अजय वाळिंबे

गेल्या आठवडय़ात शेअर बाजारात तेजी दिसत असली तरीही त्यामुळे हुरळून जायचे काहीच कारण नाही आणि मागील लेखांत म्हटल्याप्रमाणे या वर्षांत अशा शॉर्ट टर्म रॅली येत राहतील. खरेदी-विक्रीचे धोरण बाजाराचा कल पाहून तसेच दूरदृष्टी ठेवून करणे आवश्यक आहे. सध्या जाहीर होत असलेले आर्थिक निकाल बरे वाटत असले तरीही खरे चित्र हे पुढे पहिल्या म्हणजे एप्रिल ते जून तिमाहीचे निकाल आल्यानंतर स्पष्ट होईल.

गेल्याच वर्षी हा शेअर ‘माझा पोर्टफोलिओ’अंतर्गत सुचविला होता. गुंतवणूकदारांनी कायम विश्वास ठेवावा अशा काही कंपन्या आहेत त्यांत ग्राइंडवेल नॉर्टनचा समावेश करता येईल. १९४१ मध्ये या कंपनीने भारतात ग्राइंडिंग व्हील्स तयार करण्याचे काम सुरू केले. १९९० मध्ये सेंट-गोबेन यांनी अमेरिकेतील नॉर्टन कंपनी जगभरात विकत घेतली आणि १९९६ मध्ये सेंट-गोबेनने ग्राइंडवेल नॉर्टनमधील आपले भागभांडवल वाढवून भारतातील पहिली बहुसंख्य मालकीची उपकंपनी बनविली. आज ग्राइंडवेल नॉर्टनच्या प्रमुख व्यवसायांमध्ये: अ‍ॅब्रेसिव्ह, सिरॅमिक मटेरियल बिझिनेस (सिलिकॉन कार्बाइड आणि पर्फॉर्मन्स सिरॅमिक्स अँड रेफ्रॅक्टरीज), पर्फॉर्मन्स प्लास्टिक आणि एडीएफओआरएस समाविष्ट आहेत.

जानेवारी २०१९ पासून, या समूहाने आपल्या ‘ट्रान्सफॉर्म अँड ग्रो’ प्रोग्रामअंतर्गत नवीन संघटनात्मक रचना स्वीकारली आहे. या नवीन रचनेत चार क्षेत्रीय व्यवसाय आणि जागतिक उच्च कार्यक्षमता सोल्युशन्स युनिट्स आहेत. कंपनीच्या व्यवसायांमध्ये : अ‍ॅब्रेसिव्ह, सिलिकॉन कार्बाइड, पर्फॉर्मन्स सिरॅमिक्स अँड रेफ्रॅक्टरीज, पर्फॉर्मन्स प्लास्टिक आणि अ‍ॅडफोर्स, इ.  समाविष्ट आहे. आयएनडीईसीपी (जागतिक स्तरावर सेंट-गोबेन समूहासाठी कॅप्टिव्ह इंडिया आयटी डेव्हलपमेंट सेंटर) हादेखील ग्राइंडवेल नॉर्टनचा एक भाग आहे. ग्राइंडवेल नॉर्टनची साहाय्यक कंपनी, सेंट-गोबेन सिरॅमिक मटेरियल, भूतान प्रा. लि., सिलिकॉन कार्बाइड बनवते.

कंपनीने मार्च २०२० अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांचे निकाल नुकतेच जाहीर केले आहेत. १,६१९.९४ कोटी रुपयांच्या उलाढालीवर कंपनीने १८३.८९ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो १०.१७ टक्क्यांनी जास्त आहे. गेली पाच वर्षे कंपनीचे रिटर्न ऑन इक्विटी १५ हून अधिक असून नक्त नफ्यातही कंपनीने दरसाल सरासरी १३ टक्के वाढ केली आहे. अर्थात ‘करोना इफेक्ट’ इतर क्षेत्रांप्रमाणे याही क्षेत्रावर पडणारच. त्यामुळे हा शेअर साधारण १० टक्के खालच्या भावात मिळाला तर उत्तम व्यवस्थापन असलेली ही बहुराष्ट्रीय कंपनी एक सुरक्षित आणि दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून विचार करायला हरकत नाही.

आजच्या परिस्थितीत ‘माझा पोर्टफोलिओ’मध्ये सुचविलेले शेअर्स हे तुम्हाला खालच्या भावात मिळू शकतात. त्यामुळे गुंतवणूक एकाच वेळी न करता टप्प्याटप्प्याने करावी.

ग्राइंडवेल नॉर्टन लिमिटेड

(बीएसई कोड – ५०६०७६)

शुक्रवारचा बंद भाव :                रु. ५२६/-

मिड-कॅप प्रवर्तक :                  सेंट गोबेन

उद्योग क्षेत्र :                               अ‍ॅब्रेसिव्ह

बाजार भांडवल :                   रु. ६,०३५ कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक :             रु.  ६९९/३६९

भागभांडवल भरणा :                 रु. ५५.३६ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक                                       ५८.३३

परदेशी गुंतवणूकदार                  ४.४०

बँक/ म्यु. फंड/ सरकार               २१.७६

इतर/ जनता                               १५.५१

पुस्तकी मूल्य :                          रु. १०७.०९

दर्शनी मूल्य :                                रु. ५/-

लाभांश :                                  १२० %

प्रति समभाग उत्पन्न :               रु. १६.४८

पी/ई गुणोत्तर :                           ३१.९

समग्र पी/ई गुणोत्तर :                    २४

डेट इक्विटी गुणोत्तर :                   ०.०२

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :             ५५.२८

रिटर्न ऑन कॅपिटल :                      २३.४७

बीटा :                                             ०.६

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.