंत वजावट घेता येते. ज्या व्यक्तीच्या उपचारासाठी खर्च केला आहे ती व्यक्ती ज्येष्ठ नागरिक असेल तर ही मर्यादा एक लाख रुपये इतकी आहे. करदात्याकडे जर विमा असेल तर विम्याकडून मिळालेली रक्कम वजा जाता बाकी वैद्यकीय खर्चाच्या रकमेची वजावट या कलमानुसार घेता येते.

प्रश्न :  माझे वय ७२ वर्षे आहे. मी सरकारी नोकरीतून निवृत्त झालो आहे. मला दरमहा २४,००० रुपये निवृत्तिवेतन मिळते. शिवाय मला दर वर्षी दीड लाख रुपयांचे व्याज मिळते. मला विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे का?

’ सुनील कुलकर्णी

उत्तर : आपले एकूण उत्पन्न कमाल करमुक्त मर्यादेपेक्षा (ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे ३ लाख रुपयांची मर्यादा) जास्त असल्यामुळे आपल्याला विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे. आपले एकूण उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी असल्यामुळे ‘कलम ८७ अ’नुसार करसवलत घेतल्यानंतर आपल्याला कर भरावा लागणार नाही.

नवीन करप्रणालीचा विकल्प ज्येष्ठ नागरिकांना फायदेशीर काय?

प्रश्न : आपण मागील लेखात नवीन करप्रणालीच्या विकल्पाची माहिती दिली होती ज्यामध्ये करदाता कोणत्याही वजावटी न घेता सवलतीच्या दरात कर भरू शकतो. या नवीन करप्रणालीचा विकल्प ज्येष्ठ नागरिकांना फायदेशीर आहे का?

’  विलास मोहिते

उत्तर : १ एप्रिल २०२० पासून नवीन करप्रणालीचा विकल्प करदात्याला निवडावयाचा आहे. हा विकल्प ज्येष्ठ नागरिकसुद्धा निवडू शकतो. परंतु हा विकल्प निवडल्यास ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या वाढीव कमाल करमुक्त उत्पन्नाचा (ज्येष्ठ नागरिकांसाठी ३ लाख आणि अतिज्येष्ठ नागरिकांसाठी ५ लाख रुपये) फायदा घेता येणार नाही. नवीन करप्रणालीनुसार ज्येष्ठ, अतिज्येष्ठ आणि सामान्य नागरिक हा फरक केलेला नाही. हा विकल्प निवडल्यास सर्वासाठी कमाल करमुक्त मर्यादा २,५०,००० रुपये इतकीच असेल, हे लक्षात घ्यावे. ज्येष्ठ नागरिक करदात्याला निवृत्तिवेतन मिळत असेल तर, त्याला नवीन करप्रणालीनुसार जास्त कर भरावा लागतो. मात्र ५०,००० रुपयांची प्रमाणित वजावट, ‘कलम ८० टीटीबी’नुसार मिळणारी ५०,००० रुपयांची व्याजाची वजावट, ‘कलम ८० डी’नुसार ५०,००० रुपयांपर्यंतची वैद्यकीय खर्चाची वजावट आणि ‘कलम ८० सी’नुसार केलेली गुंतवणूक वगैरे प्रमुख वजावटींचा नेमका विकल्प निवडताना विचार करावा. करदाता या वजावटींना पात्र असेल किंवा वजावट मिळविण्यासाठी या गुंतवणुका किंवा खर्च करू शकत असेल तर जुनी करप्रणाली त्याला फायदेशीर ठरते. जर करदाता हा खर्च किंवा गुंतवणूक करू शकत नसेल तर त्याला नवीन करप्रणाली फायदेशीर ठरेल.

वाचकांनी आपले प्रश्न खाली दिलेल्या ई-मेलवर किंवा ‘लोकसत्ता अर्थवृत्तान्त’च्या rthmanas@expressindia.com ई-मेलवर शक्यतो मराठीत युनिकोडमध्ये टाइप करून पाठवावेत.

* लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत. pravin3966@rediffmail.com