25 April 2019

News Flash

वेलची सुगंधी, कांद्यात मंदी

केरळमधील पावसाच्या हाहाकाराचे परिणाम वायदे बाजारात आताच दिसून येत आहे.

|| श्रीकांत कुवळेकर

केरळमधील पावसाच्या हाहाकाराचे परिणाम वायदे बाजारात आताच दिसून येत आहे. वेलची वायदा भावात गेल्या एक दीड महिन्यात ३०-४० टक्के वाढ झाली असून सध्या १,४०० रुपये प्रति किलोने सौदे होत आहेत. त्यामुळे सणासुदीच्या कालावधीमध्ये किरकोळ बाजारामध्ये मध्यम प्रतीची वेलची २,५०० तर ३,००० रुपये प्रति किलो या भावाने विकली गेल्यास आश्चर्य वाटू नये.

मागील आठ-दहा दिवस पावसाने गाजवले. म्हणजे दक्षिणेकडील केरळ राज्यात गेल्या १०० वर्षांमधील विक्रमी पाऊस पडला. तर महाराष्ट्र आणि गुजरातसारख्या राज्यांमधील शेतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या भागांमध्ये पावसाचा रुसवा टिकून राहिला आहे. दोन्हींचा परिणाम शेवटी कमी-अधिक प्रमाणात सारखाच असला तरी केरळमधील नैसर्गिक आपत्तीमुळे तेथील दैनंदिन जीवनाप्रमाणेच शेती आणि इतर उद्योगांची वाताहत झाली आहे. तेथील परिस्थिती किती बिकट आहे याची कल्पना विविध वाहिन्यांनी दाखविलेल्या चित्रफितीद्वारे आली असली तरी नेमकी दाहकता फेसबुक आणि इतर समाजमाध्यमांमधून अन्न, वस्त्र आणि निवारा तसेच पिण्याचे पाणी आणि औषधे यासारख्या गोष्टींसाठी केलेल्या मागण्या पाहिल्या तरी लक्षात येते. त्याहीपेक्षा इडुक्की आणि वायनाड जिल्ह्य़ांच्या कित्येक भागांमध्ये रस्त्यांबरोबरच वीज आणि दूरसंचार सेवादेखील कोलमडून पडल्यामुळे वेळेवर मदत पोहोचणेदेखील कठीण झाले आहे.

राज्य सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार जेमतेम २८,००० हेक्टरवरील सुमारे ७०० कोटी रुपयांच्या शेतमालाचे नुकसान झाले असे म्हटले असले तरी प्रत्यक्ष आकडा खूपच मोठा असणार हे सांगायला तज्ज्ञांची आवश्यकता नाही. दृश्य स्वरूपामध्ये केवळ भात, केळी आणि काही मसाला पिकांचे नुकसान झाले असे म्हटले असले तरी ज्याची आकडेवारी उपलब्ध नाही अशा कित्येक पिकांचे खूप नुकसान झाले आहे. उदाहरणार्थ, वायनाडमधून अननसाचा मोठय़ा प्रमाणात पुरवठा दक्षिण आणि पश्चिम भारतात होतो. त्यावर परिणाम होऊ शकेल.

भौगोलिकदृष्टय़ा इडुक्की आणि वायनाड हे डोंगराळी प्रदेश असून बहुतेक मसाला पिके डोंगरउतारावर असल्यामुळे तेथे पाण्याचा निचरा वेगाने होतो. तरीही पावसाचा जोरच इतका होता की, मसाला क्षेत्रावर त्याचा परिणाम झालाच आहे.

