21 September 2020

News Flash

इच्छापत्र : समज-गैरसमज – ‘ट्रस्ट’चे फायदे-तोटे

ही लेखमाला सुरू झाल्यापासून आपण मालमत्ता नियोजन इच्छापत्राद्वारे कसे करावे याचे अनेक पलू पाहिले.

|| दिलीप राजपूत

ही लेखमाला सुरू झाल्यापासून आपण मालमत्ता नियोजन इच्छापत्राद्वारे कसे करावे याचे अनेक पलू पाहिले. आता आपण मालमत्ता नियोजनाचे इतर पर्याय पाहू. त्यात विश्वस्त संस्था (ट्रस्ट) द्वारे नियोजनाचे उद्देश कसे साधता येतात हे समजून घेऊया.

कायद्याप्रमाणे विश्वस्त संस्था म्हणजे दायीत्व जोडलेली मालमत्ता. मालक विश्वासाने मालमत्तेचे हक्क विश्वस्त संस्थेकडे, तृतीय पक्षाच्या फायद्यासाठी समर्पित करतो. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास मालक आपल्या मालमत्तेचे हस्तांतरण दुसऱ्या व्यक्तीस करतो आणि ही दुसरी व्यक्ती स्वतसाठी नव्हे, तर तृतीय पक्षाच्या फायद्यासाठी ती मालमत्ता ताब्यात ठेवते. हा तृतीय पक्ष लाभार्थी कोण असावा हे मालक ठरवतो. जी व्यक्ती मालमत्तेचे हस्तातरण करते, त्याला ‘सेटलर’ किंवा ‘ऑथर’ असे म्हणतात. जी व्यक्ती ही मालमत्ता विश्वासाने धारण करते, ताब्यात ठेवते तिला ‘विश्वस्त’ (ट्रस्टी) असे म्हणतात. ज्या व्यक्तीच्या फायद्यासाठी मालमत्ता धारण केली जाते, अशा व्यक्तीला ‘लाभार्थी’ म्हणतात. ज्या मालत्तेचे हस्तांतरण होते त्याला ‘विश्वस्त मालमत्ता’ असे संबोधले जाते व ज्या दस्ताएवजाने ट्रस्ट घोषित करतात त्याला ‘विश्वास कृत्य’ (ट्रस्ट डीड) असे म्हटले जाते.

ट्रस्ट करण्यामागचे फायदे जाणून घेण्याआधी इच्छापत्राचे तोटे माहित करून घेणे महत्त्वाचे आहे.  इच्छापत्र मालमत्ता हस्तांतरणाचे सोपे साधन आहे , पण त्याच्या काही कमतरता आहेत. प्रथम इच्छापत्राची अंमलबजावणी करण्याकरीता काही ठिकाणी ‘प्रोबेट’ करणे गरजेचे आहे. ‘प्रोबेट’ मिळवणे ही खíचक व वेळखाऊ प्रक्रिया आहे. इच्छापत्र जरी वैध असेल तरी प्रोबेट करणे आवश्यक आहे. यामुळे लाभार्थीना मालमत्तेचा आनंद उपभोगण्यात विलंब होतो. दुसरे म्हणजे प्रोबेटची प्रक्रिया सुरू असताना त्या वेळी इच्छापत्र अवैध आहे असे आव्हान करता येते. यामुळे हस्तांतरणाला अधिक वेळ लागू शकतो व खर्चही वाढतो. तिसरे म्हणजे मालमत्तेत नवीन वाढ व विक्री झाल्यास, किंवा लाभार्थी व निष्पादक यांचे निधन झाल्यास इच्छापत्र अद्ययावत ठेवणे हे आव्हान असते. चौथे म्हणजे इच्छापत्राची अंमलबजावणी मृत्यूनंतर होते. शेवटचे म्हणजे इच्छापत्र नेहमीच कर कार्यक्षम दस्ताऐवज नसतो.

इच्छापत्रासंर्दभात असलेल्या त्रुटीवर मात करण्याचा प्रयत्न विश्वास कृत्य (ट्रस्ट) करतो.

ट्रस्ट करण्याचे काही फायदे.

१. मालमत्तेचे हस्तांतरण मालकाच्या हयातीत होते, मालमत्ता हस्तांतरणासाठी न्यायालयात प्रोबेट करावे लागत नाही .

२. हस्तांतरित मालमत्तेला कोर्टात आव्हान देता येत नाही.

३. ट्रस्ट अशा पद्धतीने संरचित करता येतो की लाभार्थ्यांना त्याचा उपभोग मालमत्तेची विक्री न करता व त्यात काही वाढ न होता देखील घेता येतो.

४. ट्रस्टचे उत्पन्न लाभार्थ्यांना ट्रस्ट करण्याऱ्या व्यक्तीच्या आयुष्यभरातदेखील वितरित करता येते. व्यवस्थित नियोजन केल्यास ट्रस्टद्वारे कर कार्यक्षमता जास्तीत जास्त वाढवता येते.

तथपि ट्रस्टचे काही प्रमुख तोटे आहेत. पहिले म्हणजे ट्रस्ट करणे ही वेळखाऊ व अतिशय खíचक प्रक्रिया आहे. त्यात कायदेशीर औपचारिकता अधिक आहेत व त्यामुळे कायदेतज्ज्ञांच्या सहाय्याशिवाय ती करता येत नाही. यातून खर्च व वेळ दोन्ही गोष्टी अधिक लागण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त ट्रस्ट चालवण्याकरिता लागणारा खर्च हा ट्रस्ट असेपर्यंत अविरत चालू राहतो.

दुसरा मुख्य तोटा म्हणजे, तुम्ही ट्रस्टला मालमत्ता हस्तांतरित केल्यावर तुमचा त्या मालमत्तेवरील अधिकार व नियंत्रण जाते. या दोन्ही गोष्टी तुमच्या हयातीच होतात. जरी काही बाबतीत तुम्ही नियंत्रण तुमच्याकडे ठेवलेत तरी मालकी हक्क मात्र राहात नाही तो सोडावाच लागतो.

ट्रस्ट करण्याचे इतरही फायदे आहेत जर का कुणी लाभार्थी मालमत्ता सांभाळण्यास असमर्थ असल्यास त्याच्या हातात उत्पन्न ‘ट्रस्ट डीड’मध्ये नमूद केलेल्या नियमांप्रमाणेच देता येते. ट्रस्ट मुळे संपत्तीचे संरक्षण करता येते.

यामध्ये अंतíनहित सिद्धांत असा की सेटलर स्वतला मालमत्तेच्या मालकी हक्कापासून विभक्त करतो व मालमत्तेचे सर्व मालकी हक्कांचे हस्तांतरण ट्रस्टला करतो, जेणेकरून सर्व मालमत्ता भविष्यात कर्जदाराच्या दाव्यापासून सुरक्षित राहू शकते.

अशा प्रकारे सेटलरच्या आयुष्यभरात संपत्ती हस्तांतरणाचे, ट्रस्ट एक माध्यम आहे. पुढील लेखात आपण ट्रस्टचे प्रकार व ट्रस्ट करण्याची प्रक्रिया समजुन घेऊया.

(या संदर्भातील आपले प्रश्न पाठविण्यासाठी ई-मेल: willassure@gmail.com)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2019 4:07 am

Web Title: deed of trust
Next Stories
1 व्यापार युद्धामुळे कापूस हंगामावर मंदीचे सावट?
2 जागतिक घटक पुन्हा वक्री दिशेला
3 होरपळलेला, पण दमदार क्षमतेचा ‘स्मॉल कॅप’!
Just Now!
X