|| सुधीर जोशी

वार्षिक किंवा तिमाही निकालांपूर्व काळात मोठ्या कंपन्यांकडून अपेक्षा जास्तच वाढून कंपनीचे समभाग नवी शिखरे गाठत असतात. निकालांनंतर त्यामधील उत्सुकता संपते व समभाग खाली येतात. बाजाराचे हे एक नेहमी अनुभवास येणारे वर्तन आहे. प्रख्यात कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा काळच संधीचा असतो.

करोनामुळे जाहीर झालेली महाराष्ट्रातील १५ दिवसांची टाळेबंदी, फेब्रुवारीमध्ये उणे ३.६ टक्क्यांनी झालेली औद्योगिक उत्पादनाची अधोगती, महागाईचे वाढते आकडे अशा नकारात्मक घटनांचे पडसाद बाजारावर गेल्या सप्ताहात उमटले. यामुळे सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी हाहाकार माजवत बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीने झाली. सेन्सेक्स १७०० अंशांनी गडगडला होता. नंतर परदेशी बनावटीच्या व मान्यतेच्या लशी भारतात वापरण्याची सरकारने दिलेली परवानगी व रेमडेसिविरच्या अतिरिक्त उत्पादनास दिलेली मंजुरी बाजाराच्या जखमांवर फुंकर घालणारी ठरली. तरीही सप्ताहअखेर प्रमुख निर्देशांकानी दीड टक्क्यांचे नुकसान सोसले. आरोग्यनिगा क्षेत्रवगळता सर्वच क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये घसरण झाली.

टीसीएस व इन्फोसिस या भारतातील अग्रक्रमावरील दोन माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे वार्षिक निकाल बाजाराच्या वाढलेल्या अपेक्षांची पूर्तता करू शकले नाही. परिणामी टीसीएसचे समभाग निकालानंतर चार टक्क्यांहून जास्त घसरले तर इन्फोसिसच्या निकालपूर्व तेजीला खीळ बसली. इन्फोसिसच्या नफ्यात वार्षिक तुलनेत सोळा टक्के वाढ झाली. कंपनीने ९२०० कोटींची समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) योजना जाहीर केली जिचा भागधारकांना फायदा मिळेल. दोन्ही कंपन्यांनी पुढील वर्षासाठी उत्पन्नात दोन आकडी वाढीचे निर्देश दिले आहेत तसेच दोन्ही कंपन्या मोठ्या प्रमाणात नोकर भरती करणार आहेत. इन्फोसिसच्या समभागांना बाजारात पाठबळ मिळेल कारण कंपनी १,७५० रुपयांपर्यंतच्या किमतीमध्ये समभाग पुनर्खरेदी करणार आहे. त्यामुळे सध्या घसरलेल्या किमतीत गुंतवणुकीची संधी आहे. विप्रोचे निकाल मात्र बाजाराच्या अपेक्षेपेक्षा समाधानकारक आले. निकालानंतर समभाग नऊ  टक्क्यांनी वाढून वर्षभरातील उच्चांकपदी पोहोचला. नवीन व्यवस्थापैकीय चमूने केलेल्या बदलाचे परिणाम लवकरच फळू लागले आहेत. तरीही कॅपको कंपनीच्या अधिग्रहणाने भविष्यात काही काळ नफ्यावर दबाव राहील. माहिती तंत्रज्ञान क्षेत्र सध्याच्या काळात सर्वच उद्योगांचे तारणहार बनले आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन वर्षांसाठी यामधील गुंतवणूक सुरक्षित व अधिक फलदायी समजली जाते.

वार्षिक किंवा तिमाही निकालांपूर्व काळात मोठ्या कंपन्यांकडून अपेक्षा जास्तच वाढून कंपनीचे समभाग नवी शिखरे गाठत असतात. निकालांनंतर त्यामधील उत्सुकता संपते व समभाग खाली येतात. बाजाराचे हे एक नेहमी अनुभवास येणारे वर्तन आहे. प्रख्यात कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा काळच संधीचा असतो.

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा खरे तर पहिल्या लाटेपेक्षा जास्त मोठा व जलद पसरणारा आहे. पण गेल्या वर्षासारखी त्यावर बाजारात तीव्र प्रतिक्रिया उमटलेली नाही. कारण अंशत: टाळेबंदीमुळे सेवा क्षेत्रे सोडली तर बाकीचे उद्योग सुरू आहेत. घरातून काम करण्याची सवय बऱ्याच जणांच्या अंगवळणी पडली आहे. पुन्हा एकदा नेस्ले, ब्रिटानिया, डाबर, गोदरेज कन्झ्युमर, टाटा कन्झ्युमर, आयटीसीसारख्या कंपन्यांना हा काळ लाभदायी ठरेल. पण कामगारांच्या स्थलांतराचा फटका बांधकाम व रस्ते बांधणी क्षेत्रातील एनसीसी, अशोका बिल्डकॉन, एनबीसीसी, लार्सन अँड टुब्रो सारख्या कंपन्यांना बसू शकतो. ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव शहरी क्षेत्रापेक्षा कमी प्रमाणात आहे. गेल्या दोन वर्षांप्रमाणे या वर्षीदेखील समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे. शेती हा अत्यावश्यक क्षेत्रात मोडणारा व्यवसाय आहे. यामुळे शेती उत्पन्न समाधानकारक राहण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी ट्रॅक्टरची विक्री मालवाहू वाहनांपेक्षा जास्त झाली. प्रवासी वाहनांच्या विक्रीतही ग्रामीण परिसराचा टक्का वाढला. त्यामुळे एस्कॉट्र्स व महिंद्र अँड महिंद्र या कंपन्यांतील गुंतवणुकीकडे अपेक्षेने पाहता येईल.

सध्याची टाळेबंदी तीन-चार महिने राहिली किंवा निर्बंध आणखी कडक झाले तर मात्र त्याचे परिणाम उद्योग जगतावर पुढील सहा महिन्यांत दिसून येतील. रोजगार बुडल्यामुळे मागणीत होणारी घट नक्कीच त्याचे परिणाम दाखवेल. वार्षिक निकालांकडे नजर ठेवून गुंतवणूकदारांनी समभागात येणाऱ्या अवास्तव तेजीमध्ये नफावसुली करायला हवी व प्रगतीची क्षेत्रे हेरून चोखंदळपणे ठरावीक कंपन्याच पोर्टफोलियोमध्ये राखून ठेवाव्यात.

sudhirjoshi23@gmail.com