सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिटय़ूट, लखनौ

उत्तरप्रदेशातील लखनौ येथे असलेली सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिटय़ूट (सीडीआरआय) म्हणजेच केंद्रीय औषध संशोधन संस्था ही औषधशास्त्र या विषयामध्ये संशोधन करते. स्थापनेपासूनच देशाच्या सेवेत असणाऱ्या या संस्थेने विविध औषधांची निर्मिती करून त्यांचा सर्वसामान्यांपर्यंत प्रसार करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) अनेक संलग्न संशोधन संस्थांप्रमाणे सीडीआरआय हीदेखील एक सीएसआयआरशी संलग्न संस्था आहे.

संस्थेविषयी

सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिटय़ूट (सीडीआरआय) म्हणजेच केंद्रीय औषध संशोधन संस्था ही भारतातील प्रमुख औषधी संशोधन संस्था असून तिचे उद्घाटन १७ फेब्रुवारी १९५१ रोजी तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले. देशातील औषध संशोधन आणि विकास क्षेत्राला बळकट करण्यासाठी या संशोधन संस्थेची तेव्हा स्थापना केली गेली होती. सीडीआरआयने आपल्या आरोग्यसेवा क्षेत्रातील अभियानाच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या गोष्टींना अग्रक्रम दिलेला आहे. त्यामध्ये अविरत संशोधनाच्या माध्यमातून अल्प किमतीतील नवनवीन औषधे तयार करणे, सर्वासाठी स्वस्त आरोग्यसेवांतील तंत्रज्ञान निर्माण करणे, आरोग्यसेवा क्षेत्रातील अद्ययावत ज्ञानाचा पाया घालणे आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील भविष्यातील नेतृत्वाच्या पोषक वातावरणनिर्मितीसाठी प्रयत्न करणे, इ. गोष्टींचा समावेश होतो. औषध बनवण्याच्या प्रक्रियेतील संश्लेषण, स्क्रीनिंग, औषधांच्या विकासाचा अभ्यास, क्लिनिकल स्टडीज या सर्व गोष्टी एकाच छताखाली असण्यामुळे सीडीआरआय हे आधुनिक औषध संशोधनासाठी एक अनोखे प्रारूप बनले आहे.

संशोधनातील योगदान 

औषधशास्त्रामध्ये संशोधन करणारी ही संस्था बायोटेक, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि तत्सम इतर शाखांमधील संशोधनाच्या माध्यमातून आंतरविद्याशाखीय संशोधन (Interdisciplinary research)  करत आलेली  आहे. संस्थेने औषध उद्योगातील देश-विदेशातील अनेक प्रकल्प यशस्वीपणे राबवले आहेत. सीडीआरआय आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक संशोधन संस्था व आंतरराष्ट्रीय औद्योगिक क्षेत्राशी संलग्न आहे. सीडीआरआयमधील संशोधकांनी तिसऱ्या जगातील देशांमधील औषध उद्योगांना नेहमी मदत केलेली आहे.  या संस्थेचे सर्वात महत्त्वाचे योगदान म्हणजे बारा नवीन औषधांचा शोध आणि विकास होय. ज्यापैकी Arteether (ब्रँडचे नाव : ई-मेल), इएरएइ (ब्रँडचे नाव: मेमरी शुअर), Centchroman (ब्रँडचे नाव: सहेली)  ही उत्पादने सध्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच सीडीआरआयने १३० पेक्षाही अधिक देशी तंत्रज्ञान जागतिक फार्मास्युटिकल कंपन्यांना हस्तांतरित केलेले आहे. याचमुळे भारतीय औषध क्षेत्र कात टाकू शकले.

संस्थेने आत्तापर्यंत दहा हजारांपेक्षा जास्त संशोधन लेख अर्थात शोधनिबंध प्रकाशित केलेले आहेत. सीडीआरआयच्या नावावर भारतीय औषध क्षेत्रातील साडेतीनशे पेटंट तर जवळपास नव्वद आंतरराष्ट्रीय पेटंट जमा आहेत. संस्थेमधून आजतागायत एक हजार विद्यार्थी पीएचडी करून बाहेर पडले आहेत. संस्थेचे अनेक माजी विद्यार्थी विविध राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्था, बायोटेक आणि औषध उद्योगात अनेकविध उच्च पदांवर कार्यरत आहेत.

विद्यार्थ्यांसाठी संधी

सीडीआरआयने विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर व पीएचडी या स्तरावर अभ्यासक्रम तयार केलेले आहेत. त्यात सीएसआयआरच्या तत्त्वप्रणालीनुसार सीडीआरआयमध्ये Academy of Scientific & Innovative Research (AcSIR) च्या अंतर्गत पदव्युत्तर, पीएचडी व पोस्ट डॉक्टरल संशोधन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पूर्ण करता येतात. दरवर्षी विज्ञान शाखांमधील अनेक विद्यार्थी त्यांची पदवी, पदव्युत्तर, पीएचडी स्तरावरील संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी इथे येत असतात.

संपर्क

सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिटय़ूट,

सेक्टर १०, जानकीपुरम एक्स्टेंशन,

सीतापुर मार्ग, लखनौ,

उत्तर प्रदेश – २२६०३१.

दूरध्वनी – + ९१- ५२२-

२७७२४५०/२७७ २५५०.

ईमेल – director@cdri.res.in

संकेतस्थळ  –  http://www.cdri.res.in/

 

– प्रथमेश आडविलकर

itsprathamesh@gmail.com