अजय वाळिंबे
एक्सेल समूहाचे गोविंद श्रॉफ यांनी १९६५ मध्ये ट्रान्सपेक इंडस्ट्रीजची स्थापना केली. सुरुवातीला कंपनी प्रामुख्याने अॅक्रिलिक शीट्सचे उत्पादन करत असे. मात्र गेल्या पन्नास वर्षांत कंपनीच्या विस्तारीकरणात ट्रान्सपेक आता एक आघाडीची केमिकल्स उत्पादक कंपनी ओळखली जाते. कंपनी वस्त्रोद्योग, औषधी, कृषी रसायन, पॉलिमर इत्यादी विविध प्रकारच्या उद्योगांच्या ग्राहकांच्या गरजा भागविणाऱ्या रसायनांच्या रेंजच्या अग्रगण्य उत्पादक आणि निर्यातदारांपैकी एक आहे. ट्रान्सपेक हे भारतातील अनेक उत्पादनांचे ‘प्रथम’ निर्माता म्हणून विकसित झाले आणि त्याचबरोबर बाजाराच्या विकासासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
क्लोरिन आणि सल्फर हाताळण्याच्या आपल्या कौशल्यामुळे कंपनीने थिओनिल क्लोराइड आणि क्लोरो-अॅसेटिल क्लोराइडसारख्या क्लोरिनयुक्त रसायनांसाठी स्थानिक स्वरूपाची प्रक्रिया विकसित केली आहे. आज ट्रान्सपेकची थिओनिल क्लोराइडची क्षमता युरोपबाहेरील सर्वात मोठी आहे. त्यामुळेच कंपनी एक आघाडीची निर्यातदार देखील आहे.
कंपनीच्या प्रमुख उत्पादनात थिओनिल क्लोराइड, सल्फर डायक्लोराइड, सल्फर मोनोक्लोराइड, ओलियम, सल्फर ट्रायऑक्साइड, सल्फ्युरिक अॅसिड, सल्फर डायऑक्साइड इ. अनेक केमिकल्सचा समावेश होतो. कंपनीचा अद्ययावत उत्पादन प्रकल्प बडोद्यातील एकल्बरा येथे आहे. कंपनीच्या उत्पादनांना जागतिक स्तरावर मोठी मागणी असून, एकूण उलाढालीपैकी ८० टक्क्य़ांहून अधिक उलाढाल निर्यातीतून आहे. ट्रान्सपेकची क्लोरिनेटेड उत्पादने प्रामुख्याने कॉस्मेटिक्स, डाईज, पॉलिमर, अॅग्रोकेमिकल्स, स्पेशलिटी केमिकल्स तसेच औषध निर्मिती क्षेत्रात वापरली जातात. आपल्या उत्पादनांसाठी कंपनीने अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांशी दीर्घ मुदतीचे करार केले आहेत.
सप्टेंबर २०२० तिमाहीअखेर कंपनीची कामगिरी सुमार असून करोना महामारीचा तो परिणाम आहे. कंपनीने या काळात ७७.३ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ६० लाखांचा नफा कमावला आहे. मात्र विविध क्षेत्रांना आपली दर्जेदार उत्पादने पुरवणाऱ्या ट्रान्सपेककडून आगामी काळात भरीव कामगिरीची अपेक्षा आहे. केवळ ‘बीएसई’वर नोंदणी असलेली ट्रान्सपेक एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून आकर्षक वाटते.
आपल्या पोर्टफोलियोची कामगिरी कशी आहे याची उत्सुकता वाचक गुंतवणूकदारांना नक्कीच असेल. करोनाकाळात आणि मंदीच्या सावटात देखील नवीन उच्चांक गाठणारा शेअर बाजाराचा निर्देशांक २०२०च्या शेवटच्या आठवडय़ातही घोडदौड चालूच ठेवेल आणि आपल्या पोर्टफोलियोला उदंड नफा देईल या आशेवर नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा!
ट्रान्सपेक इंडस्ट्रीजच्या उत्पादनांना जागतिक स्तरावर मोठी मागणी असून, एकूण उलाढालीपैकी ८० टक्क्य़ांहून अधिक उलाढाल निर्यातीतून आहे. ट्रान्सपेकची क्लोरिनेटेड उत्पादने प्रामुख्याने कॉस्मेटिक्स, डाईज, पॉलिमर, अॅग्रोकेमिकल्स, स्पेशलिटी केमिकल्स तसेच औषध निर्मिती क्षेत्रात वापरली जातात. आपल्या उत्पादनांसाठी कंपनीने अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांशी दीर्घ मुदतीचे करार केले आहेत
ट्रान्सपेक इंडस्ट्रीज लि.
(बीएसई कोड – ५०६६८७)
शुक्रवारचा बंद भाव : रु. १,५५३/-
स्मॉल कॅप
प्रवर्तक : गोविंद श्रॉफ
व्यवसाय : केमिकल्स
बाजार भांडवल : रु. ८६८ कोटी
वर्षभरातील उच्चांक/नीचांक : रु. २,१९२/ १,०७७
भागभांडवली भरणा : रु. ५.५९ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ५८.३५
परदेशी गुंतवणूकदार १.९९
बँक/ म्यु. फंड/ सरकार १.०५
इतर/ जनता ३८.६१
पुस्तकी मूल्य : रु. ६३८.०८
दर्शनी मूल्य : रु. १०/-
लाभांश : १२५%
प्रति समभाग उत्पन्न : रु. १०४.६८
पी/ई गुणोत्तर : १४.८
समग्र पी/ई गुणोत्तर : २२.४
डेट इक्विटी गुणोत्तर : ०.१६
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : ६.२८
रिटर्न ऑन कॅपिटल : २३.८४
बीटा : ०.९
सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 28, 2020 12:07 am