News Flash

फंडाचा ‘फंडा’.. आता सांगतो उत्तम गुण..

आज अनेक कंपन्या गुंतवणूकदारांना अ‍ॅप आधारित म्युच्युअल फंडांचे व्यवहार करण्याची सुविधा देत आहेत.

भालचंद्र जोशी bhalchandra.joshi@whiteoakindia.com

डॉक्टर, वकील, सनदी लेखापाल यांना त्यांचा सल्ला आणि ते देत असलेल्या सेवांसाठी आपण पैसे देतो. मग गुंतवणुकीच्या सल्ल्यांसाठी पैसे देण्यात गैर काय?

मागील काही लेखांमधून ‘एमएफडी’ किंवा ‘आरआयए’ बरोबर काम करण्याची गरज चांगला मार्गदर्शक असण्याचे फायदे, आणि त्यांचा शोध घेण्याच्या पद्धती आपण जाणून घेतल्या. त्यानंतर आजच्या या भागांत चांगला ‘एमएफडी’ किंवा ‘आरआयए’ कसा ओळखावा याची आपण चर्चा करणार आहोत.

माझ्या नैमित्तिक वाचनांत दासबोध असतो. प्रापंचिकात स्वार्थबुद्धी असल्यामुळे भक्ती, धर्म, परोपकार, दान, नम्रता, सदाचरण या सद्गुणांचे महत्त्व प्रापंचिकाला समजत नाहीत, असे समर्थानी म्हटले आहे. अशा निव्वळ प्रपंचात राहणाऱ्यांना समर्थानी ‘मूर्ख’देखील म्हटले आहे. या मूर्खाची लक्षणे विस्ताराने सांगितली आहेत. रोजच्या जगांत वावरताना आपल्याला अनेक प्रकारची आर्थिक घोडचुका केलेली (मूर्ख) माणसे भेटतात. दासबोधांत समर्थानी श्रोत्यांनी मूर्खपणा टाकून द्यावा आणि व्यावहारिक शहाणपण शिकावे, असा उपदेश केला आहे. ही मूर्ख लक्षणे लिहून झाल्यावर समर्थाना कदाचित वाटले असेल की, कदाचित यांचा उपयोग लोक टिंगळटवाळी, निंदानालस्ती करण्याकरता करतील. म्हणून समर्थानी लगेच पुढच्या समासात ‘उत्तम गुण’ सांगायला सुरुवात केली असावी. श्रोत्यांनी जर मूर्ख लक्षणे टाकून दिली आणि उत्तम गुण आत्मसात केले, तर ते सर्वज्ञ होतील असे समर्थानी म्हटले आहे. ‘आता सांगतो उत्तम गुण । जेणे करिता बाणे खूण । सर्वज्ञपणाची ॥’ आजच्या या लेखापुरता समर्थाच्या भूमिकेत शिरून चांगल्या ‘एमएफडी’ किंवा ‘आरआयए’ची लक्षणे काय असतात हे जाणून घेऊ.

