अजय वाळिंबे

रेप्को होम फायनान्स ही रेप्को बँकेकडून व्यवस्थापित गृह वित्त क्षेत्रातील कंपनी आहे. एप्रिल २००० मध्ये भारत सरकारच्या र्रिटीएटस को-ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट बँक (रेप्को बँक) या कंपनीने एप्रिल २००० मध्ये रेप्को होम फायनान्सची स्थापना केली. तमिळनाडू राज्यातील ही कंपनी हाऊसिंग फायनान्स कंपनी म्हणून राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेकडे (एनएचबी) नोंदणीकृत आहे. कंपनी वित्तपुरवठा व्यवसायात असून प्रामुख्याने दुरुस्ती व नूतनीकरण (वैयक्तिक गृह कर्ज) आणि मालमत्ता कर्जे यासह निवासी आणि व्यावसायिक मालमत्तांचे बांधकाम आणि / किंवा खरेदीकरता वित्त पुरवठा करते. कंपनीच्या तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगाल, गुजरात आणि केंद्रशासित प्रदेश पुडुचेरी अशा राज्यांमध्ये जवळपास १५० शाखा आणि २७ उपशाखा आहेत.

कंपनीच्या कर्ज-पोर्टफोलिओमध्ये नोकरदार (४७ टक्के) आणि व्यावसायिक (५३ टक्के) अशा दोन्ही कर्जदारांचा समावेश आहे. डिसेंबर २०१९ मध्ये कंपनीची एकूण मालमत्ता (अ‍ॅसेट अंडर मॅनेजमेंट – एयूएम) ११,६२५ कोटी होती, तर प्रती व्यक्ती सरासरी कर्ज वितरण १४.५ लाख रुपये होते.

सध्याच्या परिस्थितीत बांधकाम व्यवसाय आणि एकंदरीतच अर्थव्यवस्था अडचणीत असल्याने बहुतांशी गृह वित्त कंपन्यादेखील मंदीसदृश परिस्थितीचा सामना करत आहेत. परंतु जून महिन्यांत कंपनीला ६८ टक्के कर्जदारांनी कर्जाचे हप्ते भरले तर जुलै महिन्यात हे प्रमाण ७५ टक्क्य़ांवर गेले. येत्या दोन-तीन महिन्यांत ते ९५ टक्क्य़ांवर जाईल असा अंदाज आहे.

मध्यम आणि छोटय़ा शहरांमध्ये रेप्को फायनान्ससारख्या लघू गृह वित्त कंपन्यांना पुन्हा बरे दिवस येण्याची शक्यता आहे. मार्च २०२० साठी संपलेल्या आर्थिक वर्षांकरिता कंपनीने १,३४५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २८० कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. कंपनीचे यंदाच्या आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीचे निकाल लवकरच जाहीर होतील. अर्थात पहिल्या सहामाहीत कंपनीकडून विशेष कामगिरीची अपेक्षा नाही. मात्र कंपनी आपली क्षेत्र मर्यादा आणखी वाढवून तसेच नवीन क्षेत्रांपर्यंत पोहोचवून कर्ज वितरण, उत्पन्न आणि नफा वाढवू शकेल. तसेच जोखमीच्या व्यवस्थापनावर निरंतर लक्ष देऊन स्थिर मालमत्तेची गुणवत्ता कायम ठेवणे, कमी खर्चात प्रवेश करणे इ. धोरणे अवलंबून आगामी कालावधीत अपेक्षित प्रगती साध्य करू शकेल. पुस्तकी मूल्याच्या निम्म्यावर म्हणजेच १३९ रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर दोन-तीन वर्षांत चांगला फायदा देऊ  शकेल. पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर खरेदीचे धोरण ठेवल्यास फायद्याचे ठरेल.

मायक्रो कॅप

प्रवर्तक : रेप्को बँक

उद्योग क्षेत्र : गृह वित्त

बाजार भांडवल : रु. ८६८ कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक :         रु.  ३६६ / ९०

भागभांडवल भरणा : रु. ६२.५६ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक  ३७.१३

परदेशी गुंतवणूकदार      २६.७३

बँक/ म्यु. फंड/ सरकार    १८.५८

इतर/ जनता     १७.५६

रेप्को होम फायनान्स लि.

(बीएसई कोड – ५३५३२२)

शुक्रवारचा बंद भाव : रु.  १३८.८०

पुस्तकी मूल्य :  रु. २८६

दर्शनी मूल्य :   रु. १०/-

लाभांश : २.५०%

प्रति समभाग उत्पन्न :   रु. ४४.८१

पी/ई गुणोत्तर :  ३

समग्र पी/ई गुणोत्तर :    १४

डेट इक्विटी गुणोत्तर :    ५.६६

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : १.४४

रिटर्न ऑन कॅपिटल :    १०.६६

बीटा :  ०.६७

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.