माझे ‘आय फास्ट’ या म्युच्युअल फंड वितरकाकडे ऑनलाइन प्रकारचे खाते आहे.  मला पारंपरिक पद्धतीचे खाते असावे असे वाटते. माझा ‘आरएम’ मला ऑनलाइन पद्धतीच्या खात्यासाठी आग्रह धरीत आहे. या दोघांमधील फरक काय?  यापुढे  पारंपरिक पद्धतीने खाते चालू ठेवले तर काय अडचणी येतील?     – कृष्णा सावंत (ई-मेलने)

नव्याने गुंतवणूक करू लागलेल्या ज्येष्ठ नागरिक असलेल्या गुंतवणूकदारांना सध्याच्या युगातील डिजिटल खाते सुरक्षित नाही अशी भावना निर्माण होणे साहजिक आहे. आयुष्यभर कागदावरचे (फिजिकल) व्यवहार केल्याने कागदविरहित (डिजिटल) व्यवहारांवर विसंबून राहणे थोडे कठीण होते हे मान्य करूनदेखील तुम्ही नवीन बदलांशी जुळवून घेणे तुमच्या हिताचे कसे ते पाहू. डिजिटल खाते हे ‘२४ ७ ७’ म्हणजे अहोरात्र पाहता येते. फिजिकल खाते असेल तर तुमच्या गुंतवणूक मूल्यांकनासाठी म्युच्युअल फंडांच्या कार्यालयीन वेळेत तेथील कर्मचाऱ्यावर विसंबून राहावे लागते. हा कर्मचारी तुम्हाला तुमचे ‘होल्डिंग स्टेटमेंट’ ई मेलने तुम्हाला पाठवतो म्हणजे हे स्टेटमेंट इलेक्ट्रोनिक फॉर्ममध्ये म्हणजेच डिजिटल पद्धतीने येते. डिजिटल पद्धतीत फक्त स्टेटमेंट म्हणजे गुंतवणुकीचे मूल्यांकन आणि परताव्याचा दर (आयआरआर) समजतो. फिजिकल खात्यात स्टेटमेंट मिळत असल्याने मूल्यांकन समजते आयआरआर समजत नाही. गुंतवणूकीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करताना, गुंतवणुकीवर अपेक्षित परतावा मिळत नसल्यास त्या गुंतवणुकीतून पैसे काढून दुसऱ्या फंडात गुंतवणूक करता येते. किंवा एखाद्या चांगला परतावा देणाऱ्या फंडात अतिरिक्त निधी गुंतविता येतो. हा पैसे काढून घेण्याचा किंवा अतिरिक्त गुंतवणूक करण्याचा निर्णय परताव्याच्या दरावर ठरतो. खाते डिजिटल असेल तर परताव्याचा दर लगेचच कळतो.

तुम्ही जेव्हा ‘नॅश मॅनडेट’ सही करता तेव्हा हा ‘नॅश मॅनडेट’ फॉर्म म्युच्युअल फंडाच्या नावे किंवा बीएसई अथवा एनएसईच्या क्लिअरिंग हाऊसच्या नावे असतो. हा फॉर्म तुम्ही ‘आयफास्ट’ किंवा अन्य कुठल्याही वितरकाच्या नावे दिलेला नसल्याने या पैशाचा अपहार होण्याची शक्यता जवळ जवळ नसते. म्युच्युअल फंडाचे व्यवहार रोखीने होत नसतात. समजा डिजिटल मंचावरून चुकून खरेदीची ऑर्डर गेली तरी तुमचे बँक खाते आणि म्युच्युअल फंड खाते (फोलिओ) यांची सांगड घातलेली असल्याने  तुमच्या बँक खात्यातून वजा झालेली रक्कम तुम्ही निश्चित केलेल्या म्युच्युअल फंडात गुंतविली जाते. त्याच प्रमाणे विक्री केल्याची ऑर्डर नोंदविल्यानंतर जमा होणारी रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल. तेव्हा पैशाचा अपहार होईल अशी भीती बाळगण्याचे कारण नाही. डिजिटल मंचाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कागद आणि धनादेशविरहित व्यवहार होत असल्याने कागदाची प्रत्यक्ष हाताळणी होत नाही. व्यवहार वेळेत पूर्ण होतो. डिजिटल खात्याचे अनेक फायदे वर विशद केले आहेत. डिजिटल व्यवहार हे वितरकापेक्षा गुंतवणूकदाराच्या सोयीचे आहेत.