तृप्ती राणे

माझा मुलगा वर्षभरामध्ये दोन दिवसांची खूप आतुरतेने वाट बघत असतो – एक त्याचा वाढदिवस आणि दुसरा भाऊबीज! त्यामागचा उद्देश अतिशय सोपा – दोन्ही दिवसांत मिळणाऱ्या भेटी! लहान असताना भेट स्वरूपात मिळणारा खाऊ किंवा खेळणी या गोष्टींची त्याला खूप मजा वाटायची. पण कुणी पशांचं पाकीट भरून दिलं की त्याचा चेहरा पडायचा.

एकदा त्याच्या आजीने त्याला चांगलीच तगडी रक्कम भरून त्याला देऊ केली तर म्हणाला – ए आजी! हे काय गिफ्ट झालं? मला नाही आवडत हे असलं पाकीट?

तर आजी म्हणाली – अरे आत उघडून किती आहेत ते बघ तरी? तिला वाटलं की नातवाला आत कमी पैसे असतील म्हणून गिफ्ट नकोय!

तर त्यावर तिचा गैरसमज दूर करीत तो म्हणाला – अगं, तू मला मिलियन (यात किती शून्य हे त्याला माहीत होते की नाही देव जाणे!) जरी दिलेस ना तरी मला त्याचा काहीच फायदा नाही! कारण सगळे पैसे मम्मी आणि पप्पा घेणार आणि मला माझ्या मनासारखे खर्च करायला नाही मिळणार! मग काय मज्जा येणार त्यात! त्यापेक्षा खाऊ-खेळणी बरी. कारण ते सगळं माझं असतं. मम्मी-पप्पांना त्यातून काही मिळत नाही! शिवाय कधी कधी तर मला समजत नाही कीमाझे पैसे माझ्याच अकाऊंटमध्ये जातात की ते वापरतात!

त्याचं हे लांब स्पष्टीकरण ऐकून आजी कसल्या हसल्या आणि मला म्हणाल्या – हुशार आहे हो पोरगा तुझा! आपल्याला कशात मजा मिळते हे चांगलं समजतंय कीत्याला. आणि तुम्ही त्याचे पैसे कसे वापरता याबाबतीतसुद्धा त्याची मतं ठाम दिसतायेत! हे सगळं ऐकून मी आणि माझे पती जरा ओशाळलो. आमच्या दोघांच्या बचत आणि गुंतवणुकीचं कौतुक करायच्या ऐवजी आमच्या चिरंजीवांनी आमच्यावर एक प्रकारे अविश्वास दाखवला!

आजी निघून गेल्यावर आम्ही दोघांनी त्याला पकडलं. आणि चौकशी करायला सुरुवात केली! तो जरा घाबरला, पण मग आम्ही विश्वासात घेतलं तसा चुटुचुटु बोलायला लागला. त्याच्या बोलण्यातूून दोन गोष्टी आम्हाला प्रकर्षांने जाणवल्या – पहिली, त्याला मिळणाऱ्या गोष्टी – खाऊ आणि खेळणी, या दोन्ही त्याला उपभोगायला मिळायच्या (भले त्यांची गरज नसेल!) आणि म्हणून त्याला त्यात आनंद वाटायचा. आणि दुसरी, जी आम्हाला जास्त महत्त्वाची वाटली, ती म्हणजे मिळालेल्या भेटीवर त्याला स्वत:चा ताबा हवा होता. मग आम्ही त्याच्याबरोबर या दोन्ही प्रॉब्लेम्सच्या बाबतीत ‘डिस्कशन’ (या शब्दाचा वापर केल्यावर तो जाम खूश झाला, जणू त्याला फार मोठय़ा कामात सामील केलंय!) करायला सुरुवात केली. बराच विचारविनिमय करून आम्ही त्याच्या समोर खालील मुद्दे मांडले :

१. त्याला मिळणारा खाऊ आणि खेळणी हे नेहमीच त्याच्या आवडीचे असतील हे जरुरीचे नाही. कारण आपल्या जवळची माणसे आपल्या आवडीनिवडी जाणतात आणि त्यानुसार भेट आणतात. परंतु जिथे फार ओळख नाही, तिथे मात्र हिरमोड होऊ शकतो.

