19 September 2020

News Flash

क.. कमॉडिटीचा : बुलडेक्स – सोने-चांदीमधील व्यवहारांची सुसंधी

सोने-चांदी निर्देशांक’ या अशा एक गुंतवणुकीच्या नव्या साधनाविषयी..

श्रीकांत कुवळेकर

सोन्या-चांदीमध्ये गुंतवणूकदारांची एक नवी पिढी, नवी संस्कृती उदयास येताना दिसत आहे. या मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक देखील दोन-तीन वर्षांपूर्वीपेक्षा आज खूपच सोपी आणि पारदर्शक देखील झाली आहे. ‘सोने-चांदी निर्देशांक’ या अशा एक गुंतवणुकीच्या नव्या साधनाविषयी..

मागील सहा महिन्यांच्या करोना काळात गुंतवणूकविश्व चांगलेच ढवळून निघाले आहे. शेअर बाजार असो की चलन व्यवहार, आणि रोखे किंवा कमॉडिटी बाजार, सर्वच बाजारात जीवघेणे चढउतार पाहायला मिळाले. सुरुवातीच्या मोठय़ा घसरगुंडीनंतर शेअर बाजार अनपेक्षितपणे चांगलेच सुधारले आहेत. तर इतर बाजार करोनामुळे झपाटय़ाने बदलत चाललेल्या परिस्थितीला जुळवून घेताना दिसत आहेत. तरीही या काळात सोने आणि चांदी या दोनच गोष्टी, खरे म्हणजे कमॉडिटीज, सर्वात जास्त चमकल्या. म्हणजे मागील महिन्यात दोन्हींच्या किमतीने भारतासह अनेक देशात विक्रमी भरारी घेतली आहे. भारतात आजपर्यंत गुंतवणुकीचे साधन म्हणून सोने चांदीकडे फारसे बघितले गेले नसले तरी अलीकडील तेजीने लोकांच्या वृत्तीत फरक पडताना दिसत आहे.

गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमध्ये निदान १० टक्के वाटा सोन्यात वळवण्यासाठी लोक अनुकूल होताना दिसतात. म्युच्युअल फंड आणि गुंतवणूक सल्लागार देखील सोने-चांदीमध्ये रस घेताना दिसत आहेत. निश्चितच सोन्या-चांदीत गुंतवणूकदारांची एक नवी पिढी, नवी संस्कृती उदयास येताना दिसत आहे. या मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक देखील दोन-तीन वर्षांपूर्वीपेक्षा आज खूपच सोपी आणि पारदर्शक देखील झाली आहे. वायदे बाजाराच्या जोडीला एक्सचेंज ट्रेडेड फंड (गोल्ड ईटीएफ), सरकारी सुवर्णरोखे, डिजिटल गोल्ड तसेच ऑप्शन-ऑन-गुड्स अशी एकाहून एक आकर्षक साधने निघाली असल्यामुळे एक विशिष्ट वर्ग यात अधिकाधिक गुंतवणूक करताना दिसत आहे. याबद्दल मागील वर्षांत आपण लेखमाला चालवली होतीच. परंतु आज या स्तंभामधून आपण अलीकडे नव्यानेच आलेल्या गुंतवणूक साधनाविषयी म्हणजे ‘सोने-चांदी निर्देशांक’ आणि त्यावरील वायदा व्यवहार याची माहिती करून घेऊ.

एमसीएक्स या वायदे बाजारावर मागील महिन्यात ‘बुलडेक्स’ या नावाने ‘सोने-चांदी निर्देशांका’वरील (बुलियन इंडेक्स)  वायद्यामध्ये ट्रेडिंग सुरू झाले आहे. तर काय आहे हे बुलडेक्स? आपण सर्वाना निफ्टी-फिफ्टी, बँक-निफ्टी, किंवा सेन्सेक्स हे शेअर बाजारातील निर्देशांक माहीत आहेत. शेअर बाजारात विशिष्ट कंपनीच्या शेअरमध्ये ट्रेडिंग जमत नसेल तर आपण या निर्देशांकांमध्ये देखील ट्रेडिंग करता येते. म्हणजे एकाच वेळी त्या निर्देशांकात अंतर्भूत असलेल्या सर्व कंपन्यांमध्ये विशिष्ट प्रमाणात गुंतवणूक होते. अर्थात यातील ट्रेडिंग हे वायदे बाजारातच होते. याच धर्तीवर आता कमॉडिटी निर्देशांक गुंतवणुकीसाठी उपलब्ध करून देण्यास ‘सेबी’ने मान्यता दिली आहे. या स्तंभातून आपण जूनमध्ये ‘एनसीडीईएक्स’च्या कृषिमालावरील निर्देशांक ‘अ‍ॅग्रीडेक्स’वर चर्चा केली होती. त्याच पठडीतला दुसरा निर्देशांक जो फक्त सोने आणि चांदीमध्ये एकत्र गुंतवणुकीचा पर्याय देईल असा वायदा एमसीएक्सने २४ ऑगस्टपासून सूचिबद्ध केला आहे.

