18 October 2019

News Flash

माझा पोर्टफोलियो : अस्सल सहन सामर्थ्य

आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा आणि वेळेत उत्पादने पुरवण्यासाठी कंपनीने ग्राहककेंद्रित उत्पादन प्रकल्प उभारले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

अजय वाळिंबे

वर्ष १९८६ मध्ये औरंगाबादमध्ये स्थापन झालेली अनुराग इंजिनीयिरग म्हणजेच आजची एंडय़ुरन्स टेक्नॉलॉजीज ही भारतातील आघाडीच्या वाहन घटक उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. एंडय़ुरन्स टेक्नोलॉजीज ही भारतातील सर्वात मोठी अ‍ॅल्युमिनियम डायकास्टिंग निर्माती आणि अ‍ॅल्युमिनियम डायकास्टिंग (अ‍ॅलॉय व्हील्ससह), ट्रान्समिशन आणि ब्रेकिंग सिस्टीम्समधील आघाडीची उत्पादक आहे. या खेरीज मोटार सायकलसाठी उच्च / लो प्रेशर दाब डायकास्टिंग,अ‍ॅल्युमिनियम अ‍ॅलॉय व्हील्स, शॉक अब्सॉर्बर्स, क्लच असेम्ब्ली, कॉर्क आणि पेपर आधारित फ्रिक्शन प्लेट्स आणि स्कूटरसाठी व्हेरिएबल ट्रान्समिशन (सीव्हीटी) असेम्ब्ली उत्पादने करते. आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा आणि वेळेत उत्पादने पुरवण्यासाठी कंपनीने ग्राहककेंद्रित उत्पादन प्रकल्प उभारले आहेत. सध्या कंपनीचे भारतात औरंगाबाद, पुणे, चेन्नई, सानंद (गुजरात) तसेच उत्तर प्रदेशात पंतनगर व मानेसार येथे प्रकल्प आहेत. भारतातील जवळपास प्रत्येक वाहन कंपनीला (दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी) तसेच परदेशातील ऑडी, बीएमडब्ल्यू, पोर्शेसारख्या कंपन्यांना एंडय़ुरन्स आपली उत्पादने पुरवते.

भारताखेरीज युरोपमध्ये (जर्मनी व इटली) कंपनीचे सात प्रकल्प असून यात कंपनी प्रामुख्याने इंजिन आणि ट्रान्समिशन घटकांवर लक्ष केंद्रित करून चारचाकी ओईएमची पूर्तता करते. या उत्पादनांमध्ये कच्चे आणि मशीनिंग अ‍ॅल्युमिनियम कास्टिंग्ज (उच्च दाब डाय कास्टिंग उत्पादने) आणि स्टील तसेच अभियांत्रिकी प्लास्टिक भाग समाविष्ट आहेत.

वर्ष २०१६ मध्ये ४६२ रुपये अधिमूल्याने एंडय़ुरन्स टेक्नॉलॉजीजने ‘आयपीओ’द्वारे शेअर बाजारात प्रवेश केला आणि आपले शेअर बीएसई तसेच एनएसई या बाजारांमध्ये सूचिबद्ध केले. आतापर्यंत भागधारकांना फायदा देणाऱ्या कंपनीने आर्थिक कामगिरीदेखील उत्तम केली आहे. गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीने ७,५३७.७५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ७५३.८८ कोटी रुपयांचा नक्त नफा मिळविला आहे, तर यंदाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीने १,९१५.९५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १६५.५८ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गतवर्षीच्या तुलनेत तो ३३ टक्क्यांनी अधिक आहे.

आगामी कालावधीत कंपनीचे कर्नाटकातील कोलार तसेच वल्लम येथील प्रकल्प कार्यान्वित होत आहेत. जून २०२० पर्यंत कंपनी आयात-पर्यायी अ‍ॅल्युमिनियम फोìजग उत्पादनात पदार्पण करत असून त्यासाठी कंपनीने इटलीच्या कंपनीचे तांत्रिक सहकार्य घेतले आहे. या उत्पादनामुळे कंपनीला इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला पुरवठा करता येईल. केटीएम या सहयोगी कंपनीमध्ये एंडय़ुरन्स टेक्नॉलॉजीज येत्या दोन वर्षांत ४० लाख युरो गुंतवणूक करीत असून त्या बदल्यात केटीएम कंपनीला तांत्रिक साहाय्य देईल. त्याचा फायदा निर्यातवाढीलादेखील होईल.

कंपनीचे ७५ टक्के समभाग प्रवर्तकाकडे असून केवळ २.९३ टक्के समभाग सामान्य जनतेकडे असलेली आणि केवळ ०.४ बीटा असलेली एंडय़ुरन्स टेक्नॉलॉजीज एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून निश्चित फायद्याची ठरू शकेल.

एंडय़ुरन्स टेक्नॉलॉजीज लि.

शुक्रवारचा बंद भाव : रु. ९८६.५०

(बीएसई कोड – ५४०१५३)

लार्ज कॅप समभाग

प्रवर्तक : अनुराग जैन, एंडय़ुरन्स समूह

उत्पादन : वाहन पूरक उत्पादने

बाजारभांडवल:  रु. १३,५०४ कोटी

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक:     रु.  १,४७०/ ७४३

भागभांडवल:  रु. १४०.६६ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक     ७५.००

परदेशी गुंतवणूकदार    १६.३७

बँक/ म्यु. फंड    ५.७०

जनता २.९३

पुस्तकी मूल्य:    रु. १४७.९

दर्शनी मूल्य :    १०

लाभांश :   ५५%

प्रति समभाग उत्पन्न : रु. २८.८

पी/ई गुणोत्तर :    ३४

समग्र पी/ई गुणोत्तर :  १८.५४

डेट इक्विटी गुणोत्तर :  ०.२८

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :   ३२.८७

रिटर्न ऑन कॅपिटल :   २४.५५

बीटा :     ०.४

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

First Published on September 23, 2019 12:21 am

Web Title: endurance technologies shares aluminum die casting shareholder abn 97