तृप्ती राणे

म्युच्युअल फंडामध्ये इक्विटी अर्थात समभागांमध्ये गुंतवणूक असणारे निरनिराळे फंड जितके प्रचलित आहेत, तितके डेट (रोखेसंलग्न) फंड मात्र नाहीत. सर्वसामान्यांना लिक्विड फंड बऱ्यापैकी माहीत झालेले आहेत. परंतु इतर प्रकार आणि त्यांची उपयोगिता मात्र फारशी ठाऊक नसते. मग जोखीम आणि अपेक्षित परतावे यांच्याबाबतीत चुका होऊ शकतात. तेव्हा आजचा लेख निरनिराळ्या डेट फंडांची ओळख आणि त्यांची कार्यक्षमता समजून घेण्यासाठी..

आजच्या घडीला या फंड प्रकारात साधारणपणे १७ पर्याय उपलब्ध आहेत. त्यांची नावे आणि त्यांची मुख्य गुंतवणूक खालील तक्त्यामध्ये मांडलेली आहे:

(खालील कोष्टक पाहावे)

डेट फंड निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कारण प्रत्येक फंडाची जोखीम आणि गुंतवणूक उद्दिष्ट वेगळे आहे. कधी पैसे सुरक्षित ठेवायचे असतात, तर कधी नियमित मिळकत हवी असते. पोर्टफोलिओमध्ये संतुलनसुद्धा ठेवणं महत्त्वाचं असतं. शिवाय व्याज दर वाढले कीमीडियम डय़ुरेशन फंड पडतात. रेटिंग जर कमी झालं किंवा एखाद्या इश्युअरने ठरल्याप्रमाणे पैसे परत दिले नाहीत तर त्या फंडाला लगेचच डिफॉल्ट दाखवून ‘एनएव्ही’ खाली आणावी लागते. पुढे जेव्हा कधी ते पैसे येतील तेव्हा ‘एनएव्ही’ वाढते. आयएल अ‍ॅण्ड एफएस, एक्सेल, रिलायन्स कॅपिटल, डीएचएफएल, अल्टिको, रिलायन्स होम फायनान्स ही सर्व डिफॉल्टची उदाहरणं आहेत.

कर कार्यक्षमतेच्या बाबतीत डेट म्युच्युअल फंड बँकेतील मुदत ठेवींपेक्षा सरस ठरतात. मुदत ठेवीवर मिळणाऱ्या व्याजावर दर वर्षी कर बसतो. परंतु डेट म्युच्युअल फंडामध्ये जेव्हा आपण पैसे काढतो तेव्हाच कर भरावा लागतो. तीन वर्षांच्या आत पैसे काढल्यास गुंतवणूकदाराच्या स्लॅबनुसार कर लागतो. तीन वर्षांनंतर पैसे काढल्यास ‘इंडेक्सेशन’चा फायदा मिळतो आणि कमीत कमी कर भरावा लागतो.

प्रत्येक डेट फंड गुंतवणूकदाराने गुंतवणुकीच्या बाबतीत खालील मुद्दे पडताळायला हवेत :

१. गुंतवणूक कालावधी : जर गुंतवणूक कालावधी कमी असेल तर तिथे जास्त जोखीम घेता येत नाही. म्हणून मग अशा वेळी ओव्हरनाईट, लिक्विड, लो डय़ुरेशन, अल्ट्रा शॉर्ट डय़ुरेशन असे फंड योग्य आहेत. परंतु गुंतवणूक कालावधी जर ३ ते ५ वर्षांच्या असेल तर मग मीडियम डय़ुरेशन, कॉर्पोरेट किंवा डायनॅमिक बॉण्ड फंड योग्य असतात.

२. उद्दिष्ट : नियमित मिळकत की जोखीम व्यवस्थापन की नजीकच्या काळातील लक्ष्यपूर्ती? त्यानुसार गुंतवणूक पर्याय निवडायला हवा. सिस्टीमॅटिक विथड्रॉवल प्लॅन अर्थात ‘एसडब्ल्यूपी’मार्फत नियमित मिळकत हवी असेल तर एक वर्षांच्या खर्चाइतके पैसे लिक्विड फंडांमध्ये ठेवावेत. जोखीम व्यवस्थापन असेल तर एखादा चांगला डायनॅमिक बॉण्ड फंड किंवा कॉर्पोरेट बॉण्ड फंड चालेल. आर्थिक उद्दिष्टाची पूर्तता करताना जोखीम कमी किंवा नगण्य असेलेले डेट फंड निवडावेत.

३. जोखीम : व्याज दरांमधील बदल आणि डिफॉल्ट या दोन कारणांमुळे डेट फंडांना नुकसान होतं. तेव्हा फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये कुठल्या रेटिंगची गुंतवणूक आहे आणि एखाद्या इश्युअरवर जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे का हे तपासणं खूप महत्त्वाचं आहे.

४. परतावे : मुदत ठेवींप्रमाणे डेट फंड कुठल्याही मिळकतीची हमी देत नाहीत. खाली येणाऱ्या व्याज दरांमुळे दीर्घ मुदतीचे फंड बहरतात, तर वाढणाऱ्या व्याज दरांमुळे त्यांना नुकसान होतं. कधी कधी अल्पावधीत रोकडसुलभता कमी झाली तर लिक्विड किंवा लो डय़ुरेशन फंडांमध्ये फायदा होतो.

५. कर : परतावे बघताना गुतंवणूकदाराने करदायित्वाकडे सुद्धा लक्ष ठेवावं. ३० टक्के स्लॅबमध्ये असणाऱ्या गुंतवणूकदाराला डेट फंडांकडून जास्त परतावे मिळू शकतात, परंतु जो गुंतवणूकदार शून्य कर भरतो त्याला कदाचित इतर रोखे (उदा. पोस्टातील ठेवी, पंतप्रधान वय वंदन योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, कंपन्यांचे बॉण्ड/डिबेंचर) जास्त फायद्याचे ठरतात. तेव्हा गुंतवणूक करताना याही गोष्टीचा विचार करावा.

६. खर्च : प्रत्येक म्युच्युअल फंड गुंतवणूक व्यवस्थापनाचा खर्च आपल्याकडून वसूल करतो. म्हणून प्रत्येक फंडाचा एक्स्पेंस रेशो (खर्चाचे गुणोत्तर) नक्की पाहावा. एकाच प्रकारच्या म्युच्युअल फंडातदेखील ही तुलना होऊ शकते. म्हणजे लिक्विड फंडाचा एक्स्पेंस रेशो हा मीडियम डय़ुरेशनपेक्षा वेगळा असतो. डायरेक्ट प्लॅन हे रेग्युलर प्लॅनपेक्षा खर्चाच्या बाबतीत सरस असतात.

लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.

trupti_vrane@yahoo.com