अजय वाळिंबे

वर्ष १९५२ मध्ये कॅडिला लॅबॉरेटरीजची स्थापन झाल्यानंतर १९९५ मध्ये कंपनी आणि तिचा विस्तार होऊन झायडस कॅडिलाची स्थापना झाली. आज कॅडिला हेल्थकेअर ही आघाडीची एकात्मिक औषध निर्माती कंपनी बनली असून औषधी उत्पादनांच्या संशोधन, विकास, उत्पादन, विपणन आणि वितरणात कार्यरत आहे. भारतातील पहिल्या पाच कंपन्यात गणना असलेल्या या कंपनीचा अमेरिकेतील आघाडीच्या १० कंपन्यांत समावेश होतो. पशू आरोग्यनिगा क्षेत्रातील देखील ती भारतातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. गेल्या २५ र्वषात कंपनीचा व्याप प्रचंड वाढला असून झायडस कॅडिला एक जागतिक स्तरावरची कंपनी समजली जाते. कंपनीच्या १२ ब्रँडचा भारतातील पहिल्या ३०० ब्रँडमध्ये समावेश आहे.

कॅडिलाकडे एकूण ३३७ एएनडीए असून त्यापैकी २३० एएनडीए गेल्या चार वर्षांत मंजूर झाले आहेत. पुढील तीन वर्षांत दर वर्षी ४० एएनडीए दाखल करण्याची तिची योजना आहे. कंपनीकडे इंजेक्टेबल्स, ओर्फन आणि स्पेशालिटी ड्रग्ससारख्या जटिल जेनेरिकची समृद्ध वाहिनी आहे. आपल्या एकूण उत्पन्नापैकी कंपनी सुमारे आठ टक्के रक्कम संशोधनावर खर्च करते.

विस्तारीकरण करताना कंपनीने दोन वर्षांपूर्वी ४,५४५ कोटी रुपयांची गुंतवणूक करून हाइन्झची ग्लुकॉन-डी, कॉम्प्लॅन, नाइसिल, आणि संपत्ती घी ही नामांकित उत्पादने विकत घेतली. नॉन अल्कोहोलिक स्टीटो हिपॅटायटीस (एनएएसएच) च्या उपचारांसाठी डीसीजीआयने मंजूर केलेले सरोगलिताझर हे जगातील पहिले औषध बनवले. सौम्य कोविड उपचारांसाठी कंपनीने नुकतेच विराफीन हे औषध बाजारात आणले असून त्याला डीसीजीआयने मंजुरी दिली आहे. सध्या १२ हून अधिक लशींचा समावेश असलेल्या पोर्टफोलिओमध्ये कॅडिला झीकोव्ह-डी ही कोविड-प्रतिबंधक लसदेखील तयार करीत आहे.

कंपनीचे मार्च २०२१ अखेर समाप्त आर्थिक वर्षांचे निकाल अद्याप जाहीर व्हायचे आहेत. तथापि डिसेंबर २०२० अखेर समाप्त तिसऱ्या तिमाहीसाठी कंपनीने ३,७९५.६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ५२७.२ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तो ३९ टक्क्य़ांनी अधिक आहे.

कॅडिलाची आतापर्यंतची वाटचाल पाहता आगामी काळात कंपनीकडून भरीव कामगिरीची अपेक्षा आहे. सध्याच्या परिस्थितीत कॅडिलासारख्या कंपन्यांचे शेअर्स पोर्टफोलियोला भक्कम आधार देऊ शकतात.

कॅडिला हेल्थकेअर लि.

(बीएसई कोड – ५३२३२१)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ५७१/-

वर्षांतील उच्चांक/ नीचांक : रु. ६०५/३१८

बाजार भांडवल :

रु.  ५८,४८१ कोटी

भरणा झालेले भागभांडवल : रु. १०२.३७ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक  ७४.८८

परदेशी गुंतवणूकदार      ५.२३

बँक/ म्यु. फंड/ सरकार    ११.४९

इतर/ जनता     ८.४०

संक्षिप्त विवरण

* शेअर गट     : लार्ज कॅप

* प्रवर्तक       : झायडस कॅडिला समूह

* व्यवसाय क्षेत्र  :  औषध निर्माण

* पुस्तकी मूल्य : रु. ११५

* दर्शनी मूल्य   : रु. १/-

* गतवर्षीचा लाभांश     : ३५०%

शेअर शिफारसीचे निकष

*  प्रति समभाग उत्पन्न :      रु. १८.०३

*  पी/ई गुणोत्तर :      ३१

*  समग्र पी/ई गुणोत्तर : २६.२

*  डेट इक्विटी गुणोत्तर : ०.४८

*  इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :    १२

*  रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड : ११.८

*  बीटा :      ०.३

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.