13 July 2020

News Flash

बाजाराचा तंत्र कल : तेजीची गुगली

शनिवारी, २३ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या राजकारणात जशी गुगली टाकली गेली, तशीच हल्ली बाजारात तेजीवाले गुगली टाकत आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

आशीष ठाकूर

शनिवारी, २३ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या राजकारणात जशी गुगली टाकली गेली, तशीच हल्ली बाजारात तेजीवाले गुगली टाकत आहेत. बरोबर शुक्रवारी जोरदार मंदी येते, असे दोन खेपेला झाले आहे. सर्वजण मंदीत येतात आणि इथेच गुगली पडते. पुन्हा नव्याने सुरू होणाऱ्या आठवडय़ात मंदीचा मागमूसही नाही. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ४०,७९३.८१

निफ्टी : १२,०५६.०५

येणाऱ्या दिवसांत निर्देशांकाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा हा सेन्सेक्सवर ४०,७०० ते ४१,२०० आणि निफ्टीवर १२,००० ते १२,१५० असा असेल. हा स्तर निर्देशांकांनी राखला तर तेजीची पालवी कायम आहे हे गृहीत धरावे. येणाऱ्या दिवसांत निर्देशांक – सेन्सेक्सवर ४०,७०० आणि निफ्टीवर १२,००० चा स्तर राखण्यात अपयशी ठरल्यास तेजीच्या वातावरणात आपण एक क्षीण स्वरूपाची घसरण अपेक्षित आहे. घसरणीचे प्रथम खालचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ४०,५०० ते ४०,००० आणि निफ्टीवर ११,९५० ते ११,८०० असे असेल. इथे पायाभरणी होऊन नवीन उच्चांक सेन्सेक्सवर ४१,८०० ते ४२,५०० आणि निफ्टीवर १२,३०० ते १२,५०० चा स्तर दृष्टीपथात येईल.

जाहीर झालेले कंपन्यांचे वित्तीय निकाल आणि त्यांचे विश्लेषण..

* एसीसी लिमिटेड

या स्तंभातील १४ ऑक्टोबरच्या लेखातील समभाग होता एसीसी लिमिटेड. समभागाचा ११ ऑक्टोबरचा बंद भाव त्यासमयी १,४४२ रुपये होता व वित्तीय निकाल जाहीर झाल्यानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर १,५४० रुपये होता. लेखात म्हटल्याप्रमाणे, जर वित्तीय निकाल उत्कृष्ट असेल तर १,५४० रुपयांचा स्तर राखत वरचे लक्ष्य १,६०० रुपये होते. हे प्रत्यक्ष निकालाअगोदरचे विश्लेषण होते. एसीसी लिमिटेडचा प्रत्यक्ष निकाल उत्कृष्ट असल्याने ४ नोव्हेंबरला १,५९० रुपयांचा उच्चांक मारून १,६०० रुपयांसमीपचे लक्ष्य साध्य केले. अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांनी अवघ्या दीड महिन्यात १० टक्क्यांचा परतावा मिळविला.

* बजाज ऑटो लिमिटेड

या स्तंभातील २१ ऑक्टोबरच्या लेखातील समभाग होता बजाज ऑटो लिमिटेड. तिमाही निकालाची नियोजित तारीख ही २३ ऑक्टोबर होती. १८ ऑक्टोबरचा बंद भाव ३,०८८ रुपये होता. निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर २,८०० रुपये होता. गुंतवणूकदारांच्या मानसिक तयारीसाठी तिमाही निकालाअगोदर दोन दिवसांचा कालावधी होता. तिमाही वित्तीय निकाल जाहीर झाल्यानंतर, समभागाचा बाजारभाव महत्त्वाच्या केंद्रिबदू स्तरावर टिकला, तर तिमाही निकाल चांगला, अन्यथा वाईट.

लेखात म्हटल्याप्रमाणे जर निकाल उत्कृष्ट असेल तर २,८०० रुपयांचा स्तर राखत ३,२५० रुपयांचे वरचे लक्ष्य सूचित केले होते. हे प्रत्यक्ष निकालाअगोदरचे विश्लेषण होते. बजाज ऑटोचा प्रत्यक्ष निकाल हा उत्कृष्ट होता. २,८०० रुपयांचा स्तर राखत ८ नोव्हेंबरला ३,२८८ रुपयांचा उच्चांक नोंदवला. ज्या वाचकांकडे बजाज ऑटो दीर्घ मुदतीच्या गुंतवणूक धारणेअंतर्गत आहेत त्यांनी ते राखून ठेवले व अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत पाच टक्क्यांचा परतावा मिळविला. आजही बजाज ऑटो २,८०० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर राखत २९ नोव्हेंबरचा बंद भाव हा ३,१७६ रुपये आहे.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2019 4:05 am

Web Title: depression sensex index abn 97
Next Stories
1 नावात काय? : आयात पर्यायीकरण
2 कर बोध : कंपनी ठेव आणि तोटा
3 बाजाराचा तंत्र कल : का रे दुरावा का रे अबोला..
Just Now!
X