||  तृप्ती राणे

अरे, हा विलास अजून आला कसा नाही? नेहमी वेळेच्या आधी येणारा, आज चक्क तास होऊन गेला तरी सुद्धा आला नाही? – चहाचा घोट घेत मोहन म्हणाला. रस्त्यापलीकडे शून्यात बघत अविनाश म्हणाला – तो कदाचित येणार नाही असं मला वाटतंय. त्यावर महेश आणि स्वानंद दोघेही चहा पिणं थांबवून एका सुरात म्हणाले – का? काय झालं? घरी काही प्रॉब्लेम तर नाही ना? त्यांच्या आवाजात काळजीचा सूर स्वाभाविक होता.

विलास, महेश, स्वानंद आणि अविनाश हे कॉलेजपासूनचे मित्र. गेली २० वर्ष त्यांची मैत्री घट्ट टिकून होती. काहीही झालं तरीही प्रत्येक महिन्याचा शेवटचा रविवार हा मित्रांसाठी ठरलेला – कॉलेजच्या जवळची टपरी. (जी आता एक झकास कॅफे झाली होती!) इतकी वर्ष कोणीही तो नेम मुद्दामहून चुकवला नव्हता. न सांगता तर त्याहून नाही! म्हणूनच विलासचं हे वागणं वेगळं वाटणं स्वाभाविक होतं.

अविनाश निर्वकिार चेहरा करत म्हणाला – अरे, गेले काही महिने मी त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. माझ्या ऑफिसमध्ये एक मुलगा आहे जो त्याच्या शेजारी राहतो. त्याच्याकडून मला काही गोष्टी कळल्या. अविनाश गेले सहा महिने खूप ताणाखाली जगतोय. त्याच्या घरची परिस्थिती बहुतेक ठीक नसावी. वहिनी सुद्धा नोकरी करतात. पण गेले काही महिने मंदीमुळे विलासच्या धंद्यावर त्याचा चांगलाच परिणाम होतोय. त्यामुळे घरात पसे येणं नेहमीपेक्षा कमी झालंय. घरामधे वातावरण ठीक नाही. मुलंही म्हणे इतर मुलांमध्ये खेळत नाहीत. मी त्याला अनेकवेळा फोन केला, पण तो दर वेळी नंतर करतो असा मेसेज पाठवतो आणि मग पुढे काही नाही. म्हणून मी हा अंदाज बांधला की तो आज येणार नाही. हे ऐकल्यावर सगळे विचारात पडले.

दुसऱ्याच मिनिटाला महेश म्हणाला – चला रे! आपण त्याच्याकडे जाऊया. बघूया विचारून काय करता येऊ शकतं. स्वानंद जरा बाचकत म्हणाला – अरे तो कसला गरम डोक्याचा आहे माहीत आहे ना. त्यात पुन्हा आपण त्याला कमी पडल्याची जाणीव करून दिल्यासारखं तर नाही न होणार? अविनाश त्यावर पटकन म्हणाला – बस काय! एवढं नाही करायचं का मित्रासाठी. तो कधीच सांगणार नाही, पण म्हणून आपण न विचारता गप्पं बसणं योग्य नाही. काय होईल ते होऊदे! असं म्हणून तिघे विलासच्या घराकडे निघाले.

तिघांना अचानक दारात उभा पाहून विलास थोडा भांबावला. पण तिघांचे चेहेरे पाहून त्याला आपल्याबद्दल असलेली कळकळ जाणवली. काही न बोलता त्याने सर्वाना घरात घेतलं. मुलांना बाहेर जायला सांगून तो सुस्कारा टाकत एका खुर्चीत बसला. क्षमासुद्धा तिथे येऊन बसली. तिलाही एव्हाना या सर्वाचं इथे यायचं कारण उमगलं होतं. महेश सुरुवात करत म्हणाला – विलास, इतक्या वर्षांची आपली मत्री, पण आज असं वागून तू आम्हाला लांब केलंस. हे चुकीचं वागलास तू. थोडा बाचकत स्वानंद बोलला – अरे, एकदा बोलला असतास तर कदाचित आज परिस्थिती थोडी वेगळी असू शकली असती, आर्थिक आणि भावनिक सुद्धा. विलासला अक्षरश: रडू फुटल्यासारखं होत होतं. स्वतला कसा बसा सावरत म्हणाला – अरे, आजच्या परिस्थितीची मला खरंच लाज वाटते. आणि याला कारणीभूत मीच आहे. तुम्ही सगळे मला वेळोवेळी बजावत होतात, तरी मी बेफिकीर राहिलो आणि आज होत्याचं नव्हतं व्हायची वेळ आली आहे. आधीच कर्ज आहेत, त्यात खर्च वाढले आहेत आणि त्यावर अजून ही मंदी! या सगळ्यातून खूप निराशा झाली आहे मला. इतके वर्ष मेहनतीने सगळं उभारलं, पण फक्त आर्थिक बेशिस्तपणामुळे तोंडघशी पडलोय. आणखी सहा-आठ महिने जर ही मंदी राहिली तर खरंच मला हे घर विकावं लागेल. आला दिवस नुसता भांडणं करण्यात जातोय. क्षमा तिच्या परीने सगळं करतेय पण मी माझ्या परिस्थितीचा राग तिच्यावर आणि मुलांवर काढतोय. घरात एक क्षण शांतता नाही. कुणी हसत नाही, कुणी आनंदी नाही.

