|| अजय वाळिंबे

क्लॅरियंट केमिकल्स (इं.) लि. (बीएसई कोड – ५०६३९०)

क्लॅरियंट केमिकल्स (इंडिया) लिमिटेड ही क्लॅरियंट एजी या स्विस कंपनीची उपकंपनी. भारतात मुंबईत मुख्यालय असलेली ही कंपनी, केअर केमिकल्स (बीयू इंडस्ट्रियल आणि कंझ्युमर स्पेशालिटीज), प्लास्टिक आणि कोटिंग्स (बीयू पिगमेंट्स, बीयू मास्टरबॅच, बीयू अ‍ॅडिटिव्ह), नैसर्गिक संसाधन (बीयू फंक्शनल मिनरल, बीएल मायनिंग सव्‍‌र्हिसेस) इत्यादी व्यवसायाच्या क्षेत्रात कार्य करते. कंपनीच्या अनेक ठिकाणी निर्मिती करणारे युनिट्स आहेत; यात महाराष्ट्रातील वेशेर आणि रोहा, तमिळनाडूमधील कुड्डालोर; गुजरातमधील रानिया, कलोल आणि नंदेशरी; मध्य प्रदेशातील नागदा, तेलंगणा आणि केरळमधील ईददार यांचा समावेश होतो. कंपनीची उत्पादने अनेक क्षेत्रांत वापरली जातात. यात प्रामुख्याने हेल्थकेअर, इन्फ्रास्ट्रक्चर, ग्राहकोपयोगी वस्तू, शेती, फायबर तसेच पॅकेजिंग आणि प्रिंटिंग इ.चा समावेश होतो. गेल्या आर्थिक वर्षांत आणि यंदाच्या पहिल्या सहामाहीपर्यंत कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, जीएसटी इ. कारणामुळे सुमार कामगिरी करून दाखवणाऱ्या क्लॅरियंटने गेल्या वर्षांत प्लास्टिकेमिक्स आणि लॅक्सेस या दोन कंपन्या ताब्यात घेतल्या होत्या. त्याचा सकारात्मक परिणाम आता कंपनीच्या कामगिरीवर होऊ लागला आहे. तसेच यंदा कंपनीने आपल्या उत्पादनांच्या किमतीतही वाढ केली आहे. तसेच कंपनीने तमिळनाडूमधील कुडलोर येथे नवीन ग्रीनफील्ड हेल्थकेअर पॅकेजिंग उत्पादन केंद्र सुरू केले आहे. जागतिक पॅकेजिंग डिझाइन क्षमता असल्याने ही उत्पादने जागतिक पातळीवर जेनेरिक आणि ब्रॅण्डेड औषध कंपन्या तसेच स्थानिक भारतीय औषध बाजारपेठेत वापरली जातात. मार्च २०१९ तसेच आगामी वर्षांत कंपनीकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. सध्या मंदीच्या छायेत असलेल्या बाजारातून क्लॅरियंट केमिकल्सची ३९० रुपयांपर्यंतची मध्यम कालावधीसाठी केलेली खरेदी तुम्हाला फायदेशीर ठरू शकेल.

गेली सात वर्षे आपण ‘माझा पोर्टफोलियो’च्या माध्यमातून शेअर्सचा पोर्टफोलियो अभ्यासत आलो आहोत आणि पोर्टफोलियोचे नियमित वाचक एव्हाना नक्कीच अनुभवी, जाणकार आणि सजग गुंतवणूकदार झाले असतील. परंतु पोर्टफोलियो म्हणजे केवळ शेअर्सचा पोर्टफोलियो नव्हे. संपत्ती निर्माण करताना गुंतवणुकीचे अनेक पर्याय निवडता येतात. यामध्ये शेअर बाजाराखेरीज पीपीएफ, व्हीपीएफ, मुदत ठेवी, एनएससी अशी पारंपरिक गुंतवणूक तसेच रियल इस्टेट, सोने/ चांदी, म्युच्युअल फंड, युलिप्स, रोखे, राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) अशा अनेक पर्यायांचा विचार करायला हवा. तुमची गुंतवणूक विविध प्रकारांत केलेली असेल तर साहजिकच पोर्टफोलियो समतोल होतोच, पण नुकसानीचा धोकाही कमी होतो. कारण पोर्टफोलियोतील एखादा पर्याय जर नुकसानीत असेल तरीही दुसरा पर्याय तुम्हाला तारू शकतो. उदा. शेअर बाजार कोसळला तरीही रोख्यातील गुंतवणूक नियमित व्याज देईल किंवा रियल इस्टेट मंदीत गेली तरीही सोने किंवा चांदीतील गुंतवणूक तुम्हाला तारेल. ‘एनपीएस’मधील नियमित गुंतवणूक तुमची निवृत्तीनंतरची काळजी घेईल.

अर्थात, आपण अभ्यासत असलेला पोर्टफोलियो शेअर्सपुरता मर्यादित असला तरी त्यातही समतोलता हवीच. म्हणजे पोर्टफोलियोमध्ये विविध क्षेत्रांतील कंपन्यांचा समावेश हवा. किमान ५० टक्के शेअर्स लार्ज कॅप हवेत. पोर्टफोलियोचा कालावधी दीर्घकालीन असला तरीही त्याचा मासिक आढावा घ्यायलाच हवा. तसेच उद्दिष्ट पूर्ण झाल्यावर शेअर्स विकून नफा पदरात पडून घेणे आणि अंदाज चुकला तर प्रसंगी तो शेअर नुकसानीत विकायचीही तयारी हवी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोर्टफोलियोत २० पेक्षा जास्त कंपन्या नसाव्यात. गुंतवणुकीसाठी शेअर्स कसे निवडावेत हे आपण पुढील काही लेखांतून पाहूच.