• प्रश्न : मी एक घर खरेदी करीत आहे. त्या घराचे करारमूल्य ७५ लाख रुपये इतके ठरविण्यात आले आहे. मला या रकमेवर उद्गम कर (टीडीएस) कापावा लागेल का? – प्रभाकर सावंत, पुणे 

उत्तर : स्थावर मालमत्तेचे खरेदी मूल्य ५० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर ‘कलम १९४ आयए’नुसार स्थावर मालमत्तेसाठी दिलेल्या रकमेवर १ टक्का उद्गम कर कापणे बंधनकारक आहे. तुम्ही ज्या व्यक्तीकडून घर खरेदी करणार आहात ती व्यक्ती ‘निवासी भारतीय’ असेल तरच या तरतुदी लागू आहेत. आपल्या घराचे खरेदी मूल्य ७५ लाख रुपये असल्यामुळे आपल्याला उद्गम कर कापावा लागेल.

  • प्रश्न : माझे मामा वयस्क आणि थकल्या कारणाने बँकेचे हिशेब करू शकत नाहीत. या कारणामुळे मला ऑगस्ट २०१७ मध्ये माझ्या मामाकडून ५,५०,००० रुपये ठेव म्हणून मिळाले. मला त्यावर कर भरावा लागेल का? – दिनकर टाक, पुणे

उत्तर : आपल्या मामाने ही रक्कम आपल्या नावाने ‘ठेव’ म्हणून ठेवली तर ही रक्कम आपले करपात्र उत्पन्न म्हणून गणली जाणार नाही. ही रक्कम ‘भेट’ म्हणून जरी दिली तरी त्यावर कर भरावा लागणार नाही. मामा म्हणजे आईचा भाऊ, याचा ‘कलम ५६’नुसार ‘नातेवाईक’ या संज्ञेमध्ये समावेश होतो. त्यामुळे आपल्याला मामाकडून मिळालेल्या रकमेवर कर भरावा लागणार नाही.

  • प्रश्न : मी जून २०१६ मध्ये एक सदनिका बुक केली होती. या सदनिकेचा ताबा मला जून २०१८ मध्ये मिळणार आहे. एप्रिल २०१७ मध्ये मी गृह कर्ज घेतले आणि ऑक्टोबर २०१७ पासून गृह कर्जाचा हप्तता भरण्यास सुरुवात केली. आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये एकूण २,४०,००० रुपये हप्त्यापोटी भरले. या रकमेची मला उत्पन्नातून वजावट मिळेल का? – हितेश कुलकर्णी, ठाणे</strong>

उत्तर : घराचा ताबा घेतल्याशिवाय गृह कर्जाच्या व्याजाची किंवा मुद्दल परतफेडीची वजावट घेता येत नाही. आपल्याला घराचा ताबा जून २०१८ मध्ये म्हणजेच आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये गृह कर्जाच्या व्याजाची आणि मुद्दल परतफेडीची वजावट मिळणार नाही. ज्या वर्षी ताबा मिळेल त्या वर्षीपासून या वजावटी घेता येतील; परंतु घराचा ताबा घेण्यापूर्वी दिलेल्या व्याजाची वजावट ताबा घेतलेल्या वर्षांपासून पाच वर्षे (ताबा घेतलेले वर्ष धरून) सम प्रमाणात विभागून मिळते.

  • प्रश्न : मी सरकारी नोकरीत आहे. माझे वार्षिक उत्पन्न कमाल करमुक्त मर्यादेपेक्षा जास्त नाही. माझी दोन डीमॅट खाती आहेत. यामध्ये मी शेअर्सची खरेदी-विक्री करतो. याशिवाय मी म्युच्युअल फंडात ‘सिप’ (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान) सुद्धा सुरू केले आहे. हा व्यवहार मला विवरणपत्रात दाखवावा लागेल का? – नंदकिशोर पवार, अहमदनगर

उत्तर : शेअर्सचा किंवा म्युच्युअल फंडातील युनिट्सचा विक्री व्यवहार विवरणपत्रात दाखवावा लागतो. विक्री केल्यानंतर होणारा नफा हा अल्प मुदतीचा किंवा दीर्घ मुदतीचा असतो. अल्प मुदतीचा असेल तर तो करपात्र आहे आणि दीर्घ मुदतीचा असेल तर तो करमुक्त असेल (शेअर बाजारातर्फे विक्री केली असल्यास आणि त्यावर रोखे उलाढाल कर (एसटीटी) भरला असल्यास).

