दीपक गोडबोले
विमा कंपनीला थोडय़ाशा प्रीमियममधून मोठी रक्कम देणे कसे शक्य होते?

कुटुंबातील महत्त्वाच्या कमावत्या व्यक्तीचा अकस्मात मृत्यू झाल्यास, कुटुंबीयांना सुरक्षिततेची भावना देण्याचे महत्त्वाचे कार्य जीवन विमा करतो. विमा कंपनीकडून मिळालेल्या भरपाईतून कर्जाचे हप्ते भरणे, मुलांचे शिक्षण इ. गोष्टी अविरत चालू राहू शकतात.

environment, elections, nations,
चारशे कोटी विसरभोळे?
Efforts to encroach on flamingo habitat for construction projects in Navi Mumbai
नवी मुंबईत फ्लेमिंगो अधिवासाचा गळा घोटला जातोय का? सरकारी यंत्रणाच ऱ्हासास कारणीभूत?
Why MHADA will not build houses in high income group
म्हाडाकडून यापुढे उच्च उत्पन्न गटातील घरांची निर्मिती नाही?
should i file income tax
विश्लेषण : लगेचच आयटीआर दाखल करण्यासाठी घाई का करू नये?

तथापि विमा कंपनीला थोडय़ाशा प्रीमियममधून मोठी रक्कम देणे कसे शक्य होत असेल? विमा कंपनी अनेक लोकांकडून छोटय़ा रकमा जमा करते आणि काही दुर्दैवी लोकांना पॉलिसीत नमूद केलेल्या घटनांच्या घटितामुळे एक मोठी रक्कम देऊ  करते. प्रीमियम प्राप्ती आणि दाव्यांचे निवारण (क्लेम पेमेंट) यामध्ये अवधी असल्याने विमा कंपन्या प्रीमियम रकमेची चांगल्या प्रकारे गुंतवणूक करतात आणि चांगला परतावा मिळवतात. त्याचबरोबर विमा कंपन्यांनी केलेली गुंतवणूक देशाच्या प्रगतीतही उपयोगी पडते. कारण विमा कंपन्या लांबच्या अवधीसाठी गुंतवणूक करतात व त्यातून विकास प्रकल्पांना निधी उपलब्ध होतो.

आकस्मिक दुर्दैवी मृत्यू किंवा खूप दीर्घ आयुष्य या दोन्ही बाबी मानवाला सतावत असतात. त्यामुळे, विमाकर्त्यांकडे जोखीम हस्तांतरित करून जीवन विम्याद्वारे आर्थिक संरक्षणाबरोबरच मानसिक शांतता आणि निश्चिंतता प्राप्त होऊ  शकते. आकस्मिक दुर्दैवी मृत्यूच्या समस्येसाठी जीवन विमा तर दीर्घ आयुष्य जगण्याच्या काळजीसाठी विमा कंपन्या पेन्शनचा पर्याय उपलब्ध करून देतात.

तरुण लोकांसाठी कमी विमा हप्ता आकारला जातो आणि वयस्कांसाठी तो जास्त असणे स्वाभाविक आहे. कारण जसजसे वय वाढते तसतशी आयुष्याची जोखीमही वाढते. त्यामुळे जीवन विम्याचे कवच कमी वयात प्राप्त करणे सयुक्तिक ठरते. पण नक्की किती रकमेचा जीवन विमा करावा हा प्रश्न पडणे साहजिक आहे. प्रत्येक मालमत्तेचे एक ठरावीक मूल्य असते, पण मानवी जीवनाचे मूल्य कसे ठरवायचे? मानवी जीवनाचे मूल्य ठरवण्यासाठी प्राध्यपक  ह्य़ुबनेर यांनी विकसित केलेली ‘ह्य़ुमन लाईफ व्हॅल्यू (एचएलव्ही)’ ही संकल्पना उपयोगी ठरते.

जीवन विमा कंपन्या विविध पॉलिसींचे पर्याय उपलब्ध करीत असतात. आपण आपल्या गरजांनुसार त्यातून आपल्याला उपयुक्त पर्याय निवडायचा असतो. यासाठी विमा एजंट किंवा ब्रोकर आपली मदत करू शकतो. आपण विमा कंपनीच्या संकेतस्थळावरूनही विम्याची निवड करू शकतो. आता इंटरनेटद्वारे विमा एकत्रीकरण करणाऱ्या संस्थांमार्फत, विविध कंपन्यांच्या पॉलिसींची तुलना करून सर्वोत्तम पर्याय निवडण्याची देखील सोय उपलब्ध आहे.

