News Flash

माझा पोर्टफोलियो : उत्तम लाभकारक, आश्वासक ‘धाव’

जागतिक बाजारपेठेतदेखील कंपनीचे स्थान भक्कम असून सुमारे ९० हून अधिक देशांत कंपनीची उत्पादने विकली जात आहेत.

अजय वाळिंबे

वर्ष १९५८ मध्ये स्थापन झालेली सीएट लिमिटेड ही आरपीजी समूहाची प्रमुख टायर उत्पादक कंपनी आहे. गेल्या ६२ वर्षांत कंपनीने आपला व्यवसाय मोठय़ा प्रमाणावर विस्तारला असून कंपनी १०० हून अधिक देशांत आपली उत्पादने आणि उत्पादन निगडित सेवा पुरवते. जवळपास सर्वच प्रकारच्या म्हणजे दुचाकी, तीनचाकी, कार, बस, ट्रक, ट्रॅक्टर, इ. वाहनांना लागणाऱ्या टायर्सचे उत्पादन ती करते. कंपनीच्या एकूण उत्पन्नापैकी सर्वात जास्त म्हणजे ३३ टक्के उत्पन्न हे ट्रक्स तसेच बससारख्या अवजड वाहनांपासून, तर सुमारे ३० टक्के उत्पन्न हे दुचाकी वाहनांपासून असून सुमारे १३ टक्के उत्पन्न कारपासून आहे. कंपनीच्या एकूण महसुलापैकी ६० टक्के महसूल हा ‘रिप्लेसमेंट’ व्यवसायातून आणि १३ टक्के महसूल निर्यातीतून येतो.

जागतिक बाजारपेठेतदेखील कंपनीचे स्थान भक्कम असून सुमारे ९० हून अधिक देशांत कंपनीची उत्पादने विकली जात आहेत. तर श्रीलंकेतील बाजारपेठ कंपनीने तेथील जॉइंट व्हेंचरद्वारे ५० टक्के काबीज केली आहे. कंपनीचे नाशिक, मुंबई, हलोल, अंबरनाथ, नागपूर आणि चेन्नई येथे प्रकल्प आहेत ज्यात एकूण ३.५ कोटी टायर उत्पादन करण्याची क्षमता आहे.

कंपनीचा व्यवसाय त्याच्या वितरण नेटवर्कवर चालतो ज्यामध्ये ३००हून अधिक वितरक, ४,००० डीलर्स आणि ३५,००० सबडीलर्स असून, ज्यात भारतभरातील बहुतांशी जिल्ह्य़ांचा समावेश आहे. याखेरीज कंपनीची ३०० एक्सक्लुझिव्ह सीएएटी आउटलेट्स, १२ टायर सव्‍‌र्हिस हब आणि संपूर्ण भारतात ४००हून अधिक मल्टी-ब्रँड आउटलेट कंपनीच्या उत्पादनाची विक्री करीत आहेत. टाटा मोटर्स, अशोक लेलँड, एस्कॉर्ट्स, महिंद्रा, मारुती, ह्य़ुंदाई, किआ, फॉक्सवॅगन, होंडा, रॉयल एनफील्ड, बजाज, पियाजिओ इत्यादी प्रमुख ओईएमबरोबर कंपनी व्यवसाय करीत आहे. टायर टेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चरवर सीएटने लक्षणीय गुंतवणूक केली आहे. बदलत्या काळानुसार कंपनीने इलेक्ट्रिक व्हेईकल आणि स्मार्ट टायरसारख्या आगामी तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केले आहे.

मार्च २०२१ साठी संपलेल्या आर्थिक वर्षांचे निकाल जाहीर झाले असून कंपनीने उत्तम कामगिरी करून दाखविली आहे. या आर्थिक वर्षांत कंपनीने ७,६१० कोटी रुपयांच्या उलाढालीवर ४६२.२ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत तो ८२ टक्क्यांनी अधिक आहे. उत्पादनाच्या वाढत्या मागणीसाठी कंपनी २०२४ पर्यंत आपली उत्पादन क्षमता वाढवत असून त्याकरता जवळपास ४,००० कोटी रुपयांचा भांडवली खर्च अपेक्षित आहे. सीएटमधील गुंतवणूक दीर्घकालात फायद्याची ठरू शकेल.

सीएट लिमिटेड

(बीएसई कोड – ५००८७८)

शुक्रवारचा बंद भाव : रु. १३१९/-

वर्षांतील उच्चांक/ नीचांक : रु. १,७६३/७३५

बाजार भांडवल : रु. ५,३३६ कोटी

भरणा झालेले भागभांडवल : रु. ४०.४५ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक  ४६.८२

परदेशी गुंतवणूकदार      २६.९७

बँक/ म्यु. फंड/ सरकार   १३.६५

इतर/ जनता     १२.५६

संक्षिप्त विवरण

* शेअर गट    : स्मॉल कॅप

* प्रवर्तक       : य्आरपीजी समूह

* व्यवसाय क्षेत्र  :  टायर निर्मिती

* पुस्तकी मूल्य : रु. ८२०

* दर्शनी मूल्य : रु. १०/-

शेअर शिफारसीचे निकष

*  प्रति समभाग उत्पन्न :      रु. ११४.३

*  पी/ई गुणोत्तर :      ११.५

*  समग्र पी/ई गुणोत्तर : १९

*  डेट इक्विटी गुणोत्तर :       ०.४५

*  इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :    ३.९५

*  रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड : १४.२

*  बीटा :      ०.७

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2021 1:08 am

Web Title: ceat limited company profile t yre manufacturing company zws 70
Next Stories
1 आरोग्य विमा : निवडीपूर्वीची आवश्यक चाचपणी
2 फंडाचा ‘फंडा’.. आता सांगतो उत्तम गुण..
3 बाजाराचा तंत्र-कल  :  दिसते मजला  सुखचित्र नवे!
Just Now!
X