भारतातील सुमारे २०,००० टन इतक्या एकंदर वेलची उत्पादनापैकी ७५ ते ८० टक्के उत्पादन केवळ इडुक्की जिल्ह्य़ामध्ये होते. त्यामुळे वेलची पिकाचे प्रचंड नुकसान होणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार निदान या मसाला पिकाच्या लागवडीखालील किमान ४५ टक्के भागाचे सुरुवातीला पावसामुळे आणि नंतर बुरशीजन्य रोगांमुळे खूप नुकसान झाल्यामुळे एकंदर उत्पादनात कमीत कमी २५ ते ३० टक्के एवढी घट येणार आहे. याचा परिणाम वायदे बाजारात आताच दिसून येत आहे. वेलची वायदा भावात गेल्या एक-दीड महिन्यात ३०-४० टक्के वाढ झाली असून सध्या १,४०० रुपये प्रति किलोने सौदे होत आहेत. त्यामुळे पुढील दोन महिन्यांच्या सणासुदीच्या कालावधीमध्ये किरकोळ बाजारामध्ये मध्यम प्रतीची वेलची २,५०० तर ३,००० रुपये प्रति किलो या भावाने विकली गेल्यास आश्चर्य वाटू नये.

महत्त्वाचे म्हणजे भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा वेलची उत्पादक देश असून आपले २०-२५ टक्के उत्पादन निर्यात करतो. गेल्या काही महिन्यांत अति कीटकनाशके वापरल्यामुळे आखाती देशांमधील निर्यात धोक्यात आली असताना बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे परत एकदा कीटकनाशकांचा वापर वाढल्यास पुढील काळातदेखील निर्यात कठीण होऊ शकते.

जायफळ आणि दालचिनीच्या भावामध्ये देखील वाढ होणार असली तरी त्याच्या घरगुती वापराचे प्रमाण पाहता सामान्य ग्राहक फारसा विचार करत नाही.

काळीमिरी हेदेखील इडुक्की, वायनाड आणि केरळच्या इतर भागांमध्ये निर्माण होणारे प्रमुख मसाला पीक असले तरी वेलचीप्रमाणे त्याचा काढणीचा हंगाम अजून ४-५ महिने दूर असल्यामुळे त्याच्या भावात विशेष वाढ होण्याची एवढय़ातच शक्यता नाही. मात्र मिरीच्या बागांचे केरळ तसेच कर्नाटकमधील चिकमंगळूर आणि कूर्ग या भागांमध्ये अति पावसामुळे नुकसान झाले असल्यामुळे सहा-सात महिन्यांमध्ये भाव बऱ्यापैकी वाढू शकतील.

कोट्टायम जिल्ह्य़ातील रबर पिकाचेदेखील पावसामुळे  टॅपिंग बंद असल्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली असून त्याचा परिणाम वाढलेल्या भावात दिसून येत आहे. मात्र रबर आणि काळीमिरी याच्या भावांवर घरगुती उत्पादनापेक्षा जागतिक कारणांचा जास्त परिणाम होत असल्यामुळे या पदार्थाच्या भावात मोठी वाढ होण्याची शक्यता नाही.

तर एकीकडे अतिपावसाने हाहाकार उडाला असताना गुजरात आणि महाराष्ट्राच्या मराठवाडा, खान्देशात दोन ते चार आठवडे पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीन, कापूस आणि कडधान्य पिकांचे नुकसान होऊन दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. सुदैवाने स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशीपासून मराठवाडय़ामध्ये मोसमी पावसाचे खरेखुरे आगमन झाल्यासारखी परिस्थिती निर्माण होऊन खरीप पिकांना संजीवनी मिळाली आहे. मात्र अजूनही उत्पादकता कमी होण्याची भीती आहेच.

गेल्या आठवडय़ात कापसाच्या भावात थोडी नरमाई दिसली आहे. राज्यातील तसेच गुजरातमधील पावसाच्या पुनरागमनामुळे उत्पादनासंदर्भातील चिंता थोडीशी कमी झाल्यामुळे म्हणा किंवा सट्टेबाजांची नफावसुली म्हणा, पण कापसाचे भाव अजून दोन-तीन टक्के कमी होऊ शकतील. परंतु अमेरिकन कृषीखात्याचे अंदाज बघता कापसात दीर्घकालीन तेजी राहणार हे जवळपास नक्की आहे. त्यातच वधारणाऱ्या डॉलरमुळे अमेरिकेच्या कापूस निर्यातीवर विपरीत परिणाम होऊ शकेल आणि त्याचा फायदा आपल्याला होऊ शकेल. याबाबतचे चित्र येत्या चार-सहा आठवडय़ात स्पष्ट होऊ लागेल.

