06 March 2021

News Flash

वयोवृद्धांचे आसू आणि हासू!

श्री.यशवंत जोशी, गिरगांवात वन-रूम-किचनची स्वतच्या मालकीची जागा.

| September 7, 2015 02:00 am

श्री.यशवंत जोशी, गिरगांवात वन-रूम-किचनची स्वतच्या मालकीची जागा. २००२ साली एका खासगी कंपनीतून निवृत्त झाले. निवृत्त होतेवेळी पीएफ, ग्रॅच्युइटी मिळून एकूण रक्कम मिळाली सात लाख. पेन्शन नाही. सर्व भिस्त निवृत्त होतेवेळी मिळालेल्या या रकमेवर आणि एकुलता एक मुलगा नोकरी करून थोडी आíथक मदत करेल या आशेवर! २००२ सालीच मुलीचे लग्न झाले. तिला बंगलोरचे स्थळ मिळाले. तिच्या लग्नात खर्च झाला दीड लाख! आता घरात त्यांच्याबरोबर राहणारे अजून दोन सदस्य- पत्नी- विजया आणि मुलगा- दिनू! विजयाताई गृहिणी. दिनू नुकताच पदवीधर झालेला आणि डोक्यात धंदाच करायचा हा विचार. पण धंदा करायला सुरुवातीला जो अनुभव लागतो तो शून्य! एक दिवशी दिनू एक बिजिनेस प्रोपोजल घेऊन आला. कुठल्याशा धंद्यात आता दोन लाख गुंतवायचे आणि ३ वर्षांनी पाच लाख मिळवायचे. आणि हे दोन लाख रुपये यशवंतरावांना निवृत्तीच्या वेळी मिळालेल्या पशातून भरायचे. सुरुवातीला यशवंतराव या प्रस्तावाला अनुकूल नव्हते. पण दिन्यानी हट्टच धरला. ‘माझ्यावर तुमचा विश्वासच नाही’ असे म्हणून वडिलांना इमोशनल ब्लॅकमेलही केले. पुत्र प्रेमापोटी शेवटी यशवंतरावांनी त्याला दोन लाख रुपये दिले. अनुभव नसताना एखाद्या व्हेंचर मधे उडी घेतली की जे व्हायचे तेच झाले. पाच लाख रुपये सोडा , धंद्यात घातलेले दोन लाख रुपयेही गेले. दिनुनेही आत्मविश्वास गमावला. नोकरी- व्यवसाय काहीच करायचा नाही. यशवंतरावांना- विजयाताईंना धक्का बसला. आता पुढे कसं निभावणार? खर्च कसे भागवायचे? या चिंतेने त्यांना ग्रासले..श्री. सर्जेराव अहिरे , वय ६३ , राहणार नाशिक! तीन वर्षांपूर्वी एका सहकारी बँकेतून निवृत्त. निवृत्तीच्या वेळी सहा लाख रुपये मिळाले. हे पसे त्यांनी दरमहा योजनेत आणि बँकेच्या मुदत ठेवीत गुंतवले. दोन्ही मुलींची लग्न झालेली. एकीचे सासर मुंबईला आणि दुसरीचे पुण्याला. घरी ते आणि पत्नी दोघेच. एके दिवशी त्यांच्या एका मित्राने त्यांना एक गुंतवणूक योजना सांगितली- गुंतवणूक करतेवेळी एकरकमी ३००,००० रुपये त्या योजनेत गुंतवायचे. तात्काळ दरमहा ५,००० रुपये मिळणार आणि दोन वर्षांनी मिळणार ६००,०००! सर्जेरावांना मोह आवरला नाही. बँकेतील मुदत ठेव मोडली आणि ३००,००० रुपये त्या योजनेत गुंतवले. दोन वर्षांत ६००,००० रुपये मिळतील या आशेवर! दरमहा ५००० रुपयांचे पहिले एक-दोन धनादेश वटले. पण नंतर कळले की ती योजना मार्केटमधे आणणाऱ्या संचालकांनी पोबारा केला. कंपनीच्या कार्यालयालाही कुलूप. सर्जेरावांच्या पायाखालची जमीन सरकली..श्रीमती मालती कुलकर्णी यांना दोन मुलगे. मिस्टरांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. ते खाजगी कंपनीत नोकरी करायचे. निवृत्तीपश्चात जी रक्कम मिळाली त्यातून त्यांचे कसे-बसे चालायचे. दोघांनी आपल्या एकुलत्या एक मुलाला खूप कष्ट करून वाढवले, शिकवले होते. मुलाचे लग्न झाले. पहिले काही दिवस सून, मुलगा त्यांच्या सोबत राहिले; नंतर काही काळ गेल्यानंतर सुनेने दुसरीकडे स्वतंत्र राहण्याचा हट्ट धरला. स्त्री हट्टापुढे मुलाचे काही चालले नाही. ती दोघं त्यांना सोडून दुसरीकडे राहायला गेली. आपला लहान मुलगा सोबत राहून आपल्याला आíथक मदत करेल आणि सांभाळेल सुद्धा असे मालतीबाईना वाटत होते. पण झाले भलतेच.. त्यांना त्यांच्या वृद्धापकाळात सांभाळण्याचे बाजूला, लहान मुलाने आíथक मदत करण्यासही असमर्थता दर्शवली..ही मोजकीच उदाहरणे बोलकी आहेत. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. कदाचित प्रत्यक्ष घटना, उद्भवलेली परिस्थिती वेगळी असेल पण शेवटी परिणाम एकच.. वृद्धापकाळातील आíथक समस्या.. महिन्याला मिळत असलेली पेन्शन, मिळत असलेले व्याज पुरत नाही. ती रक्कम वाढावी यासाठी लागणारे मुद्दल जवळ नाही. आíथक मदत करणारे (आणि त्यांचा सांभाळ करणारे) जवळचे कोणी नाही. वैद्यकीय शास्त्रात झालेल्या प्रगतीमुळे आयुर्मान वाढलेले. ‘औषधे मरू देत नाहीत, आणि परिस्थिती जगू देत नाही’ अशी अवस्था झालेली.