|| अजय वाळिंबे

कमिन्स इंडिया लिमिटेड (बीएसई कोड – ५००४८०)

कमिन्स इंडिया लिमिटेड ही अमेरिकेतील कमिन्स इंक या बहुराष्ट्रीय कंपनीची उपकंपनी असून, डिझेल आणि नैसर्गिक वायु इंजिन बनवणारी ती भारतातील एक आघाडीची कंपनी आहे. कमिन्स इंडिया केवळ इंजिन उत्पादकच नव्हे तर त्यांचे विपणन, वितरण तसेच विक्रीपश्चात सेवाही पुरवते. औद्योगिक, वाहन, ऊर्जा, इंजिनीअरिंग, शेती तसेच इतर व्यवसायांना इंजिन्सपुरवठा करणारी कमिन्स इंडिया ही भारतातील कमिन्स समूहाची सर्वात मोठी कंपनी आहे.

इंजिन्सच्या समवेत कंपनी प्रत्येक उद्योगाला अनुसरून इतरही सेवा पुरवते. यात प्रामुख्याने जनरेटर सेट, ट्रान्सफर स्वीचेस, फिल्टरेशन, एकझॉस्ट, फ्युएल पम्प इत्यादींचा समावेश होतो. महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांत मिळून कंपनीचे आठ कारखाने आहेत. भारतीय बाजारपेठेत कमिन्स इंडिया कायम आघाडीवर राहिली असून कंपनीचा डिझेल इंजिन्समध्ये ४०% तर एचएचपी जेन-सेट मध्ये ६२% हिस्सा आहे.

अपेक्षेप्रमाणे कंपनीचे सप्टेंबर २०१८ च्या तिमाहीचे आर्थिक निकाल गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत चांगले आहेत. कंपनीने या कालावधीत १४५१.५५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २११.५६ कोटी रुपयांचा नक्त नफा कमवला आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनते उलाढालीत २९% वाढ झाली असून नक्त नफा ३८%ने वाढला आहे. कंपनीच्या निर्यातीतही २१% वाढ होऊ न ती ४४८ कोटीवर गेली आहे. कंपनीच्या उलाढालीत ऊ र्जा क्षेत्राचा वाटा २६% असून औद्योगिक १६% तर वितरणाचा २६% वाटा आहे. सध्या रेल्वेचा वाटा केवळ ५% असला तरीही सरकारचा पायाभूत सुविधावरचा भर, नवीन रेल्वे मार्ग आणि आधुनिकीकरण यामुळे कंपनीच्या उत्पादनांना वाढती मागणी राहील. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि आखाती देशात कंपनीच्या उत्पादनांना मागणी वाढत असून यंदा तसेच आगामी आर्थिक वर्षांत उलाढालीत निर्यातीचा वाटा मोठा असेल अशी अपेक्षा आहे. काही कंपन्यांचे समभाग खरेदी करताना विशेष अभ्यास करावा लागत नाही. अशाच कंपन्यांमध्ये कमिन्सचा समावेश होतो. त्यामुळेच बिनदिक्कत खरेदीसाठी आणि एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून कमिन्स इंडियाचा विचार नक्की करावा.

(सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.)