गेल्या काही महिन्यांत सोने ३५,००० रुपयांवरून ५६,००० रुपये प्रति १० ग्राम आणि चांदी ३४,००० रुपयांवरून ७८,००० रुपये प्रतिकिलो या विक्रमी पातळीवर ऑगस्टमध्ये पोहोचली असली तरी त्या किमती आता अनुक्रमे ८ टक्के आणि १३ टक्के कमी झाल्या आहेत. ज्यांना यापूर्वी गुंतवणूक करता आली नाही आणि ज्यांना पुढील काळात भाववाढीची खात्री आहे त्यांच्यासाठी देखील ‘बुलडेक्स’मध्ये ट्रेडिंग करणे सोपे जाणार आहे. वायदेबाजारात सोने-चांदी घेण्याचे फायदे आपण मागील महिन्यातील लेखात समजून घेतले आहेतच. परंतु सोन्यामध्ये आजपर्यंत १ ग्राम, ८ ग्राम, १०० ग्राम आणि १ किलोचे वायदे व्यवहार करताना त्यात वायदेपूर्तीच्या वेळी डिलिव्हरी घेणे बंधनकारक होते. चांदीमध्ये देखील ३० किलो आणि ५ किलो वायदे अनिवार्य डिलिव्हरीचेच आहेत. डिलिव्हरी घेताना अनेक प्रकारच्या शर्ती, व्यवहार पाळणे किचकट आणि त्रासदायक व खर्चीक होते. शिवाय खरेदी केलेल्या सोने-चांदीचे पूर्ण पैसे द्यायला लागतात. शिवाय सोने आणि चांदी या दोन्हींसाठी दोन वेगवेगळे वायदे घ्यायला लागतात.

‘बुलडेक्स’ मासिक पद्धतीचा वायदा मात्र आपल्याला सोने आणि चांदी या दोन्ही धातूंमध्ये अनुक्रमे साधारणत: ७१:२९ या प्रमाणात गुंतवणूक करण्याची संधी देतो. या करिता आपल्याला फक्त सुरुवातीला ६ टक्के एवढीच रक्कम (मार्जिन) भरायला लागून वायदा खरेदी आपल्या नावावर असेपर्यंत त्यात खरेदी किमतीच्या खाली गेल्यास तेवढे पैसे भरावे लागतात.

त्या उलट किंमत वाढली तर रोजच्या रोज आपल्याला तेवढे पैसे दलालांकडून मिळत जातात. आपल्याला हा वायदा ५० युनिट्सच्या आकारात मिळतो.

उदाहरणार्थ, सध्याचा १६,००० हा भाव धरता ५० युनिट्सप्रमाणे आपल्याला साधारण ८,००,००० रुपयांचे सोने-चांदी ७१:२९ प्रमाणात मिळते. वायदापूर्तीपूर्वी १६,००० वरील प्रत्येक पॉइंट आपल्याला ५० रुपयांचा फायदा आणि १६,००० खालील प्रत्येक पॉइंट ५० रुपये तोटा देईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वायदापूर्तीला आपला सौदा कॅश-सेटल्ड म्हणजे नफा-तोटा विचारात घेऊन आपले सुरुवातीचे ६ टक्के मार्जिनसह आपल्याला परत मिळेल. सोने-चांदीपेक्षा निर्देशांकाचा फायदा असा की अत्यंत कमी किमतीमध्ये आपल्याला अल्प मुदतीत सोने चांदीच्या भावातील ट्रेंड पाहून पैसे कमावण्याची संधी मिळते. अर्थात भाव आपल्या अंदाजाच्या विरुद्ध गेला तर तोटा देखील होतो. परंतु ६५,००० कडे डोळे ठेवून ५६,००० रुपयांमध्ये सोने घेणारे देखील तोटय़ातच बसले आहेत. शिवाय ‘बुलडेक्स’ या निर्देशांक वायद्यामध्ये डिलिव्हरी लागण्याचा धोका नसल्यामुळे अचानक खूप पैसे उभे करण्याची गरज लागत नाही. सध्याच्या युद्धजन्य स्थितीमध्ये अल्प काळात सोने भडकण्याची संधी असते तेव्हा निर्देशांकासारखी गुंतवणूक साधने खूप उपयोगी पडतात.

