आपलेही करविषयक प्रश्न असतील तर ते आपण pravin3966@rediffmail.com या ई-मेलवर अथवा लोकसत्ता कार्यालय, ‘अर्थ वृत्तान्त’, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई- ४०००२१ या पत्त्यावर पाठवू शकता. अथवा ई-मेल: arthmanas@expressindia.com
प्रश्न: मी निवृत्तीनंतर बँकेत मुदत ठेवीत पसे ठेवले आहेत. त्यावर मला व्याज मिळते. त्या व्याजावर मला ८० टीटीए अंतर्गत उत्पन्नात १०,००० रुपयांची सवलत मिळेल का?
– नितीन जाधव
उत्तर : कलम ८० टीटीए खाली मिळणारी सवलत ही केवळ बचत खात्यावरील व्याजावर मिळते. या सवलतीची कमाल मर्यादा बचत खात्यावरील वार्षिक व्याज किंवा १०,००० रुपये इतकी आहे. मुदत ठेवीवरील व्याजावर ही सवलत मिळत नाही.

प्रश्न: मी माझ्या सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) खात्यात मागील वर्षी ५०,००० रुपये जमा केले होते. या खात्यावर मला ३,५०० रुपये इतके व्याज या वर्षी मिळाले. हे व्याज करपात्र आहे का?
– प्रशांत सावे
उत्तर :  पीपीएफ खात्यावर मिळणारे व्याज हे कलम १० (११) प्रमाणे करमुक्त आहे. त्यामुळे त्यावर कर भरावा लागणार नाही.

प्रश्न: माझे घर विकण्यासाठी एका व्यक्तीशी वाटाघाटी सुरू होत्या. दरम्यान मला त्या व्यक्तीने २,५०,००० रुपयांची अग्रिम रक्कम दिली होती. परंतु काही कारणाने वाटाघाटी सफल होऊ शकल्या नाहीत. त्या व्यक्तीने कराराच्या काही अटींची पूर्तता न केल्यामुळे त्याने दिलेली २,५०,००० रुपये मी जप्त केले. घराची विक्री यावर्षीही होऊ शकली नाही. मला मिळालेले २,५०,००० रुपये हे करपात्र आहेत का? त्यावर मला किती कर भरावा लागेल?
– किरण साबळे
उत्तर: मागील वर्षांपर्यंत अशी रक्कम खरेदी किमतीतून कमी करून भांडवली नफा काढता येत होता (घर विक्री झाली असती तर). परंतु यावर्षीपासून ही रक्कम इतर उत्पन्नात दाखवावी लागेल आणि त्यावर आपल्या उत्पन्न स्तरानुसार (स्लॅब) निर्धारीत प्रमाणात कर भरावा लागतो.

प्रश्न: मी माझ्या घराची विक्री केली. घराची विक्री किंमत कराराप्रमाणे २७ लाख रुपये इतकी आहे. परंतु मुद्रांक शुल्क भरताना बाजार मूल्य हे ३० लाख रुपये इतके दाखविण्यात आले आणि त्यावर खरेदीदाराने शुल्क भरले आहे. मला भांडवली नफा काढण्यासाठी कोणती विक्री किंमत दाखवावी लागेल.
–  प्रियांका जोशी
उत्तर: कलम ५०क प्रमाणे जर विक्री रक्कम ही मुद्रांक शुल्क खात्याने ठरविलेल्या मूल्यापेक्षा कमी असेल तर मुद्रांक शुल्क खात्याने ठरविलेले मूल्य ही विक्री किंमत धरून त्यावर भांडवली नफा काढावा लागतो. आपली घराची विक्री किंमत २७ लाख रुपये आहे आणि मुद्रांक शुल्क खात्याने ठरविलेले मूल्य ३० लाख आहे. त्यामुळे ३० लाख रुपये विचारात घेऊन भांडवली नफा काढावा लागेल.

प्रश्न: मी चार वर्षांपूर्वी एक घर २५,५०,००० रुपयांना विकत घेतले होते. ते घर मी ४० लाख रुपयांना विकून दुसरे मोठे घर ७० लाख रुपयांना विकत घेण्याचा विचार करीत आहे. या व्यवहारात प्राप्तिकर खात्याच्या कोणत्या तरतुदी विचारात घेतल्या पाहिजेत?
– एक वाचक
उत्तर: आपण घर विकले तर त्यावर होणारा भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा असेल त्यामुळे आपल्याला दुसऱ्या घरामध्ये गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध होतो. नवीन घरामध्ये गुंतवणूक ही भांडवली नफ्यापेक्षा जास्त असल्यामुळे यावर कर भरावा लागणार नाही. नवीन घर हे जुन्या घराच्या विक्रीपूर्वी एक वर्ष आधी किंवा दोन वर्षांनंतर- जर विकत घेतले तर-  आणि तीन वर्ष- जर घर बांधले तर- या कालावधीमध्ये घ्यावे लागेल. ज्या वर्षांत विक्री केली त्या वर्षांचे विवरण पत्र भरण्यापूर्वी नवीन घर विकत घेऊ शकला नाहीत तर जुन्या घराच्या भांडवली नफ्याएवढी रक्कम बँकेत ‘कॅपिटल गेन स्कीम’मध्ये ठेवावी लागेल. जर जुन्या घरासाठी गृहकर्ज घेतले असेल आणि ‘कलम ८० क’ प्रमाणे उत्पन्नातून वजावट घेतली असेल आणि ते घर पाच वर्षांच्या आत विकले तर ८० क कलमाप्रमाणे पूर्वी घेतलेली वजावट उत्पन्नात दाखवून त्यावर कर भरावा लागतो. नवीन विकत घेणारे घर जर ५० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे असेल तर त्यावर १% उद्गम कर (टीडीएस) कापावा लागेल.

प्रश्न: मी मागील वर्षां पर्यंत नोकरी करीत होतो. मला कंपनी कडून घर भाडे भत्ता मिळत होता. मी भाड्याच्या घरात राहात असल्यामुळे मला प्राप्तिकरात त्याची वजावट मिळत होती. या वर्षी मी माझा स्वतचा व्यवसाय करीत आहे. मला देत असलेल्या घर भाडे रक्कमेची सूट मिळू शकेल का?
– सुनील सरोदे
उत्तर: पगारदार व्यक्तींना मालकाकडून मिळालेल्या घर भाडे भत्त्याची वजावट जर घर भाडे दिले असेल तर कलम १० (१३अ) प्रमाणे मिळते. ज्या व्यक्तीला पगारातून घरभाडे भत्ता मिळत नसेल किंवा जी व्यक्ती स्वतचा व्यवसाय करीत असेल आणि तिने स्वत राहत असलेल्या घराचे भाडे दिले असेल तर ‘कलम ८० जीजी’ प्रमाणे वजावट मिळू शकते त्यासाठी काही अटींची पूर्तता मात्र करावी लागते.