निवृत्तीनंतर उतारवयात पेन्शन मिळावी, व्याज मिळावे यासाठी खूप योजना आहेत पण मुद्दा असा आहे की (वर नमूद केलेल्या तीन उदाहरणाप्रमाणे) किंवा काही वेगळ्या कारणांनी गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक करायला जे मूळ मुद्दल लागतं तेच उपलब्ध होऊ शकणार नसेल तर काय? महिन्याचा घरगुती खर्च, औषधांचा खर्च, प्रवास खर्च हे सर्व कसं सांभाळायचं? त्यासाठी दरमहा जी रक्कम लागेल ती कशी मिळवायची? बरं त्या वयात कोणतीही बँक कर्जही देणार नाही. स्वतच्या नावावर असलेले घर विकण्याचा पर्याय आहे पण हा पर्याय सर्वाना लागू होईलच असे नाही. कारण घर विकून जाणार कुठे? अशा परिस्थितीत अनेक वयोवृद्ध हतबल होऊन त्यांच्या डोळ्यात आसू म्हणजे अश्रू येणे स्वाभाविक आहे. ही परिस्थिती ओढवलेल्या वयोवृद्धांच्या आयुष्याची संध्याकाळ सोनेरी होणं शक्य आहे का? त्यांच्या चेहऱ्यावर हासू म्हणजे हास्य येणे शक्य आहे का? अशी काही योजना आहे का?ज्यावेळेला पशाची मोठय़ा प्रमाणात गरज लागते त्यावेळी कर्ज काढले जाते. जसे की घर घेण्यासाठी. ते कर्ज फेडण्यासाठी दरमहा काही रक्कम ज्या बँकेकडून अथवा संस्थेकडून कर्ज घेतले आहे त्यांना द्यावी लागते. आणि मग ठरलेल्या मुदतीत ते कर्ज फेडावे लागते. अशा व्यवहारांमध्ये कर्ज देणारी बँक किंवा संस्था घेतलेले कर्ज फिटेपर्यंत ते घर तारण म्हणून आपल्या जवळ ठेवते आणि कर्ज फिटल्यावर ते घर कर्ज घेणाऱ्याच्या नावावर होऊन जाते. म्हणजे या व्यवहारात कर्जदार घर घेण्यासाठी ठराविक रकमेचे कर्ज घेतो, ते घर त्या बँकेकडे तारण ठेवतो आणि ते कर्ज फिटेपर्यंत बँकेला किंवा त्या संस्थेला दरमहा हप्ते भरतो.आता वयोवृद्धांचा विचार करता त्यांना त्या वयात कोणतीही बँक अथवा संस्था कर्ज देणार नाही. पण तरीही वर नमूद केलेल्या उदाहरणांचा विचार करता यशवंतराव, सर्जेराव आणि मालतीबाई एखाद्या सरकारी बँकेकडे गेल्या तर त्यांना त्यांच्या वृद्धापकाळात उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करता येईल आणि त्यांच्यावर आलेल्या प्रसंगामुळे डोळ्यात आलेल्या आसूंचे रुपांतर हास्यात होईल अशी योजना उपलब्ध आहे. ती म्हणजे रिव्हर्स मॉग्रेज योजना (फी५ी१२ी ट१३ॠंॠी रूँीेी)! २००७-०८ च्या केंद्रीय अर्थसंकल्पातून ही योजना पहिल्यांदा सादर झाली. त्यानंतर केंद्र शासनाने ३०/९/२००८ मध्ये ही योजना अधिसूचित केली. या योजनेत ‘रिव्हर्स’ हा शब्द अशासाठी की, या व्यवहारात पसे मिळणे बरोबर उलटे आहे. कारण इथे स्वतच्या मालकीचे घर तारण ठेवणारा वयोवृद्ध त्या बँकेला दरमहा पसे देत नाही तर बँक ते घर तारण ठेवणाऱ्या व्यक्तीला दरमहा किंवा एकरकमी ठरावीक रक्कम देते. अडचणीमध्ये सापडलेल्या वयोवृद्धांचे ही योजना आर्थिक स्वावलंबनच आहे. चार चाकी गाडीला चार गीयर असतात. ५ वा ‘रिव्हर्स’ गीयर गाडी मागे घेण्यासाठी असतो. पण लेखाच्या सुरुवातीला नमूद केलेल्या उदाहरणांप्रमाणे वयोवृद्धांच्या आयुष्यात जर आíथक समस्या निर्माण झाली तर ‘रिव्हर्स मॉग्रेज’च्या योजनेच्या आधारे आयुष्याची गाडी मागे न येता किंवा न थांबता पुढेच जाईल. परिस्थितीने दिलेले अश्रू पुसले जाऊन वयोवृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य उमटेल आणि आयुष्याची संध्याकाळ सोनेरी होईल असे वाटते.

प्राप्तीकर नियोजन सल्लागार, मुंबई
dattatrayakale9@yahoo.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2015 2:00 am

Web Title: finance advise for senior citizen
Next Stories
1 प्रत्येक घसरणीला खरेदी करण्याजोगा!
2 दुसऱ्या बँकेच्या मुदत ठेव पावत्यांवर तारण कर्जाला प्रतिबंध चुकीचाच!
3 भारताची आर्थिक कामगिरी चमकदार – नाणेनिधी
Just Now!
X