तृप्ती राणे

जमले का सगळे? – बेडेकर रूममध्ये आल्याबरोबर मोठय़ाने बोलले.  त्यावर जोशी उत्तरले – बघा मी म्हटलं होतं ना, वडापावचा वास नाकात गेल्याशिवाय बेडेकर येणारच नाही! आज पुन्हा मी बरोबर ठरलो.

असं म्हणून ते खो-खो हसणार इतक्यात निकम बोलले – अहो जोशी, तुम्ही तर काल रात्रीच मेनू विचारून घेतलात आणि आज पहिला नंबर लावला. ते का बरं? म्हणजे तुम्हाला आजच्या मीटिंगबद्दल आपुलकी नाही असं म्हणत नाही, पण वडापाव तुम्हालासुद्धा भुलवतो की नाही?

हे ऐकून बेडेकर म्हणाले – अरे, काहीही म्हणा, पण वडापाव चीजच अशी आहे! चला, आता उशीर करू या नको. नाश्त्याचा कार्यक्रम लवकर आटपू या! अहो सरोज वहिनी, तुमचा मिरचीचा ठेचा कुठंय? सरोज वहिनी म्हणजे ठेचा एक्स्पर्ट!

तितक्यात विद्या टेबलवर डबा ठेवत म्हणाल्या – चमचमीत खाल्ल्यावर थोडं गोडसुद्धा हवं, तेव्हा हे घ्या घरी केलेले खव्याचे गुलाबजाम!

भिसेबाई त्याला जोडत म्हणाल्या – आणि आज फक्कड फिल्टर कॉफीचा बेत आहे बरं का. खास साऊथवरून आणली आहे.

अरे वाह! – एक सुरात सगळे म्हणाले. सगळ्यांनी आपापल्या प्लेट घेऊन ठरलेल्या विषयावर चर्चा सुरू केली. आज हे सगळे जमले होते ते स्वत:च्या शेअर बाजारातील गुंतवणूक पद्धती आणि त्यातून झालेला फायदा सांगण्यासाठी.

बेडेकर वडय़ाचा आस्वाद घेत म्हणाले – चला, सुरुवात मी करतो! मी गेली ३५ वर्ष थेट गुंतवणूक करत आहे. सुरुवातीची अनेक वर्षे टिप्सनुसार गुंतवणूक करण्यात गेली; पण नंतर स्वत:चा अभ्यास करायला शिकलो आणि गेली आठ वर्ष त्यानुसार शेअर निवडतो; पण गुंतवणूक करताना एक नियम नेहमी पाळला – पसा घातला की दहा वर्ष बघायचं नाही. त्यातून एक फायदा झाला, की रोज किमती बघितल्या नाही आणि गुंतवणूक वाढायला चांगला वेळ मिळाला; पण त्याची उलट बाजू म्हणजे काही ठिकाणी नुकसानसुद्धा झालं. जर लक्ष दिलं असतं तर नुकसान कमी करू शकलो असतो.

त्यावर त्यांच्या सौ. विद्या म्हणाल्या – खरं सांगायचं तर लवकर श्रीमंत व्हायचं म्हणून शेअर बाजारात उतरावं असं कुठे तरी ऐकलं आणि मी थेट गुंतवणुकीची सुरुवात केली; पण यांचं ऐकायचं नाही आणि आपण स्वत:चा पोर्टफोलिओ बनवायचा असा निश्चय मनाशी केला. यांना न सांगता मी एका ब्रोकरकडे जाऊन खातं उघडलं, पशांचे व्यवहार केले. अर्थात माझ्या पगारातून हे सगळं चाललं होतं; पण २००० साली चांगलाच फटका बसला. त्या ब्रोकरने माझ्या खात्यात काय गोंधळ घातला माहीत नाही, पण त्याच्यावर नंतर लोकांना फसवल्याचा गुन्हा दाखल झाला. माझी श्रीमंत व्हायची स्वप्नं विरून गेली. हे जेव्हा आमच्या यांना सांगितलं, तेव्हा चांगलीच कानउघाडणी झाली माझी; पण तिथून पुढे मात्र फक्त माहीत असलेल्या कंपन्या घ्यायच्या ठरवल्या आणि दरमहा त्यात पैसे टाकत गेले – स्टेट बँक, एचडीएफसी, आयटीसी, नेस्ले, रिलायन्स अशा प्रकारचे शेअर घेतले. मार्केट वर आहे की खाली हे नाही बघितलं. गुंतवणूक करत गेले आणि आज मी त्यात खूश आहे.