उलटपक्षी आपल्याकडे असलेले सोने-चांदी अल्पावधीत विक्रमी भाव पातळीवर गेल्यास बाजारात विकणे कठीण होते. दुकानदार अगदी १० टक्के कमी भाव देतो. अशा वेळेस आपल्याला आपल्याकडील सोने-चांदी विकण्याचा हमखास मार्ग म्हणजे बुलडेक्स आधी शॉर्ट करणे म्हणजे विकून टाकणे. म्हणजे अपेक्षेनुसार सोने-चांदी भाव खाली गेले की त्या प्रमाणात बुलडेक्स देखील घसरतो. घसरणीचे आपले लक्ष्य आले की आपण बुलडेक्स लॉन्ग करावा, किंवा आधी विकलेला आता परत विकत घ्यावा म्हणजे आपली वायद्यातील ‘पोझिशन’ शून्य होईल. आणि विक्री आणि पुनर्खरेदीमधील फरक गुणिले ५० एवढा आपला फायदा होईल. हा फायदा आपल्याला हाजीर बाजारात घेणे शक्य होत नाही. याला ‘हेजिंग’ म्हणजे जोखीम व्यवस्थापन तंत्र असेही म्हणतात आणि सोने-चांदी व्यापारी आपल्याकडील मोठा स्टॉक या पद्धतीने एक्सचेंजवर कायम हेज करत असतात. यात कुणाला प्रश्न पडेल की, बुलडेक्स आधी विकल्यावर भाव वर गेले तर होणाऱ्या नुकसानीचे काय? तर त्यांनी हे लक्षात घ्यावे की, आपल्याकडील सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाली तरच बुलडेक्स वाढतो म्हणजे आपले एकीकडे नुकसान दुसरीकडे नफा देते. थोडक्यात हेजिंग केले की आपली नफा-नुकसान दोन्ही शून्य असते. काही जणांच्या माहितीसाठी की सोने-चांदी आणि बुलडेक्स वायद्यामध्ये सकाळी ९ वाजल्यापासून रात्री ११.३० पर्यंत आपण कितीही वेळा खरेदी-विक्री करू शकता. लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे यातील १-पॉइंट वाढ किंवा घसरण आपल्याला ५० रुपयांचा नफा-तोटा देऊन जाते. थोडा सट्टा असला तरी ८,००,०००  रुपये सोन्यात अडकवून, ते बाळगण्याचा धोका आणि खर्च करण्यापेक्षा, ४८,००० रुपये मार्जिन देऊन अधिकचे ५०,००० रुपये दररोजच्या नफा-तोटा अ‍ॅडजस्टमेन्ट (डेली मार्क-टू-मार्केट) साठी बाजूला ठेवून उरलेले ७,००,००० रुपये इतर सुरक्षित गुंतवणूक मार्गात ठेवून त्यावर व्याज, भांडवली नफा मिळवल्यास गुंतवणुकीचा योग्य हेतू साध्य  होईल.

पुढील काळात या ‘बुलडेक्स’वर बेतलेल्या गुंतवणूक योजनांची मालिकाही उपलब्ध होईल. त्यापूर्वीच आपल्याला प्रत्यक्ष बुलडेक्स वापरण्याचे कसब आत्मसात करता आले तर सोने-चांदी गुंतवणूक अधिक आकर्षक करता येईल.

लेखक वस्तू बाजार विश्लेषक.

ksrikant10@gmail.com

(हा लेख गुंतवणूकदारांना ‘बुलडेक्स’ या गुंतवणूक साधनाची माहिती देण्याकरता लिहिला असून त्यात मांडलेला सांख्यिकी तपशील त्याची नीट उकल होण्याकरता दिला आहे. तरी तो गुंतवणुकीचा सल्ला अथवा शिफारस मानला जाऊ नये.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2020 1:03 am

Web Title: commodity market bulldex for gold silver trading zws 70
Next Stories
1 बंदा रुपया : पोल्ट्री खाद्य उद्योगातील सुमंगल
2 माझा पोर्टफोलियो : तरुणांना भुलवणारा ‘रॉयल’ दरारा
3 थेंबे थेंबे तळे साचे : कर नियोजन आणि गुंतवणूक पर्याय
Just Now!
X