03 December 2020

News Flash

नावात काय : रोकड प्रवाह कॅश-फ्लो

कॅश-फ्लो म्हणजेच कंपनीमध्ये पैसा कोणत्या मार्गाने येतो आहे,

संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र

कौस्तुभ जोशी

कोणत्याही कंपनीचे, व्यवसायाचे एकूणच भले सुरू आहे का नाही? याचा चटकन अंदाज घ्यायचा असल्यास कोणत्या बाबी विचारात घ्याव्यात याची यादी केली तर ‘कॅश फ्लो’ या संकल्पनेचे स्थान वरचे आहे.

कंपनीचा ताळेबंद, जमाखर्चाचे आकडे, विक्रीचे आकडे, नफ्याचे आकडे यांसारख्या अन्य गोष्टींतून आपल्याला कंपनीच्या आर्थिक गणितांची सविस्तर माहिती मिळू शकते. पण कंपनीचा कॅश-फ्लो किती सुरळीत आहे यावरून कंपनीचे अर्थकारण समजण्यास अधिक मदत होते.

कॅश-फ्लो म्हणजेच कंपनीमध्ये पैसा कोणत्या मार्गाने येतो आहे, जातो आहे म्हणजेच पैशाच्या विनियोगाची आणि कंपनीकडे येणाऱ्या पैशाची आकडेवारी समजते.

नित्य व्यवहारांमध्ये वेगवेगळ्या मार्गाने रोख रक्कम व्यवसायात येत असते आणि रक्कम व्यवसायाबाहेर जात असते. म्हणजेच रोकड येणे अर्थात इन-फ्लो आणि पैसे द्यावे लागले की आउट-फ्लो हे समजून घ्या.

कॅश-फ्लो ही संकल्पना तीन प्रकारांत विभागलेली आहे.

ऑपरेटिंग, इन्व्हेस्टिंग आणि फायनान्सिंग या तीन माध्यमांतून कोणत्याही कंपनीकडे सर्वसाधारणपणे रोख पैशाचा प्रवाह येत असतो.

ऑपरेटिंग कॅश-फ्लो

म्हणजे कंपनीच्या मुख्य व्यवसायातून कंपनीला किती रोकड मिळाली? कंपनीला व्यवसाय करण्यासाठी किती रोकड वापरावी लागली? वस्तूंचे उत्पादन करणे, विक्री करणे यासाठी लागणारा खर्च आणि वस्तूंची विक्री करून जे रोख पैसे मिळतात यातून जी आकडेवारी मिळते ती ऑपरेटिंग कॅश फ्लो म्हणून ओळखली जाते. यावरून काय समजते याचे एक उदाहरण घेऊ , समजा एका कंपनीने अल्पकाळात अधिक विक्री केली पण ती विक्री उधारीवर केली असेल तर विक्री तर वाढली पण रोख रक्कम काही हाती पडली नाही. म्हणजेच कॅश फ्लो तयार झाला नाही फक्त व्यवसाय वाढला.

गुंतवणूक आणि कॅश फ्लो

जर कंपनीने एखाद्या वित्त वर्षांत एखादी नवी यंत्रसामुग्री, जागा तत्सम विकत घेतली असेल, एखादी जुनी गुंतवणूक विकली असेल तर त्यातून जो पैसा मिळतो तो कंपनीच्या मुख्य व्यवसायातून मिळालेला नसतो. म्हणजे समजा, एखाद्या कंपनीचा नफा वाढलेला दिसला, पण कॅश फ्लोमध्ये कंपनीने आपली एक मोक्याच्या ठिकाणी असलेली जागा विकून पैसे कमावले आहेत असं समजलं तर त्या वर्षांत अचानकपणे झालेला घसघशीत नफा हा चांगला व्यवसाय करून झालेला नाही तर गुंतवणूक विकून आलेल्या पैशामुळे झालेला आहे हे चटकन लक्षात येते!

आर्थिक व्यवहारातून तयार होणारा कॅश-फ्लो

कंपनीने आपल्या भागधारकांना लाभांश दिला, नव्याने दीर्घकालीन कर्जे उभारली, जुन्या कर्जाची परतफेड केली यासाठी जी रोख रक्कम वापरली गेली त्याचा समावेश यात होतो. जर एखादी कंपनी नियमितपणे भागधारकांना लाभांश देत असेल, आपल्याकडे असलेले पैसे नवनवीन उद्योगांमध्ये गुंतवत असेल तर ते हितावह समजले जाते.

आर्थिक वर्षांच्या सुरुवातीला म्हणजेच १ एप्रिल २०१९ या दिवशी कंपनीच्या खात्यावर किती रुपये रोख होते आणि आर्थिक वर्षांच्या शेवटी ३१ मार्च २०२० रोजी कंपनीच्या खात्यावर किती रुपये शिल्लक होते हे मांडल्यावर वर्षभरात पैसे जाणे आणि येणे हे कोणत्या कोणत्या बाबींवर खर्च झाले याची सविस्तर नोंद ‘कॅश फ्लो’मध्ये केली जाते.

नफ्यापेक्षा रोकड महत्त्वाची का?

एखाद्या कंपनीच्या दीर्घकालीन वाटचालीचा विचार करता कंपनीला किती नफा होईल याचे भाकीत वर्तवणे तसे कठीण. उपलब्ध असलेल्या पाच ते सात वर्षांच्या आकडेवारीवरून आपल्याला याचा अंदाज नक्कीच बांधता येतो की कंपनीकडे आपल्या नियमित गरजा भागवण्यासाठी पुरेशी रोकड उपलब्ध होते का?  जर होत नसेल तर ती कशामुळे होत नाही? याचा शोध घेता येतो. कंपनी वारंवार आपल्याकडच्या गुंतवणुकी व मालमत्ता विकून पैसे उभे करत असेल तर त्यामागे काही ठोस कारण आहे का? तसे कारण कंपनीकडून दिले गेले नसल्यास एकूणच कारभार बेभरवशाचा आहे असा अंदाज नक्कीच लावता येतो. दर वेळच्या आर्थिक तरतुदींसाठी रोकड नाही म्हणून कर्ज उभारणे ही कंपनीची प्रवृत्ती असेल तर दीर्घकालीन वृद्धीच्या दृष्टीने ती योग्य नाही हे कॅश-फ्लोवरून सहज लक्षात येईल.

* लेखक वित्तीय नियोजनकार व अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

joshikd28@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2020 12:05 am

Web Title: cash flow analysis cash flow statement zws 70
Next Stories
1 बाजाराचा तंत्र कल : सुन्या सुन्या मैफलीत..
2 अर्थ वल्लभ : मुद्दलाची सुरक्षितता आणि लाभाची कर-कार्यक्षमता!
3 माझा पोर्टफोलियो : जोखीम-संतुलित गुंतवणूक संधी
Just Now!
X