28 February 2021

News Flash

माझा पोर्टफोलियो : आत्मनिर्भर भारताचा ‘दुर्लक्षित’ पाईक

भारतातील एकूण कोळसा उत्पादनापैकी जवळपास ८३ टक्के उत्पादन कोल इंडियातून केले जाते.

(संग्रहित छायाचित्र)

अजय वाळिंबे

वर्ष १९७५ मध्ये स्थापन झालेली कोल इंडिया ही भारतीय महारत्न कंपन्यांपैकी एक मोठी सरकारी कंपनी आहे. सुरुवातीला प्रती दिन केवळ ७९ मेट्रिक टन्स उत्पादन करणारी कोल इंडिया ही आज भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक करणारी खाण कंपनी असून भारतातील आठ राज्यांमध्ये कंपनीच्या ३५२ खाणी आहेत. कोल इंडिया लिमिटेड प्रामुख्याने कोळशाचे खाणकाम आणि उत्पादन करते आणि कोळशाची वॉशरी चालविते. कंपनीचे प्रमुख ग्राहक म्हणजे वीज आणि स्टील क्षेत्र. इतर क्षेत्रातील ग्राहकांमध्ये सीमेंट, खते, वीटभट्टी इ. चा समावेश आहे.

भारतातील एकूण कोळसा उत्पादनापैकी जवळपास ८३ टक्के उत्पादन कोल इंडियातून केले जाते. भारतात जवळपास ५७ टक्के प्राथमिक व्यावसायिक ऊर्जा कोळशावर अवलंबून आहे. यापैकी कोल इंडिया एकटय़ा प्राथमिक व्यावसायिक ऊर्जाविषयक आवश्यकतेपैकी ४० टक्के गरज पूर्ण करते. सध्या ऊर्जा उत्पादनांसाठी कोळशाचा वापर कमी करण्यावर भर दिला जात असला तरीही २०४० पर्यंत ऊर्जा उत्पादनासाठी कोळशाचा वाटा ५४ टक्क्य़ांवर राहील आणि युटिलिटी क्षेत्राच्या एकूण औष्णिक वीजनिर्मिती क्षमतेच्या ७६ टक्के राहील. कोल इंडियामुळे भारतातील ग्राहकांना आयात दरापेक्षा कमी किमतीत कोळसा पुरवठा होतो आणि भारतीय कोळसा ग्राहकांना किमतीतील अस्थिरतेपासून बचाव करते. शेवटचा वापरकर्ता उद्योगाला यामुळे जागतिक स्तरावरील स्पर्धात्मकता साधता येते आणि ‘मेक इन इंडिया’ आणि भारताला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली जाते.

सप्टेंबर २०२० साठी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने २१,१५३ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २,९४८ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला होता. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तो १६ टक्क्य़ांनी कमी असला तरीही करोना कालावधीत हा निकाल चांगलाच होता. आता लवकरच म्हणजे ११ फेब्रुवारी २०२१ रोजी कंपनीचे डिसेंबर २०२० पर्यंतचे तिमाही आर्थिक निष्कर्ष जाहीर होतील तसेच त्या आधी म्हणजे सोमवारीच अर्थसंकल्पदेखील जाहीर होईल. शेअर बाजारच्या स्थितीकडे बघून मग निर्णय घेणे योग्य ठरेल. अर्थात शेअरची किंमत अजून खाली आल्यास लाभांश आणि दीर्घकालीन भांडवली नफ्यासाठी नक्की खरेदी करावा असाच हा शेअर आहे.

कोल इंडिया लिमिटेड

(बीएसई कोड – ५३३२७८)

शुक्रवारचा बंद भाव : रु. १२६/-

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक : रु.२११/११०

बाजार भांडवल :

रु. ७८,२४४ कोटी

भरणा झालेले भागभांडवल : रु. ६१६२.७३ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक  ६६.१३

परदेशी गुंतवणूकदार  ६.५०

बँक/ म्यु. फंड/ सरकार   २२.२३

इतर/ जनता ५.१४

संक्षिप्त विवरण

* शेअर गट : लार्ज कॅप

* प्रवर्तक   : भारत सरकार

* व्यवसाय क्षेत्र  : खाणकाम/ कोळसा

* पुस्तकी मूल्य : रु. ६०.२

* दर्शनी मूल्य   : रु. १०/-

* लाभांश   : १२०%

शेअर शिफारसीचे निकष

*  प्रति समभाग उत्पन्न :   रु. २२

*  पी/ई गुणोत्तर :  ५.८

*  समग्र पी/ई गुणोत्तर :   २०.९

*  डेट इक्विटी गुणोत्तर :   ०.१३

*  इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :   ३१.४

*  रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड :   ७३.१

*  बीटा :  ०.६

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 1, 2021 12:34 am

Web Title: coal india limited portfolio abn 97
Next Stories
1 विमा.. सहज, सुलभ : विमा क्षेत्राला अपेक्षापूर्ती आस
2 रपेट बाजाराची : ‘हुरूप’ हवाय!
3 बाजाराचा तंत्र-कल : मंद झाल्या तारका..
Just Now!
X