एकीकडे रुपयाची विक्रमी घसरण झाल्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाबाबत चिंता निर्माण झाली असली तरी कृषी माल निर्यातीला चांगली संधी निर्माण झाली आहे असे म्हणता येईल. गेले महिनाभर रुपया सतत घसरत असला तरी त्या मानाने कडधान्ये आणि इतर कृषी मालाच्या देशांतर्गत किमती तुलनेने स्थिर राहिल्या असल्या तरी सुमारे तीन वर्षांच्या प्रदीर्घ मंदीनंतर कडधान्यांच्या भावामध्ये अलीकडील सरकारी धोरणांमुळे पुढील वर्षांमध्ये चांगली सुधारणा होऊ शकेल.

आयातीवरील र्निबधांमुळे आणि निर्यातीला प्रोत्साहन देऊनसुद्धा हरभरा वगळता इतर कडधान्यांच्या भावात अजून सुधारणा झाली नसली तरी अलीकडील सरकारी निर्णयानुसार सरकारी साठय़ांची विक्री खुल्या बाजारातील लिलावाऐवजी सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फतच होणार असल्यामुळे सरकारकडे भावनियंत्रण करण्याची क्षमता येईल. सध्या सरकार आणि सरकारी कंपन्या असा मिळून कडधान्यांचा सुमारे चार दशलक्ष एवढा तरी साठा आहे. आपल्या एकंदर वार्षिक उत्पादनाचा २० टक्के साठा हाती असल्यामुळे आणि पुढील काळात येऊ घातलेल्या निवडणूक लक्षात घेता कडधान्यांच्या किमती हमीभावाच्या पातळीपर्यंत वाढल्या तरीदेखील आजच्या किमती लक्षात घेता ही भाववाढ २०-२५ टक्क्यांएवढी असेल. भाव सुधारण्यास घसरणाऱ्या रुपयाची देखील निश्चित मदत होईल. अर्थात ही वाढ एकदम न होता हळूहळू होईल म्हणजे म्हणजे ग्राहकांचा रोषही टाळता येईल.

मात्र कांदा उत्पादकांसाठी पुढील काळ परीक्षेचा असण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही दिवसांत कांद्याच्या घाऊक किमतीत २५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली असून पुढील एक महिन्यामध्ये ही घसरण बरीच वाढू शकेल. गेल्या दोन वर्षांमधील ऑगस्ट-सप्टेंबरमधील वाढलेले भाव पाहून शेतकऱ्यांनी कांदा चाळींमध्ये उन्हाळी पिकाची भरपूर साठवणूक केली होती. मात्र आता हंगाम संपत आल्यामुळे आणि हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढल्यामुळे कांदा खराब होण्याची प्रक्रिया वेगाने होणार आहे. यामुळे पुढील काळात पुरवठय़ामध्ये खूप वाढ होऊन भाव चांगलेच पडू शकतील. रुपयाची घसरण आणि निर्यात प्रोत्साहन देऊनसुद्धा जागतिक बाजारामध्ये मागणी फार नसल्यामुळे निर्यातीत खूप सुधारणा होत नसून त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे. पुढील काही दिवसात इतर कृषी मालाप्रमाणेच कांद्यालादेखील केरळ राज्यामधून मोठी मागणी आल्यास भावातील घसरण रोखण्यास मदत होईल.

(लेखक वस्तू बाजार विश्लेषक)

First Published on August 20, 2018 12:02 am

Web Title: economy of india 5