अजय वाळिंबे

भारतीय शेअर बाजारातील ज्या काही थोडय़ा कंपन्यांनी अनेक गुंतवणूकदारांना तसेच तिच्या भागधारकाना श्रीमंत केले त्यात आयशर मोटर्सचे नाव घ्यावेच लागेल. उत्तम व्यवस्थापन, दर्जेदार उत्पादन आणि अर्थात उत्तम गुणवत्ता यामुळे कंपनीने गेल्या दहा वर्षांत प्रचंड प्रगती केली आहे. तुम्ही १० वर्षांपूर्वी या कंपनीत १,००० रुपये गुंतवले असतील तर आज त्याचे १६,०८४ रुपये झाले असते. म्हणजेच भागधारकांना सरासरी वार्षिक परतावा ३२.०२ टक्के इतका मिळाला आहे. आज सुचवलेली आयशर मोटर्स लिमिटेड ही भारतातील सुप्रसिद्ध रॉयल एनफिल्डची उत्पादक आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात मिडलवेट मोटारसायकलींमध्ये रॉयल एनफिल्डचे नाव आहे. एनफिल्ड किंवा बुलेट हा जगातील सर्वात जुना मोटारसायकल ब्रँड आहे. एका शतकाहून जास्त म्हणजे १९०१ पासून रॉयल एनफिल्डने मोटारसायकलींचे उत्पादन करीत आहे. गेल्या काही वर्षांत कंपनीने मोटारसायकलमध्ये अनेक स्वागतार्ह बदल केले आणि ते ग्राहकांना भावलेदेखील. आता इतर परदेशी मोटारसायकलप्रमाणेच एनफिल्ड वापरायला सोपी, परंतु आकर्षक आणि तरुणांना भुलवणारी आहे. रॉयल एनफिल्ड केवळ भारतात नव्हे तर जगातील ६० पेक्षा जास्त देशांत कार्यरत आहे. ब्रिटनमधील लीस्टरशायरमध्ये कंपनीच्या आधुनिक विकास सुविधा आहेत. कंपनी जगभराचे उत्पादन तिच्या चेन्नई येथील प्रकल्पातून करते. बुलेट किंवा रॉयल एनफिल्ड हा मोटारसायकल चालकांसाठी एक अनुभवात्मक ब्रँड आहे.

मोटारसायकलींच्या व्यतिरिक्त, आयशरने स्वीडनच्या एबी व्हॉल्वोबरोबर ‘व्हॉल्वो आयशर कमर्शियल व्हेइकल्स लिमिटेड (व्हीईसीव्ही)’ संयुक्त प्रकल्प स्थापित केला आहे. इतर विकसनशील देशांप्रमाणे, भारतातील या प्रकल्पांत व्यावसायिक वाहनांचे आधुनिकीकरण केले जाते. आज व्हीईसीव्हीकडे ट्रक आणि बसेसची ९.९ ते ५५ टन अशी विस्तृत श्रेणी आहे. मध्य प्रदेशमधील पीठमपूर येथे हा प्रकल्प कार्यरत असून व्हॉल्वो समूहासाठी मध्यम डय़ुटी पाच आणि आठ लिटर इंजिनांचे आधुनिकीकरणाचे ते जागतिक केंद्र आहे.

गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीने ९,१५४ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १,८२७ कोटी रुपयांचा नक्त नफा कमवला होता. पहिल्या तिमाहीची कामगिरी कोविड १९ मुळे खराब असली तरीही येत्या वर्षभरात कंपनी पुन्हा प्रगतिपथावर असेल. दोन आठवडय़ांपूर्वी कंपनीने आपल्या १० रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या शेअरचे १ रुपयांत विघटन केले असल्याने शेअर्समधील तरलता वाढेल. सध्या १ रुपया दर्शनी मूल्य असलेला हा शेअर २,२०० रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. प्रत्येक पडझडीला दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खरेदी करावा असा हा शेअर आहे.

आजच्या परिस्थितीत ‘माझा पोर्टफोलियो’मध्ये सुचविलेले शेअर्स हे तुम्हाला खालच्या भावात मिळू शकतात. त्यामुळे गुंतवणूक एकाच वेळी न करता टप्प्याटप्प्यात करावी.

आयशर मोटर्स लिमिटेड

(बीएसई कोड – ५०५२००)

शुक्रवारचा बंद भाव : रु.  २,१८०.५५

लार्ज कॅप

प्रवर्तक :                                         सिद्धार्थ लाल

उद्योग क्षेत्र :                               मोटारसायकल / वाणिज्य वाहन

बाजार भांडवल :                                              रु. ५९,७५० कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक :                          रु.  २,३८९ / १,२४५

भागभांडवली भरणा :                                       रु. २७.३० कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक                   ४९.२८

परदेशी गुंतवणूकदार       २६.९५

बँक/ म्यु. फंड/ सरकार     ११.९९

इतर/ जनता             ११.६८

पुस्तकी मूल्य :            रु. ३६५.३०

दर्शनी मूल्य :             रु. १/-

लाभांश :                 ९७.५ %

प्रति समभाग उत्पन्न : रु. ५०.२

पी/ई गुणोत्तर :                  ४४

समग्र पी/ई गुणोत्तर :        ४४.६

डेट इक्विटी गुणोत्तर :        ०.०२

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : ८६.०१

रिटर्न ऑन कॅपिटल :           २४.५८

बीटा :                                  ०.९

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.