त्यावर गुलाबजाम तोंडात घालत निकम बोलले – क्या बात है बेडेकर श्री व सौ! थेट गुंतवणुकीमध्ये तुम्ही दोघं तर छान मुरलात की! इतकी वर्ष सलग गुंतवणूक चालू ठेवणं काही सोपं नाही. आता माझंच बघा. मार्केट वर कधी जाणार आणि खाली कधी येणार याचा अंदाज घेण्यात अनेक वर्ष घालवली आणि उडी मारली तर कधी, रिटायरमेंटच्या पाच वर्ष आधी आणि तेही एका स्कीमला भुलून. माझ्या बॉसचा एक पोर्टफोलिओ सल्लागार होता. त्याच्या भरवशावर मी तेव्हा १० लाख दिले. सुरुवातीला चांगला फायदाही त्याने मिळवून दिला, पण नंतर उगीच त्याला फी का द्यायची आणि आपण जमवू शकू या चुकीच्या आत्मविश्वासामुळे त्याची सर्व्हिस मध्येच बंद केली. दुर्दैवाने काही महिन्यांतच मार्केट पडलं आणि मला माझ्या चुकीची जाणीव झाली; पण असं दुसऱ्यावर किती दिवस विसंबून राहायचं असं म्हणून स्वत:च सूत्रं हातात घेतली आणि तेव्हापासून लक्ष दिलं. मी पेपर वाचून अभ्यास करून गुंतवणूक करतो आणि २५ च्या पलीकडे कंपन्या घ्यायच्या नाही असं ठरवलंय. मला हे पुरे झालं.

जोशी त्यांची पाठ थोपटत म्हणाले – अहो निकम, देर आये दुरुस्त आये! उशीर तर उशीर, पण केलंत न. तुम्ही रिटायर व्हायच्या आधी तरी शिरलात. मी तर पाच वर्षांपूर्वी सुरुवात केली; पण त्यामागे एक कारण होतं. मला शेअर बाजार समजत नव्हता आणि जे समजत नाही त्यात पडायचं नाही हे सूत्र मी आयुष्यभर पाळलं. त्याचा फायदा असा झाला की नुकसान नाही झालं आणि जेव्हा थेट गुंतवणूक करायची ठरवली तेव्हा पहिला अभ्यास केला आणि मग थोडी थोडी रक्कम घातली. मला जास्त जोखीम आवडत नाही, म्हणून कमी बीटा असलेले शेअर घेतो. डे ट्रेडिंग करत नाही; पण याउलट माझी सरोज. तिने मात्र फार आधीपासून शेअर बाजारात गुंतवणूक केली. आता तीच सांगेल तिचा अनुभव आणि पद्धत.

फिल्टर कॉफीचा स्वाद घेत सरोज म्हणाल्या – माझी सुरुवात ‘यूएस ६४’पासून झाली. त्यात पैसे बुडाले, पण शहाणपण मिळालं असं मी मानते. आपले पैसे दुसरा सांभाळेल हा गैरसमज मी दूर केला आणि काही दिवस बाजारापासून लांब राहिले; पण मला खूप आवड होती आणि मग काही सहकाऱ्यांच्या मदतीने चांगल्या कंपन्या निवडायला शिकले. आधी म्युच्युअल फंड कशात पैसे घालत आहेत हे बघितलं आणि मग आपली पद्धत बनवली. मला जोखीम घ्यायला आवडते आणि आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य होतं. म्हणून मिड कॅप शेअर घेत आणि विकत गेले. मार्केटचा ‘पी/ई’ ध्यानात ठेवला आणि प्रॉफिट बुकिंग केलं. छोटे छोटे फायदे मिळवून गुंतवणूक चालू ठेवली आणि आज मी या बाबतीत समाधानी आहे.

एवढा वेळ शांत असलेल्या भिसेबाई म्हणाल्या – मी बाई सदैव गोंधळलेली असते. त्यामुळे शेअर बाजारात आपला निभाव कसा लागेल याबाबतीत साशंक होते. शिवाय बँकेत कामाला असल्यामुळे वेळसुद्धा नसायचा. म्हणून मी इंडेक्समध्ये गुंतवणूक करायचं ठरवलं; पण गुंतवणुकीत सातत्य मात्र नव्हतं. त्यामुळे सुरुवातीला फार गुंतवणूकही नाही झाली आणि तितका म्हणावा तर फायदासुद्धा नाही झाला; पण जिद्द न सोडता गेली १० वर्ष दरमहा ठरविलेली रक्कम गुंतवत गेले आणि तेसुद्धा माझ्या फिरण्याचा खर्च निघावा म्हणून. मी परताव्याचा दर निश्चित केला आणि त्यानुसार आधी केलेल्या गुंतवणुकीतून बाहेर पडत गेले. जास्त हाव ठेवली नाही की मार्केट अजून वर जाईल आणि मग जास्त फायदा होईल. म्हणून कदाचित नुकसान कमी झाले असेल. तेव्हा ही माझी पद्धत. चांगली की वाईट हे माहीत नाही, पण मला जमली.

सगळ्यांचं सांगून झाल्यावर पुन्हा एकदा कॉफीचा नवीन कप हातात घेत जोशी म्हणाले – चला, आजच्या मीटिंगचं सार्थक झालं. आपण सगळे इतके दिवस करतोय ते बरोबर की चूक म्हणण्यापेक्षा केलं या गोष्टीला जास्त महत्त्व आहे. सातत्य, अभ्यास आणि नियमित लक्ष देणं हे सर्वच गुंतवणूक पर्यायांमध्ये अपेक्षित आहे; परंतु गुंतवणुकीतील परताव्याच्या मागे न धावता कुठे तरी आपल्याला साजेल असा परतावा आणि झेपेल अशी जोखीम घ्यायची तयारी ठेवली की किचकट वाटणारी गुंतवणूकही सोयीची करता येऊ शकते. काय बरोबर ना?

त्यावर इतर सर्वानी मस्तपैकी थम्सअप केलं!

(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

trupti_vrane@yahoo.com