|| भक्ती रसाळ

करोना विमा दावे दाखल करताना, ‘इर्डा’ने काही ‘नॉन मेडिकल’ किंवा ‘बिगर-वैद्यकीय’ खर्चांना सूचीबद्ध केले आहे ज्यांची दाव्यांद्वारे भरपाई करता येत नाही. असे कोणकोणते खर्च आहेत याची माहिती करून घेतली पाहिजे…

राज्यात करोनाची दुसरी लाट तीव्र वेगाने पसरत आहे. संचारबंदी, कडक निर्बंध लागू झाले आहेत, परंतु विमा सेवा क्षेत्र अत्यावश्यक सुविधेअंतर्गत कार्यरत आहे. सुरक्षाकवच म्हणून विमा उद्योगाची नियंत्रक – ‘इर्डा’ने गेल्या करोनाच्या टाळेबंदीत केवळ करोना विमा पॉलिसी बाजारात उपलब्ध करून दिली आहे. ज्या पॉलिसीधारकांना विमा हप्ते परवडत नाहीत किंवा केवळ कोविड आजारांशी निगडित विमा सुरक्षा घेणे गरजेचे वाटते ते स्वत : च्या कुटुंबासाठी ‘कोविड कवच’ विमा घेऊ शकतात. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या पॉलिसी ग्राहकाला ‘कोविड चाचणी’ न देता उपलब्ध आहेत.

जर गेल्या महिनाभरातील प्रवासाविषयक माहिती, साधारण लक्षणे, कोविड-बाधित रुग्णाशी संपर्क, चालू आजारासंबंधित माहिती विमा कंपनीला दिली तर कोणतेही ‘स्वघोषित आजारांचा इतिहास नसलेले’ नागरिक या विमा पॉलिसी ताबडतोब विकत घेऊ शकतात. केवळ १५ दिवसांच्या प्रतीक्षा काळानंतर घरगुती कोविड उपचार, तसेच रुग्णालयातील उपचार यांविषयीची तरतूद या विमा पर्यायांद्वारे शक्य आहे. इतर आजारांचा इतिहास असलेले नागरिक वाढीव प्रीमियम भरून हा विमा घेऊ शकतात. कर्मचारी समूह विमा तसेच चालू आरोग्यविमा पॉलिसीतही ‘इर्डा’च्या नवीन आदेशांनुसार कोविड सुरक्षाकवच दिले गेले आहे.

सारांश, या दुसऱ्या लाटेत आपण विमासुरक्षा कवचाच्या आधारे आर्थिकदृष्ट्या खंबीर बनविले गेलो आहोत. गेल्या खेपेतील अस्थिरता आज नाही. त्यामुळे करोना विमादाव्यांबाबत पॉलिसीधारकाने कोणती काळजी घ्यावी आणि कुटुंबाला कसे माहितीद्वारे सुसज्ज ठेवावे ते थोडक्यात पाहू या –

१) सध्याच्या परिस्थितीत करोना साथीमुळे फार मोठ्या प्रमाणात नागरिक संक्रमित झाले आहेत, रुग्णालयांतील जागा अपुऱ्या पडत आहेत त्यामुळे टेलीमेडिसीनद्वारे गंभीर लक्षणे नसलेले रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. अशा परिस्थितीत कागदपत्रांची योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे. घरी उपचार घेताना दैनंदिन नोंदी, औषधे, इंजेक्शन यांची लिखित नोंद उपचारादरम्यान ठेवावी. डॉक्टरांना, रुग्णालयांना स्वतङ्मच्या विमाविषयक गरजांची कल्पना द्यावी जेणेकरून कागदपत्रे गहाळ होणार नाहीत.

२) कोविड चाचणी अहवाल नकारात्मक आल्यानंतर, लक्षणे विरहित काळातील औषधे यांचीही नोंद ठेवावी.

३) करोना रुग्णाच्या उपचारादरम्यान वापरात येणारी पीपीई किट्स, ग्लोव्हज, मास्क यांचाही खर्च संबंधित रुग्णालयाकडून  किंवा डॉक्टरांकडून आवर्जून मागवावा.

४) आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची जर विमा पॉलिसी घेतली असेल तर प्रत्येक सदस्यांच्या चाचणीचे दस्तऐवज नोंदवहीत ठेवावेत. कारण कुटुंबातील काही सदस्य काही काळानंतर कोविडने बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

५) आपल्या ‘हेल्थ कार्डा’विषयीची माहिती आपल्या मोबाइल फोनमध्येही नोंद करावी, आकस्मिक रुग्णालय भरतीत जेव्हा रुग्णाच्या नातेवाईकांची धांदल होते तेव्हा विमाविषयक माहिती सहज उपलब्ध होण्यास मदत होते.

६) करोनाची दुसरी लाट कल्पनातीत आहे. रुग्णाची परिस्थिती अचानक काळजी वाढवते, तसेच आरोग्य कर्मचारी वर्ग गेले कित्येक महिने अनाकलीय समस्यांना तोंड देत आहे अशा परिस्थितीत स्वत: रुग्ण, जवळचे नातेवाईक हवालदिल असताना विम्याच्या दाव्यांविषयक कागदपत्रांची हेळसांड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विमा एजंटशी कायम संपर्कात असणे अत्यावश्यक आहे. जर असा संपर्क काही कारणास्तव तुटला असेल तर पुन्हा संपर्क साधा. एजंटासारखी त्रयस्थ व्यक्ती तुम्हाला जास्त शिताफीने मदत आणि मार्गदर्शन करू शकेल.

७) विमा कंपनीचे ई-मेल, संपर्क क्रमांक, मोबाइल अ‍ॅप, संकेतस्थळ सगळेच एका ठिकाणी नोंदवून ठेवा. आकस्मिक रुग्णालय भरतीच्या प्रसंगी कोणत्याही मार्गाने विमा दाव्याविषयक सूचना नोंदवणे सोपे जाईल.

८) रुग्णालयात भरती करताना दिलेली कच्ची पावती किंवा प्रसंगी ऑनलाइन किंवा डेबिट कार्डद्वारे अथवा यूपीआय वगैरे मार्गांनी केलेले देयक व्यवहार, खर्चाच्या नोंदी जसे कार्डावरील विनिमयानंतर मिळणारी बँकेची स्लिप, यूपीआयद्वारे केलेल्या व्यवहाराची नोंदसुद्धा जपून ठेवावी. आपल्या बिलांची ताळेबंद खात्री करताना या नोंदी तारीख आणि वेळेसकट उपलब्ध असाव्यात.

९) ‘इर्डा’ने काही ‘नॉन मेडिकल ’ किंवा ‘बिगर-वैद्यकीय’ खर्चांना सूचीबद्ध केले आहे ज्यांची दाव्यांद्वारे भरपाई करता येत नाही. असे कोणकोणते खर्च आहेत याची माहिती आधीच करून ठेवा.

१०) करोनाविषयक विमा दाव्यांत रुग्णालयातून घरी परतल्यावर दोन महिन्यांचा काळही विमा सुरक्षेत सामावून घेतला आहे. करोना रुग्णाला घरी परतल्यावर इतर आजारांची मालिका सुरू होण्याची शक्यता असते तेव्हा बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा डॉक्टरांना संपर्क करणे भाग असते. या काळातील वैद्यकीय चाचण्याच्या खर्चाची, बिलांचीदेखील दखल घेणे क्रमप्रात आहे.

आपण सगळे एका विलक्षण जोखमीचा सामना करत आहोत. असे असामान्य संकट समोर असताना सामाजिक सहसंवेदनेची जास्त गरज आहे. येणारा काळ एक समाज म्हणून आपला कसोटी काळ असणार आहे. आर्थिक मनोधैर्य खचू द्यायचे नसेल तर सुरक्षिततेसाठी विमा कवचाची ढाल आज हाती आहे हीच आपली जमेची बाब!

लेखिका पात्रताधारक वित्तीय नियोजनकार आणि व्यावसायिक विमा सल्लागार

bhakteerasal@gmail.com