हे दोन्ही प्रकारचे व्यवहार विवरणपत्रात दाखविणे बंधनकारक आहे. उत्पन्न करपात्र असल्यास करपात्र उत्पन्नात दाखवून त्यावर कर भरावा लागेल आणि करमुक्त उत्पन्न असेल तर ‘करमुक्त उत्पन्न’ या सदरात दाखवावा लागेल.

  • प्रश्न : प्राप्तिकर कायदा ‘कलम ८० ई’ अंतर्गत, ज्याद्वारे शैक्षणिक कर्जावर घेतलेल्या व्याजाची वजावट मिळते, जास्तीत जास्त किती सूट घेता येते? मी एका संस्थेला ५,००० रुपयांची देणगी दिली आहे. मला १०० टक्के वजावट घेता येइल का? – विजय पाटील, मुंबई

उत्तर : ‘कलम ८० ई’नुसार उच्च शिक्षणासाठी म्हणजेच सीनिअर सेकण्डरी किंवा तत्सम परीक्षेनंतर शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजावर उत्पन्नातून वजावट मिळते. उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याजाच्या वजावटीला मर्यादा नाही. ही वजावट उत्पन्नापेक्षा जास्त असू शकत नाही. ‘कलम ८० जी’नुसार काही देणग्यांवर ५० टक्के सूट मिळते आणि काही देणग्यांवर १०० टक्के सूट मिळते, अशा देणग्या ‘कलम ८० जी (२)’मध्ये दर्शविलेल्या आहेत.

याशिवाय काही देणग्यांची वजावट ही पात्र मर्यादेच्या १० टक्क्य़ांपेक्षा जास्त मिळत नाही, तर काही देणग्यांवर अशी मर्यादा नाही. आपण देणगी कोणत्या संस्थेला दिली आहे यावर ‘कलम ८० जी’नुसार वजावट मिळू शकते का हे अवलंबून आहे. राष्ट्रीय संरक्षण निधी, प्रधानमंत्री राष्ट्रीय मदतनिधी, मुख्यमंत्री भूकंप निधी, महाराष्ट्र, आर्मी, नौदल, एअर सेंट्रल वेल्फेअर फंड, स्वच्छ भारत कोश वगैरे निधीसाठी दिलेल्या देणग्यांसाठी १०० टक्के सूट मिळते आणि पात्र मर्यादादेखील नाही.

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन, मान्यताप्राप्त परिवार नियोजन संस्था यांना देणगी दिल्यास १०० टक्के सूट मिळते. परंतु पात्र मर्यादा १० टक्के इतकी आहे. जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंड, प्रधानमंत्री दुष्काळ मदतनिधी वगैरे निधीसाठी दिलेल्या देणग्यांसाठी ५० टक्के सूट मिळते आणि पात्र मर्यादा नाही.

याव्यतिरिक्त इतर धर्मादाय संस्थांना दिलेल्या देणग्यांवर ५० टक्के सूट मिळते आणि पात्र मर्यादा १० टक्के इतकी आहे.

  • प्रश्न : मी नोंदणी केलेल्या पतपेढीकडून घरदुरुस्तीसाठी कर्ज घेतले आहे. तर त्यावरील व्याज व मुद्दल यावर प्राप्तिकरामध्ये सूट मिळेल का? असेल तर कोणत्या नियमाने? – संजय तिकोणे, ठाणे

उत्तर : घरदुरुस्तीसाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याजावर ३०,००० रुपयांपर्यंत ‘कलम २४’नुसार वजावट मिळते. घरदुरुस्तीसाठी घेतलेल्या कर्जाच्या मुद्दल परतफेडीची वजावट मिळत नाही. ‘कलम ८० सी’नुसार मिळणारी मुद्दल परतफेडीची वजावट फक्त नवे घर घेण्यासाठी वा बांधण्यासाठी घेतलेल्या कर्जासाठी मिळते, घरदुरुस्ती कर्जासाठी नाही.

