अजय वाळिंबे

वर्ष १९८८ मध्ये स्थापन झालेली महाराष्ट्र सीमलेस लिमिटेड (एमएसएल) ही डी पी जिंदाल समूहाची एक प्रमुख कंपनी आहे. या समूहाच्या जिंदाल पाइप आणि जिंदाल ड्रिलिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेड या दोन इतर प्रमुख कंपन्या आहेत. कंपनीच्या नावाप्रमाणेच कंपनीचे प्रमुख उत्पादन सीमलेस पाइप्स असून इतर उत्पादनात ईआरडब्ल्यू पाइप्स आणि कोटेड पाइप्स यांचा समावेश होतो. उत्पादनाच्या वाढत्या मागणीला अनुसरून गेल्या २५ वर्षांत कंपनीने सीमलेस पाइप्सची उत्पादन क्षमता वार्षिक ५,५०,००० टनांपर्यंत वाढवली असून ईआरडब्ल्यू पाइप्सची उत्पादन क्षमता वार्षिक २,००,००० टनांपर्यंत वाढवली आहे. देशातील ईआरडब्ल्यू पाइप्सचे उत्पादन करणारी एमएसएल ही सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीची उत्पादने प्रामुख्याने तेल आणि वायू, रेल्वे, हायड्रो कार्बन, प्लम्बिंग, बेआरिंग, हायड्रॉलिक सिलिंडर्स आणि वाहन उद्योग अशा सर्वच महत्त्वाच्या क्षेत्रात वापरली जातात. याखेरीज कंपनीने राजस्थान आणि महाराष्ट्रात ४७ मेगावॉटचे रिन्युएबल एनर्जी प्रकल्प उभारले असून महाराष्ट्रात २१ मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारत आहे.

सध्या तसेच नजीकच्या काळात सरकारने पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना प्राधान्य दिले असल्याने कंपनीच्या उत्पादनांना वाढती मागणी राहील अशी अपेक्षा आहे. राजस्थानमधील बारमेर येथे हिंदुस्तान पेट्रोलियमचा ५,००० कोटी रुपयांचा प्रकल्प येत्या दोन वर्षांत कार्यान्वित होईल, उत्तर पूर्व राज्यांत तसेच संपूर्ण देशात पाइप्ड गॅसचे जाळे, स्मार्ट सिटी प्रोजेक्ट्स, मोठे गृह प्रकल्प यामुळे ईआरडब्ल्यू पाइप्सना वाढती मागणी आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेअंतर्गत २०० कोटी रुपयांपर्यंतच्या निविदेसाठी आता परदेशी कंपन्यांना सहभागी होता येणार नाही त्याचा मोठा फायदा एमएसएलसारख्या कंपन्यांना होईल. कंपनीकडे डिसेंबर २०२० मध्ये ७२८ कोटी रुपयांच्या ऑर्डर प्रलंबित आहेत.

करोना महामारीचा विपरीत परिणाम कंपनीच्या कामकाजावर झाला आहे. मात्र तरीही कंपनीने डिसेंबर २०२० अखेर संपलेल्या तिमाहीसाठी ५४४.४ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ६८.७१ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो ९.७ टक्क्यांनी कमी आहे. तर डिसेंबर २०२० साठी संपलेल्या नऊ माहीसाठी कंपनीने १,५७९.४९ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २२५ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या नऊमाहीच्या तुलनेत तो ३८ टक्क्यांनी कमी आहे. कंपनीचे वार्षिक आर्थिक निकाल लवकरच जाहीर होतील. मात्र निकाल कसेही असले तरी आगामी काळात कंपनीकडून भरीव कामगिरी अपेक्षित आहे. त्यामुळेच दोन-तीन वर्षांच्या कालावधीसाठी महाराष्ट्र सीमलेसची खरेदी फायद्याची ठरू शकेल.

महाराष्ट्र सीमलेस लि.

(बीएसई कोड – ५००२६५)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ३००/-

वर्षांतील उच्चांक/ नीचांक : रु. ३५४/१८७

बाजार भांडवल :

रु. २,०१३ कोटी

भरणा झालेले भागभांडवल : रु. ३३.५० कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक  ६३.७८

परदेशी गुंतवणूकदार      ०.९१

बँक/ म्यु. फंड/ सरकार    ६.०५

इतर/ जनता     २९.२६

संक्षिप्त विवरण

* शेअर गट     : स्मॉल कॅप

* प्रवर्तक       : डी पी जिंदाल समूह

* व्यवसाय क्षेत्र  :  पाइप्स, टय़ूब्स

* पुस्तकी मूल्य : रु. ४९३

* दर्शनी मूल्य   : रु. ५/-

* गतवर्षीचा लाभांश     : ५०%

शेअर शिफारसीचे निकष

*  प्रति समभाग उत्पन्न : रु. २३.२२

*  पी/ई गुणोत्तर :      १४

*  समग्र पी/ई गुणोत्तर : १६

*  डेट इक्विटी गुणोत्तर : ०.३२

*  इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :    ५.९६

*  रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड : १०.७

*  बीटा :      ०.६

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.