२. जी भेट मिळाली आहे ती कदाचित त्याच्याकडे पहिल्यापासून असेल. खेळणी, रंग, निरनिराळी पझल्स, आर्ट किट इत्यादी. मग त्यातून नवीन असा काही आनंद मिळणार नाही.

३. त्याला पैसे त्याच्या खात्यात जातात की नाही याबाबत शंका वाटत होती. कारण मिळालेले पैसे ‘आम्ही’ त्याच्या खात्यात घालतो. तो लहान आहे, त्याला बँकेतील व्यवहार इतक्यात कळणार नाही म्हणून आम्ही त्याला बँकेत नेत नाही.

४. त्याला मिळालेल्या पैशांमधून आम्ही म्युच्युअल फंड आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करत होतो. पण हे सर्व आमच्या नावाखाली करत होतो.

हे सगळं त्याने अगदी एका मोठय़ा माणसासारखं शांतपणे ऐकून घेतलं. आणि म्हणाला – मला तुमचे पहिले दोन मुद्दे पटले. पण तिसऱ्या आणि चौथ्या बाबतीत मला काही सांगायचंय. मी लहान आहे म्हणून तुम्ही मला बँकेत नेत नाही. पण तुम्हीच जर मला नीट शिकवलं तर मला समजेल की! जशा गुड हॅबिट्स लहान मुलांनी शिकायच्या असतात अगदी तसंच हेसुद्धा मला माहीत झालं पाहिजे. म्हणजे मोठा झालो की मला त्याचा फायदा होईल. आणि गुंतवणूक माझ्या नावाने का नाही होऊ शकत?

त्याचे हे मुद्दे ऐकून आम्हाला चांगलच आश्चर्य वाटलं. आठ वर्षांच्या मुलाच्या मनात हे सगळे विचार येऊ शकतात असं आम्हाला कधी वाटलंच नव्हतं. तर त्याने मांडलेल्या मुद्दय़ांचं आणि त्याचं कौतुक करीत आम्ही खालील गोष्टी ठरविल्या :

(बाजूला चौकटीत दिल्याप्रमाणे)

गेली दोन वर्षे हा प्रयोग आमच्या घरी चालू आहे. आणि मुळात म्हणजे आमचा मुलगा त्यात खूश आहे. आता तर तो स्वत:च पैसे गुंतवायच्या गोष्टी करतो आणि मिळालेल्या भेटींचा सदुपयोग करतो. सर्व वाचकांनी या दिवाळीत आपल्या कुटुंबातील मुलांना हा दृष्टिकोन द्यावा ही सदिच्छा.

भेटींसंदर्भात ठरविलेल्या गोष्टी..

१.   शक्यतो जवळच्या लोकांकडून भेट घ्यायची. इतर वेळी ‘नो गिफ्ट अँड नो रिटर्न गिफ्ट’ हा फंडा वापरायचा.

२.   ज्या भेट वस्तू तरीही मिळतील, त्या उगीच न वापरता ज्यांना त्यांचा उपयोग होईल अशा मुलांना/संस्थांना देणगी म्हणून द्यायच्या.

३.   जेव्हा केव्हा रोख भेट मिळेल, तेव्हा आम्ही त्याला घेऊन बँकेत जाणार आणि त्याला त्याच्या खात्यामध्ये पैसे भरायला शिकवणार.

४.   जिथे त्याच्या नावाने गुंतवणूक करणं शक्य आहे, तिथे तशी करायची.

५.   त्याला जेव्हा मौजमजा करायची असेल, तेव्हा त्याला त्याचे जमा झालेले पैसे वापरायची परमिशन द्यायची. अर्थात, तो खर्च वायफळ नसेल हे ध्यानात ठेवूनच!

(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार )

trupti_vrane@yahoo.com