पहिला गुण शुल्क आकारणीतील पारदर्शकता. आपण एखादा सक्रिय गुंतवणूकदार असाल तर, आपल्याला ‘सेबी’च्या निर्देशनांबद्दल माहिती असेल. ‘सेबी’कडून नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागारांशी (आरआयए) व्यवहार करण्यास सांगितले जाते. म्युच्युअल फंडांच्या ‘डायरेक्ट प्लान’मध्ये गुंतवणुकीच्या ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागारांना दिलेल्या सल्ल्यासाठी त्यांना शुल्क द्यावे लागते. जे म्युच्युअल फंडांच्या ‘रेग्युलर प्लान’मध्ये ‘एमएफडी’मार्फत गुंतवणूक करतात त्यांना वितरकाला (एमएफडी) त्यांच्या गुंतवणुकीबद्दल किती पैसे फंड घराण्याने दिले हे त्यांना पाठविण्यात येणाऱ्या एकत्रित फंड विवरणात दिलेले असते. ज्यांना ‘आरआयए’मार्फत गुंतवणूक करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी सेबीने शुल्क आकारणीच्या दोन पद्धती सुचविल्या आहेत. पहिली पद्धत, ‘फिक्स्ड फी’ जी मुख्यत्वे एखाद्या वर्गणीसारखी द्यायची असते. दुसरी ‘व्हेरिएबल फी’ जी व्यवस्थापित मालमत्तेच्या टक्केवारीनुसार (कमाल २.५ टक्के) ठरत असते. पहिल्यांदा ‘डायरेक्ट प्लान’ आणि नंतर सेबी कायद्यात ‘आरआयए’बाबत स्वतंत्र पुरवणी जोडण्यामागचा सेबीचा उद्देश ज्या गुंतवणूकदारांना शुल्कआधारित सल्लागारांची सशुल्क सेवा घ्यायची आहे त्यांच्यासाठी एक संरचना तयार करणे हा होता. शुल्काधारित रचनेमागील सेबीचे उद्दिष्ट आहे की संपूर्ण पारदर्शकता आणून गुंतवणूकदारांना उद्दिष्टलक्ष्यी, आर्थिक नियोजनाकडे वळविण्याचे आहे. सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार अर्थात ‘आरआयए’ शुल्काधारित रचना हे त्याचे पहिले पाऊल होते. डॉक्टर, वकील, सनदी लेखापाल यांना त्यांचा सल्ला आणि ते देत असलेल्या सेवांसाठी आपण पैसे देतो. मग गुंतवणुकीच्या सल्ल्यांसाठी पैसे देण्यात काय गैर आहे? आज म्युच्युअल फंडांच्या ‘डायरेक्ट प्लान’मधील मालमत्ता वाढताना दिसत असली तरी अनेक हौशे-नवशे-गवशे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय (शुल्क देण्यास कमीपणा वाटत असल्याने) गुंतवणूक करताना दिसतात. त्यांच्या धाडसाला दाद द्यावीशी वाटते. पण दुर्दैवाने या गुंतवणूकदारांना ते किती शक्तिशाली बॉम्बवर बसले आहेत याची कल्पना नाही.

आज अनेक कंपन्या गुंतवणूकदारांना अ‍ॅप आधारित म्युच्युअल फंडांचे व्यवहार करण्याची सुविधा देत आहेत. या अ‍ॅपआधारित सेवा देणाऱ्या कंपन्या ‘सेबी’कडे ‘आरआयए’ म्हणून नोंद झालेल्या असल्याने ते म्युच्युअल फंडांचे ‘डायरेक्ट प्लान’ विकतात. परंतु ही अ‍ॅप त्यांच्या ग्राहकांना सल्ला देत नाहीत जी अ‍ॅप सल्ला देतात तो सल्ला वैयक्तिक स्वरूपातला नसून कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अथवा अल्गोरिदमआधारित सल्ला असतो. त्यांचा महसूल मुख्यत्वे जाहिरातीच्या माध्यमातून येतो. हे गुंतवणूकदारांनी लक्षात घ्यायला हवे.

विश्लेषणात्मक कौशल्य हा दुसरा गुण असायला हवा. आर्थिक नियोजनात मालमत्ता नियोजन, गुंतवणुकीचे व्यवस्थापन, सेवानिवृत्ती योजना आणि कर यांचा समावेश असतो. संभाव्य सल्लागार यशस्वी होण्यासाठी त्यांच्याकडे आलेल्या पोर्टफोलिओचे विश्लेषण कसे करतो हेसुद्धा महत्वाचे असते. गुंतवणूकदारासाठी पोर्टफोलिओ विकसित करत असताना प्रत्येक अशिलासाठी वेगळी पद्धत अवलंबविणे आवश्यक आहे. एका यशस्वी सल्लागाराकडे आकडेमोडीचे कौशल्य असायला हवे. बाजारातील चढ-उताराच्या वेळी ग्राहकांना योग्य आर्थिक निर्णयासाठी मार्गदर्शन करताना त्यामागची कारणे विशद करता यायला हवीत.

पुढील भागांत आणखी कोणती कौशल्ये असणे गरजेचे असते हे आपण जाणून घेणार आहोत.

तळटीप : म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखमींच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाचे माहितीपत्रक कृपया सखोल अभ्यासा.

लेखक व्हाइट ओक कॅपिटल  मॅनेजमेंटचे कार्यकारी संचालक आणि मुख्य परिचालन अधिकारी

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2021 1:06 am

Web Title: financial advisors fees investment tips from financial advisors zws 70
Next Stories
1 बाजाराचा तंत्र-कल  :  दिसते मजला  सुखचित्र नवे!
2 रपेट बाजाराची : नव्या शिखरावर
3 करावे  कर-समाधान : विवरणपत्र भरण्यास मुदतवाढ, पण.. 
Just Now!
X