पारंपरिक जीवन विम्याचे मुख्य पर्याय म्हणजेच मुदत विमा/ टर्म विमा योजना, संपूर्ण जीवन/ होल लाइफ विमा योजना आणि एंडोमेंट विमा योजना. मुदत विमा/ टर्म विमा केवळ करारात नमूद केलेल्या काळासाठी वैध असतो. खूप कमी प्रीमियम भरून खूप जास्त कव्हरेज प्राप्त करणे टर्म पॉलिसीमध्ये शक्य होते. या पॉलिसीमध्ये विमाधारकासाठी बचत किंवा रोख मूल्य घटक नसतो. पॉलिसीच्या कालावधीत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास संपूर्ण रक्कम मिळते. मात्र टर्म संपल्यावर विमाधारकास कोणतीच रक्कम मिळू शकत नाही. संपूर्ण जीवन विमा किंवा होल लाइफ इंश्युरन्समध्ये विमाधारकाच्या निधनानंतर विमा कंपनी वारसास क्लेमची संपूर्ण रक्कम देऊ  करते. मृत्यू कधी झाला याला महत्त्व नसते. या प्रकारच्या विम्याचे प्रीमियम हे टर्म विम्यापेक्षा खूपच जास्त असते. एंडोमेंट विमा योजनेत मृत्यू झाल्यास किंवा न झाल्यासही रक्कम मिळण्याची सुविधा असते. मनी बॅक विमा पर्याय या प्रकारात मोडतो.

अपारंपरिक जीवन विम्याचेही अनेक पर्याय आहेत जसे युनिव्हर्सल लाइफ/ व्हेरिएबल लाइफ आणि युनिट लिंक्ड इन्शुरन्स. एखाद्या व्यवसायाला व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाच्या व्यक्तीच्या नसण्याने होणाऱ्या नुकसानीसाठी ‘की मॅन इन्शुरन्स’चा पर्यायही जीवन विमा कंपन्यांकडे उपलब्ध असतो. यामध्ये महत्त्वाच्या व्यक्तीची विमा पॉलिसी ही मुदत पॉलिसी असते, ज्यात विमा आश्वासित रक्कम त्या प्रमुख व्यक्तीच्या उत्पन्नापेक्षा कंपनीच्या फायदा मिळवण्याच्या क्षमतेशी संबंधित असतो.

लोकसंख्येच्या आधारावर भारताचा क्रमांक जगात दुसरा आहे. मात्र भारतीय जीवन विमा बाजारपेठ ही प्रीमियमच्या आधारे जगात १०व्या स्थानावर आहे. म्हणजेच जीवन विम्याच्या बाबतीत भारतात म्हणावी तशी जागरूकता दिसत नाही. लोकांच्या जीवनाशी जीवन विम्याचा संबंध आहे आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी तो जरूरही आहे. जीवन विम्याचे महत्त्व समजून घेऊन कमी विम्याच्या प्रीमियमचा फायदा घेण्यासाठी तरुणांनी जीवन विम्याविषयी जाणकार बनणे आवश्यक आहे.

जीवन विम्याशी संबंधित लक्षात घ्यावयाची काही महत्त्वाची संज्ञावली:

# प्रीमियम/ विमा हफ्ता : विमा खरेदी करण्यासाठी विमाधारकाने विमा कंपनीला अदा केलेली रक्कम.

# व्यपगत (लॅप्सेशन) आणि पुनरुज्जीवन (रिव्हायव्हल) : दिलेल्या कालावधीत प्रीमियमचा भरणा न केल्यास पॉलिसी बंद होते, पण अशी पॉलिसी पुनरुज्जीवित करणे शक्य असते.

# नॉमिनेशन/ नामनिर्देशन : विमाधारकाच्या मृत्यूनंतर विम्याची आश्वासित रक्कम मिळण्यासाठी केलेला  व्यक्तीच्या नावाचा प्रस्ताव. अशा व्यक्तीस अदा केल्या जाणाऱ्या विम्याच्या रकमेला स्वीकारण्याचा अधिकार असतो.

# असाइनमेंट/ निर्देशन : म्हणजे हक्क, शीर्षक आणि विम्याच्या पॉलिसीतील स्वारस्य यांचे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरण.

# सव्‍‌र्हायव्हल बेनेफिट : विमा कंपनीने विमाकर्त्यांस ठरावीक कालावधीनंतर देण्याची रक्कम.

# पॉलिसी सरेंडर/ समर्पण : विमाधारकाने स्वत:हून पॉलिसी बंद केल्यास त्याला विमा कंपनीतर्फे मिळणारी रक्कम.

# पुरवणी फायदे/ रायडर बेनिफिट्स : ‘रायडर’अंतर्गत विमा कंपनीतर्फे उपलब्ध करण्यात येणारी रक्कम.

#  मृत्यूचा विमा हक्क/ म्यॅच्युरिटी क्लेम : विमाधारकाच्या मृत्यूमुळे दाव्याचे भुगतान.

# परिपक्वता विमा हक्क/ मॅच्युरिटी क्लेम  : विमाधारकाला मुदतीच्या शेवटी देण्याची रक्कम.

* लेखक भारतीय विमा संस्थान, मुंबईचे सेक्रेटरी जनरल म्हणून कार्यरत

secretarygeneral@iii.org.in

लेखातील विचार ते प्रतिनिधित्व करत असलेल्या संस्थेचे नसून लेखकाचे स्वत:चे आहेत.