इतका वेळ शांत राहिलेला अविनाश, विलासला धीर देत म्हणाला – अरे, मंदी, तेजी हे सगळं तर चालतंच असतं. तू सुरुवात केलीस तेव्हा तुझ्याकडे काय होतं? पण मेहनतीने आणि नशिबाने साथ दिली आणि तू मोठा झालास. जसे ते दिवस बदलले तसे हे दिवस असेच थोडे राहणार आहेत? सुदैवाने आज वहिनींची नोकरी तर आहे. तेव्हा थोडे तरी पसे दर महिन्याला मिळत आहेत ना? तुझ्या स्टेटसला साजेशी मिळकत जरी आता होत नसली तरी परिस्थिती इतकी काही वाईट झालेली नाही की त्यातून एवढं निराश होतोयस. हा, जरा दिखाऊपणा कमी झाला असेल असा माझा अंदाज आहे.

स्वानंद त्याला जोडत म्हणाला – विलास आणि वहिनी, तुम्ही दोघेही इतके शिकलेले आहात, मग असे हार का मानता? चला मान्य करूया की कमावलेल्या पशाला शिस्त न लावल्यामुळे आज अशी परिस्थिती उद्भवली आहे. पण त्यातून मार्ग काढता येतो, आणि आम्ही सगळे असताना तुम्हाला हताश व्हायची काहीही गरज नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. आम्ही सांगतो तसे करून बघा :

  • तुमच्या खर्चाचा योग्य आढावा घ्या. अनावश्यक खर्च पूर्णपणे बंद करा.
  • तुमचे पसे कुठे आणि कुणाकडे अडकले आहेत ते नीट तपासा आणि ते मिळवण्याचे पूर्ण प्रयत्न करा. सुरुवातीला थोडे थोडे जरी मिळवता आले तरी चालतील.
  • जी कर्ज जास्त व्याजावर आहेत, ती आधी फेडा. ‘वन टाइम सेटलमेंट – ओटीएस’चा विचार करा. आम्ही सुद्धा मदत करू.
  • ज्या काही गुंतवणुका फायद्याच्या नसतील, त्यातून बाहेर पडा. पुढे कधीतरी फायदा होईल या आशेने उगीच वेळ घालवू नका.
  • तुम्ही गरजा वाढवून ठेवल्या आहेत. एवढय़ा मोठय़ा घराची खरंच गरज आहे का ते बघा. शक्य झाल्यास हे विकून आटोपशीर जागा घ्या. मिळालेल्या पशांनी काही कर्ज फेडा आणि काही तुमच्या दैनंदिन खर्चासाठी सांभाळून ठेवा.
  • या पुढे मिळणारे पसे हे अगदी काटेकोरपणे सांभाळून वापरा.
  • धंद्यामध्ये नवीन काय करून पसे कमावता येतील याकडे लक्ष द्या. जुन्या पद्धती सोडून, नवीन टेक्नोलॉजीचा स्वीकार करा. वेळेवर बदल स्वीकारला तर नुकसान कमी होते किंवा चांगला फायदा करून घेता येतो.
  • आरोग्य विमा आणि आयुर्वम्यिाचे हफ्ते चुकवू नका.
  • मुलांना घरातली परिस्थिती नीट समजवा. त्यांनाही पैशाचे महत्त्व पटले की तुमचे काम अजून सोपे होईल.
  • यापुढे योग्य आर्थिक नियोजन करून चांगल्या रीतीने गुंतवणूक करा.
  • गरजवंतांना मदत जरूर करा. पण इतरांची गरज भागवायच्या आधी जरा स्वतच्या परिस्थितीचा विचार करा.

हे सारे ऐकून विलास थोडा सुखावला. आपले जीवश्च कंठश्च मित्र आज त्याच्याबरोबर खंबीरपणे उभे आहेत हेच त्याच्यासाठी खूप मोलाचे होते. भरपूर पसे मिळवून फक्त योग्य आर्थिक नियोजन न केल्यामुळे हे सगळे झाले होते. पण या सर्वाच्या पाठिंब्यामुळे पुन्हा नव्याने सुरुवात करायची त्याने मनाची तयारी केली! ‘शक्य अशक्य विचार सुज्ञे करावा निरंतर’ हे म्हटलंय ते काही उगीच नाही!

(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.) trupti_vrane@yahoo.com