|| भालचंद्र जोशी

चक्रवाढ (कम्पाऊंडिंग) ही अतिशय महत्त्वपूर्ण संकल्पना आहे. आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यामधे चक्रवाढीची भूमिका आज आपण समजावून घेऊया. ‘चक्रवाढ व्याज हे जगातील आठवे आश्चर्य आहे. ज्याला ते समजले, तो ते मिळवतो. ज्याला समजत नाही, तो ते भरतो,’ असे उगाच नाही म्हटले गेले आहे. या जादूच्या कांडीचा अचूक उपयोग केल्यास तुमच्याजवळ पैशाचे झाड असेल.

चक्रवाढ म्हणजे मत्तेमधून मिळणाऱ्या मिळकतीची पुन्हा गुंतवणूक करून मिळकत निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे, ती साध्य करण्यासाठी आपल्याला मिळकतीची पुनर्गुतवणूक करणे आणि वेळ या दोन गोष्टींची गरज असते. चक्रवाढ मिळकतीमुळे लहान गुंतवणूकदेखील खूप चांगल्या प्रकारे वाढू शकते.

चक्रवाढ दराने समभाग गुंतवणुकीतील फायदा

समभाग गुंतवणूक किंवा इतर वृद्धी देणाऱ्या मालमत्तेत, दरवर्षी बाजारपेठेतील परताव्यात बदल होतो. चक्रवाढ दोन गोष्टींवर आधारित आहे एक, किमतीतील बदलच मुळात चक्रवाढ होतो आणि तुम्ही लाभांशाची किंवा मिळकतीची पुनर्गुतवणूक केलीत तर त्यालादेखील चक्रवाढीचा फायदा होतो. परंतु हे लक्षात ठेवा की बॉण्ड, डिबेंचर किंवा मुदत ठेवीवरील चक्रवाढ व्याजाच्या अगदी विरुद्ध, इक्विटीवरील परतावा आणि वाढ ही एकसारखी नसते, तुम्हाला दर वर्षी सारखाच परतावा मिळत नाही. किंमत वाढल्यास चक्रवाढीच्या दराने जसा फायदा होतो, त्याचप्रमाणे तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य कमी होत असल्यास, किंमत कमी होण्यामुळे नुकसानदेखील चक्रवाढीच्या दराने होते. परिणामस्वरूप, किमती कमी झाल्यास तुमच्या भांडवलाचे मूल्यदेखील वेगाने कमी होऊ  शकते. याचा अर्थ, तुम्ही गुंतवणूक करीत असलेल्या इक्विटी स्टॉक्स किंवा पोर्टफोलिओच्या गुणवत्तेकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागते. दुसरे, मत्तेच्या समान नसलेल्या स्वरूपामुळे तुम्हाला चक्रवाढीचा फायदा करून घेण्यासाठी दीर्घकाळ गुंतवणूक कायम ठेवावी लागते.

चक्रवाढीचा फायद्यासाठी गुंतवणुकीचे महत्त्वाचे नियम :

  • लवकर सुरुवात करा : चक्रवाढीचा सर्वाधिक फायदा करून घेण्यासाठी लवकर सुरुवात करणे कधीही चांगले. तुम्ही पैसे कमवायला सुरुवात केल्यावर भविष्यातील आर्थिक उद्दिष्टांची योजना करून लगेच गुंतवणुकीला सुरुवात केलीत तर भक्कम पाया निर्माण होईल, ज्यामुळे कालांतराने तुमच्या पैशात खूप वाढ होईल. कारण गुंतवणूक जितकी दीर्घकालीन, तितके प्रत्येक वाढलेल्या वर्षांत, येणाऱ्या परताव्यातून अधिक रकमेची गुंतवणूक केली जाईल.
  • शिस्त :तुमची सक्षम पोर्टफोलिओ निर्माण करण्याची इच्छा असल्यास, तुम्ही तुमचे प्राधान्य निश्चित करणे आणि नियमित गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही किती पैसा कमावता ते महत्त्वाचे नाही तर तुमचे प्राधान्यक्रम ठरायला हवेत. शिस्तबद्ध राहिल्यास आणि त्याचा नंतर कसा फायदा होतो हे समजल्यास, तुम्हाला गुंतवणुकीसाठी पैसे बाजूला टाकण्याची सवय लागण्यास मदत होईल.
  • संयम ठेवा : आपल्यापैकी अनेकांची चटकन परतावा मिळविण्याची इच्छा असते. परंतु आपल्या हे लक्षात येत नाही की दीर्घकाळ गुंतवणूक कायम ठेवल्यासच चक्रवाढीचा फायदा मिळतो. तुम्ही तुमच्या गुंतवणुकीच्या व्यवहारात हस्तक्षेप न करता तिला तिच्या स्वत:च्या वेगाने वाढू द्यावे. अनेक वर्षे ठरावीक गुंतवणूक कायम ठेवल्यास त्यामुळे तुम्हाला शेवटी एकरकमी ठोस रक्कम मिळेल.
  • खर्चावर लक्ष ठेवा : आपण सर्वानी बचतीची सवय लावून घेतलीच पाहिजे. परंतु त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे तुमचे पैसे कोठे खर्च करायचे हे माहीत असावे. आपल्या खर्चाच्या नियोजनाचा आराखडा तयार करणे आणि त्यावर लक्ष केंद्रित करणे काही कठीण नाही. तुम्ही बेसावध पकडले जाणार नाही आणि तुमच्यापाशी पुरेसे पैसे आहेत याची काळजी घेण्यासाठी खर्चाचे अंदाजपत्रक तयार करणे अतिशय महत्त्वाचे आहे. तुम्ही सुज्ञपणे गुंतवणूक केलीत तरच तुम्हाला चांगला फायदा होईल.

मुख्यत्वे चक्रवाढ ही तुमच्या मुद्दलाची गुंतवणूक अधिक त्यावर मिळालेल्या परताव्याची पुनर्गुतवणूक करून अधिक मिळकत कमावण्याची प्रक्रिया आहे- मिळकतीची पुनर्गुतवणूक करण्यामुळे त्यावरदेखील पैसे मिळू लागतात.

चक्रवाढीमुळे परताव्यावर परतावा मिळाल्यामुळे तुमच्या खेळत्या भांडवलाला वाढ होण्यासाठी इंधन मिळते. गुंतवणुकीमुळे तुमच्या मिळकतीच्या क्षमतेत वाढ होते तर चक्रवाढीमुळे तुमच्या गुंतवणुकीच्या पैसे कमावण्याच्या क्षमतेत वाढ होते. वेळ व पुनर्गुतवणूक यामुळे चक्रवाढीचा फायदा होतो, तेव्हा तुम्ही लवकर सुरुवात करा आणि दीर्घकाळ गुंतवणूक कायम ठेवा.

(लेखक गेली २७ वर्षे बँकिंग आणि आर्थिक सेवा क्षेत्रात कार्यरत असून, सध्या रिलायन्स म्युच्युअल फंडात गुंतवणूकदार सेवा आणि ऑपरेशन्स विभागाचे प्रमुख आहेत.)

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.