प्रवीण देशपांडे

मागील काही वर्षांत आर्थिक क्षेत्रात अनेक चढ-उतार झाले आहेत. बँकेतर वित्तीय कंपन्या, बँकांमधील उघडकीस आलेले घोटाळे, गैरव्यवहार यामुळे गुंतवणूकदारांचे आणि खातेदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. गुंतवणुकीतून व्याजाचे उत्पन्न तर बंद झाले, शिवाय गुंतवणूक केलेले पैसेसुद्धा मिळण्याची आशा मंदावली आहे. आता गुंतवणूकदाराला असा प्रश्न पडला आहे की, अशा बँकेतर वित्तीय कंपन्या किंवा बँकेत केलेली गुंतवणूक जर बुडाली तर त्याचा प्राप्तिकर कायद्यात करदात्याला काही दिलासा मिळतो का?

करदात्याला शेअर्स, म्युचुअल फंडात, घराच्या, सोन्याच्या गुंतवणुकीपासून झालेला तोटा हा इतर भांडवली तोटय़ातून वजा करता येतो किंवा तो पुढील वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करता येतो. करदात्याने एखाद्या बँकेतर वित्तीय कंपनी किंवा बँकेत पैसे गुंतविले आणि ती गुंतविलेली मुद्दल रक्कम कमी मिळाली किंवा मिळालीच नाही. अशा वेळी करदात्याला झालेला तोटा त्याला इतर उत्पन्नातून वजा करता येतो का किंवा पुढील वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करता येतो का? अशी विचारणा बऱ्याच वाचकांनी केली. याबाबत प्राप्तिकर कायद्यातील तरतुदी काय आहेत हे जाणून घेतले पाहिजे.

प्राप्तिकर कायद्यात ‘भांडवली नफा’ या उत्पन्नाच्या स्रोतात जर तोटा झाला असेल तर तो तोटा इतर भांडवली नफ्यातून वजा करता येतो. भांडवली नफा किंवा तोटा हा फक्त संपत्ती ‘हस्तांतरित’ केली असली तरच होतो. शेअर्स विकले आणि त्यावर तोटा झाला तरच तो इतर भांडवली उत्पन्नातून वजा करता येतो किंवा पुढील वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करता येतो. शेअर्स विकले नाहीत आणि त्याचा बाजार भाव फक्त कमी झाला तर तो प्राप्तिकर कायद्यानुसार तोटा होत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या कंपनीचे शेअर्स २,००० रुपये प्रत्येकी या भावात खरेदी केले आणि त्याचा आजचा भाव ५० रुपये प्रत्येकी आहे. जोपर्यंत हे शेअर्स विकले जात नाहीत तोपर्यंत प्राप्तिकर कायद्यानुसार ‘तोटा’ होत नाही.

कंपनीतील ठेवीचे किंवा बँकेतील ठेवीचे पैसे गुंतवणूकदाराला मिळत नाहीत किंवा कमी मिळतात तेव्हा ती ठेव कोणाला विकली जात नाही त्यामुळे ती ‘हस्तांतरित’ होत नाही. त्यामुळे प्राप्तिकर कायद्यानुसार हा तोटा होत नाही. त्यामुळे तो इतर उत्पन्नातून वजा करता येत नाही आणि पुढील वर्षांसाठी कॅरी फॉरवर्डसुद्धा करता येत नाही.

अशा वाढत्या घटना बघता सरकारने यात हस्तक्षेप करणे अपेक्षित आहे. कायद्यात सुधारणा करून ठेवींवर होणाऱ्या तोटय़ाची वजावट दिल्यास करदात्यांना दिलासा मिळेल.

ल्ल लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत. त्यांच्याशी pravin3966@ rediffmail.com या ई-मेलवर संपर्क साधून करविषयक प्रश्न विचारता येतील.