  • प्रश्न : मी एक बावन्न वर्षे वय असलेली सरकारी कर्मचारी आहे व दरवर्षी नियमित प्राप्तिकर भरत आहे. माझ्या नावावर असलेली एक जागा (घर) मला विकावयाची आहे. माझा प्रश्न असा आहे की, मला या व्यवहारावर किती टक्के कर भरावा लागेल? आणि जर या व्यवहारातून मिळालेली रक्कम मी दुसरी जागा विकत घेण्यासाठी वापरली तर माझा कर वाचू शकेल का? व किती? यासाठी मिळालेल्या रकमेपैकी किती रक्कम मी अन्य जागेमध्ये गुंतवावयास हवी? किंवा जर या रकमेतून मला दुसरी जागा घ्यायची नसेल तर कराची रक्कम वाचवण्यासाठी सुरक्षित गुंतवणुकीचे इतर काय पर्याय आहेत याची कृपया माहिती द्याल का? – एक वाचक, मुंबई

उत्तर : आपले घर खरेदी केल्या तारखेपासून दोन वर्षांनंतर विक्री केल्यास होणारा नफा हा दीर्घ मुदतीचा असतो. अशा दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यासाठीच कर बचतीचे गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत.

अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर करदात्याच्या स्लॅबप्रमाणे कर भरण्यावाचून पर्याय नाही. दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर २० टक्के इतका कर भरावा लागतो. भांडवली नफा गणताना महागाई निर्देशांकाचा फायदासुद्धा घेता येतो. आपल्याला अशा दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर कर भरावयाचा नसेल तर गुंतवणुकीचे काही पर्याय उपलब्ध आहेत.

एक पर्याय म्हणजे ‘कलम ५४’नुसार भांडवली नफ्याएवढी रक्कम नवीन घरात गुंतवावी. ही रक्कम घराची विक्री केलेल्या तारखेपासून एक वर्षे आधी किंवा २ वर्षांच्या आत (बांधले तर तीन वर्षांच्या आत) नवीन घरात गुंतविल्यास कर भरावा लागणार नाही. ज्या वर्षी घर विक्री केली त्या वर्षीचे विवरणपत्र भरण्याच्या मुदतीपूर्वी नवीन घर विकत (किंवा बांधू) न घेतल्यास ती रक्कम ‘भांडवली नफा खाते योजना, १९८८’ बँकेत ठेवावी लागते. याशिवाय इतर काही अटींची पूर्तता करावी लागेल.

दुसरा पर्याय हा ‘कलम ५४ ईसी’नुसार बाँडमध्ये गुंतवणूक करणे. भांडवली नफ्याएवढी रक्कम या बाँडमध्ये गुंतविली तर आपल्याला कर भरावा लागणार नाही. या बाँडची मर्यादा ५० लाख रुपये आहे. हे बाँड तुम्हाला घराची विक्री केल्या तारखेपासून सहा महिन्यांत घ्यावे लागतात. या बाँडचा धारणकाळ तीन वर्षे आहे आणि या बाँडवर ५.२५ टक्के दरसाल व्याज मिळते.

यंदाच्या अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार, १ एप्रिल २०१८ नंतर खरेदी केलेल्या बाँडचा धारणकाळ पाच वर्षे असेल. या वर्षीपासून ‘स्टार्ट-अप’ला चालना देण्यासाठी ‘कलम ५४ ईई’नुसारसुद्धा बाँडमध्ये गुंतवणूक करता येते. या कलमानुसारसुद्धा गुंतवणुकीची कमाल मर्यादा ५० लाख रुपये आहे. ही गुंतवणूकही घराची विक्री केल्या तारखेपासून सहा महिन्यांत करावी लागेल.

– प्रवीण देशपांडे

pravin3966@rediffmail.com