|| कौस्तुभ जोशी

दोन देशांत आंतरराष्ट्रीय व्यापार होत असताना जाणीवपूर्वक एखाद्या देशाची बाजारपेठ उद्ध्वस्त करणे किंवा त्या बाजारपेठेतील नैसर्गिक स्पर्धा संपवून किंमत-युद्ध छेडणे यालाच सोप्या भाषेत आपण ‘डम्पिंग’ असं म्हणू. डम्पिंग या शब्दाचा सोपा अर्थ, आपल्याला नको असलेली किंवा जास्त झालेली वस्तू फेकून देणे! मात्र व्यापारातील डम्पिंगचे महत्त्व हे वेगळेच आहे. समजा एखाद्या देशात पोलादाचे उत्पादन गरजेपेक्षा जास्त होत असेल किंवा आधुनिक तंत्राचा वापर करून स्वस्तात पोलाद उत्पादन करण्यात या देशाने यश मिळवले असेल तर अतिरिक्त पोलाद हे दुसऱ्या देशात प्रसंगी तोटा सोसून विकले जाते किंवा दुसऱ्या देशातील बाजारपेठेत पोलादाचा जेवढा दर आहे त्यापेक्षा कमी दराने ते विकले जाते. यामुळे दुसऱ्या देशातील पोलादाची बाजारपेठ अस्थिर होते.

एखाद्या वेळी दुसऱ्या देशातील बाजारपेठेमध्ये शिरकाव करण्यासाठी डम्पिंग या अस्त्राचा वापर केला जाऊ शकतो, म्हणजेच सुरुवातीला त्या देशातील बाजारपेठेत वस्तूची जेवढी किंमत आहे त्यापेक्षा भरपूर कमी किमतीला ती वस्तू विकायची आणि तेथील स्थानिक उद्योगांना संकटात आणायचं, मग एकदा व्यापारात जम बसला आणि आपल्या वस्तू लोकांना आवडू लागल्या की पुन्हा चढय़ा भावाला त्या वस्तू विकायला सुरुवात करायची.

डम्पिंग का करण्यात येते?

  • आपल्याकडील आवश्यकतेपेक्षा जास्त उत्पादित झालेल्या वस्तू या दीर्घकाळ साठवून ठेवणे आर्थिकदृष्टय़ा फायद्याचे नसते. त्यापेक्षा त्या कमी दरात विकून टाकणे हा तोटा असला तरी योग्य योग्य निर्णय ठरतो.
  • आपल्या व्यवसायातील स्पर्धकांना बाजारपेठेतून दूर करण्यासाठी डम्पिंगचा वापर होऊ शकतो.
  • एकच वस्तू दोन वेगवेगळ्या देशांत विकत असताना जर मागणी आणि पुरवठा दोन्हीकडे वेगवेगळा असेल तर एकच वस्तू एका देशात जास्त किमतीला व एका देशात कमी किमतीला विकून आपला फायदा साधून घेता येतो.

डम्पिंग अणि दुसरी बाजू

  • आपल्या देशातील वस्तूंना परदेशात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सरकारला मोठय़ा सवलती द्याव्या लागतात आणि याचा दबाव सरकारी खर्चावर येतो.
  • दुसऱ्या देशात वस्तूंचे डम्पिंग केल्यास परिणामी तो देश आपल्यावर उलट कर लादू शकतो आणि त्यातून व्यापारयुद्ध भडकू शकते!

डम्पिंग ही व्यापार युद्धाची एक खेळी मानली जायला हरकत नाही. मात्र याच डम्पिंगमुळे एखाद्या देशाचा फायदासुद्धा होऊ शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील लाकडाच्या ओंडक्याच्या व्यापाराचं घेता येईल. कॅनडातून अमेरिकेमध्ये इमारत बांधणीसाठी लागणारे लाकूड निर्याईत केले जाते, हा व्यापार फायदेशीर ठरावा म्हणून कॅनडियन सरकारतर्फे  विशेष सवलतही दिली जाते, याचा फायदा असा की, अमेरिकेत घरबांधणी करणाऱ्या व्यावसायिकांना कॅनडियन लाकूड तुलनात्मकदृष्टय़ा स्वस्तात मिळते. नोव्हेंबर २०१७ मध्ये ट्रम्प प्रशासनाने कॅनडातून अमेरिकेत येणाऱ्या अशा लाकडांवर १८ टक्के कर आकारणी करायला सुरुवात केली, परिणाम असा झाला की अमेरिकेत लाकडाचे दर गगनाला भिडले. याला ‘अँटी डम्पिंग डय़ुटी’ असं म्हणतात. व्यापार युद्धातील भारताचा जवळचा प्रतिस्पर्धी म्हणजे चीन!

चीनमधून अनेक वस्तू भारतात कमी किमतीला विकल्या जातात ज्यामुळे भारतीय उद्योग संकटात येऊ शकतात, अशा वेळी सरकारकडून अँटी डम्पिंग डय़ुटी आकारणी केली जाते. मागच्या वर्षी चीनमधून भारतात स्वस्त दराने विकल्या जाणाऱ्या पोलादाचा भारतीय लोह पोलाद उद्योगाला सामना करावा लागत होता. म्हणून भारताने चिनी पोलादावर कर आकारला. सध्याच्या परिस्थितीत जवळजवळ १०० चिनी वस्तूंवर अशा प्रकारचा कर आहे. यात रसायने, यंत्रसामग्री, रबर यांचा प्रामुख्याने समावेश होतो.

(लेखक वित्तीय नियोजनकार, अर्थशास्त्राचे प्राध्यापक)

joshikd28@gmail.com