गेली अनेक वर्ष सातत्याने चांगली कामगिरी करून दाखवणारी दीपक नायट्राईट लिमिटेड ही गुजरातच्या प्रसिद्ध दीपक समूहाची विविध रसायने उत्पादन करणारी कंपनी. कंपनीचे भारतात पाच कारखाने असून त्यातील दोन गुजरात, दोन महाराष्ट्रात तळोजा व रोहा येथे, तर एक हैदराबादमध्ये आहे. १९७० मध्ये सोडियम नायट्राईटचा प्रकल्प उभारल्यापासून कंपनीने ऑरगॅनिक, इन-ऑरगॅनिक आणि स्पेशालिटी केमिकल्स अशा अनेक उत्पादनांत आपला जम बसवला आहे.
av-13
गेल्या वर्षी १:१ बक्षीस समभाग देणाऱ्या या कंपनीचे मार्च २०१५ साठीचे आíथक निष्कर्ष जाहीर झाले आहेत. कंपनीने विक्रीत २५% वाढ नोंदवून ती १,२९७ कोटींवर तर नक्त नफ्यात १६% वाढ होऊन तो ३९.५ कोटींवर गेला आहे. कंपनीच्या निर्यातीतही ४.५% वाढ होऊन ती ५२४.५४ कोटींवर गेली आहे. खरे तर जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण आणि त्यामुळे कंपनीच्या काही उत्पादनांच्या किमतीत झालेली घट यामुळे कंपनीच्या नफ्यावर थोडा परिणाम झालेला दिसतो. परंतु यापुढे कच्च्या तेलाच्या किमतीत घट अपेक्षित नाही तसेच कंपनीची नवीन फेनोल आणि अ‍ॅसिटोन ही येऊ घातलेली उत्पादने आणि दहेजमधून वाढीव उत्पादन यामुळे यंदाचे वर्ष कंपनीस अधिक चांगले जाईल, अशी अपेक्षा आहे. केवळ ०.५ बिटा असलेली आणि सध्या ६६ रुपयांच्या आसपास असलेला हा स्मॉल कॅप शेअर सुरक्षित गुंतवणुकीसाठी योग्य वाटतो.
stocksandwealth@gmail.com
सूचना : लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्स मध्ये कुठलीही गुंतवणूक नाही तसेच या कंपनीशी कुठलाही संबंध नाही. सुचवलेल्या कंपनीकडून लेखकाने कुठलेही मानधन घेतलेले नाही.