|| अजय वाळिंबे

वर्ष १९८९ मध्ये स्थापन झालेली बोडल केमिकल्स लिमिटेड ही डाय इंटरमीडिएट्स आणि डाय स्टफ मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात वेगाने वाढत असलेली कंपनी आहे. कंपनीच्या उत्पादनांमध्ये डायरेक्ट डाय, अ‍ॅसिड मिलिंग डाय, मेटल कॉम्प्लेक्स डाय, सीड, व्हीएस बेस्ड डाय, एच डाय, एम डाय इ. विविध रंग आणि स्पेशालिटी केमिकल्सचा समावेश होतो. गेल्या तीस वर्षांत कंपनीने रसायनिक रंग आणि उत्पादनात आपले स्थान भक्कम केले आसून कंपनीचे गुजरातमध्ये नऊ, तर उत्तर प्रदेशांत एक असे एकंदर १० उत्पादन प्रकल्प आहेत. कंपनी आणि तिच्या पाच उपकंपन्यांच्या उत्पादन वितरणासाठी देशभरात ७० वितरक असून १० डेपो कार्यरत आहेत. त्यापैकी तीन डेपो परदेशात म्हणजे प्रत्येकी बांगलादेश, तुर्कस्तान आणि चीनमध्ये आहेत. बोडल केमिकल्स लिमिटेड एक एकात्मिक आणि नावीन्यपूर्ण कंपनी आहे जी ग्राहकांना जागतिक स्तरावर एंड-टू-एंड सोल्यूशन प्रदान करते. कंपनी आज डाय इंटरमीडिएट, डाय स्टफ आणि सल्फ्युरिक अ‍ॅसिडच्या निर्यातदारांपैकी एक मोठी उत्पादक आहे.

बोडल केमिकल्स लिमिटेडचे अस्तित्व केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात आहे आणि आपल्या नावीन्यपूर्ण उत्पादने आणि सेवांसह पन्नासहून आधिक देशांमध्ये सेवा देत आहे. कंपनीने आपली उत्पादने मुख्यत्वे टेक्सटाइल, पेपर, प्लास्टिक, लेदर आणि इतर उद्योग क्षेत्रांसाठी विकसित केली आहेत. आपल्या उत्पादनांच्या वाढत्या मागणीसाठी कंपनी स्पेशालिटी बेंझीन उत्पादन क्षमता वार्षिक ५५,००० मेट्रिक टनांवरून ७८,९६० मेट्रिक टनांपर्यंत वाढवत आहे. तसेच येत्या दोन वर्षांत भरूच येथील तिचा प्रकल्पदेखील कार्यान्वित होईल. यासाठी ४०० कोटी रुपयांचा भांडवली खर्च अपेक्षित आहे. याखेरीज कंपनीने नुकताच मवाना शुगर कंपनीचा कॉस्टिक सोडा प्रकल्प १४३ कोटी रुपयांना खरेदी केला आहे.

डिसेंबर २०२० अखेर संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने ३६६.२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २६.५ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षातील तिमाहीच्या तुलनेत तो ८३ टक्क््यांनी अधिक आहे. मात्र तरीही गेल्या वर्षभरात कंपनीची कामगिरी करोना महामारीमुळे तितकीशी चांगली झालेली नाही. त्यामुळे मार्च २०२१ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाच्या निकालापेक्षा आगामी कालावधीतील निकाल अभ्यासणे महत्त्वाचे ठरेल. एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून या मायक्रो कॅपचा जरूर विचार करावा.

बोडल केमिकल्स लिमिटेड

(बीएसई कोड – ५२४३७०)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ९२/-

वर्षातील उच्चांक/ नीचांक : रु. ११०/४२

बाजार भांडवल :

रु. १,१२८ कोटी

भरणा झालेले भागभांडवल : रु. २४.४७ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक         ५९.०२

परदेशी गुंतवणूकदार  ३.२५

बँक/ म्यु. फंड/ सरकार        ०.०२

इतर/ जनता    ३७.७१

संक्षिप्त विवरण

शेअर गट   : स्मॉल कॅप

प्रवर्तक      : सुरेश पटेल

व्यवसाय क्षेत्र       :  रंग, रसायने

पुस्तकी मूल्य        : रु. ७५.६

दर्शनी मूल्य          : रु. २/-

गतवर्षीचा लाभांश          : ४०%

शेअर शिफारसीचे निकष

प्रति समभाग उत्पन्न :            रु. ४.३७

पी/ई गुणोत्तर :            २१.०९

समग्र पी/ई गुणोत्तर :    १९.७

डेट इक्विटी गुणोत्तर :            ०.१३

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :        ४.४७

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड :        ११.२

बीटा :   ०.८

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.