28 February 2021

News Flash

जागा विक्रीसाठी झालेल्या खर्चाची वजावट मिळणे शक्य

मी जून २००४ मध्ये एक प्लॉट ६,५०,००० रुपयांना खरेदी केला.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| प्रवीण देशपांडे

  • प्रश्न : मी जून २००४ मध्ये एक प्लॉट ६,५०,००० रुपयांना खरेदी केला. तो मी ऑक्टोबर २०१८ मध्ये २६ लाख रुपयांना विकला. या व्यवहारात २५,००० रुपयांची दलाली दिली. हे पैसे मुलाच्या शिक्षणासाठी वापरावयाचे असल्यामुळे मी कर वाचविण्यासाठी कोणतीही गुंतवणूक करू इच्छित नाही. या व्यवहारावर किती कर भरावा लागेल? आणि कधी भरावा लागेल? – अजय देशमुख.

उत्तर : तुमची संपत्ती दीर्घ मुदतीची असल्यामुळे महागाई निर्देशाकाचा फायदा घेता येईल. या नुसार झालेला दीर्घ मुदतीचा भांडवली नफा तक्त्यात दिला आहे. तुम्ही दिलेली प्लॉटची प्रत्यक्ष विक्री किंमत (२६ लाख रुपये) ही मुद्रांक शुल्कानुसारच्या मुल्यांकनापेक्षा जास्त आहे असे गृहीत धरले आहे. विक्रीसाठी झालेल्या खर्चाची वजावट (दलाली) आपल्याला मिळू शकते. या नुसार २,००,५९१ रुपये इतका कर भरावा लागेल. तुम्ही जर निवासी भारतीय ज्येष्ठ नागरिक (वय ६० वर्षांंपेक्षा जास्त) असाल आणि आपल्या उत्पन्नात व्यवसायाच्या समावेश नसेल तर  हा कर जुलै २०१९ मध्ये विवरणपत्र भरण्यापूर्वी स्व-निर्धारण कररुपात भरू शकता. ज्येष्ठ नागरिक नसाल तर या कराची ७५% रक्कम (म्हणजेच १,५०,४४३ रुपये) १५ डिसेंबर २०१८ पूर्वी अग्रिम कररुपात भरावी लागेल आणि बाकीची रक्कम १५ मार्च २०१९ पूर्वी अग्रिम कराच्या रुपात भरावी लागेल.

  • प्रश्न : मी अनिवासी भारतीय आहे. मे २००३ मध्ये शेअर बाजारात नोंदणीकृत कंपनीचे शेअर्स ३०,००० रुपयांना खरेदी केले. हे शेअर्स मित्राला ४,५०,००० रुपयांना जून २०१८ मध्ये विकले. या व्यवहारा व्यतिरिक्त माझे २ लाख रुपयांचे व्याजाचे उत्पन्न आहे. मला या वर्षी किती कर भरावा लागेल? – उत्तरा कुलकर्णी.

उत्तर : तुम्ही शेअर्स शेअर बाजारातर्फे विकलेले नसल्यामुळे त्यावर एस.टी.टी. भरला गेला नाही. तुम्हाला कलम ११२ अ चा फायदा घेता येणार नाही (या कलमानुसार १ लाख रुपयांपर्यंतचा दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर कर नाही आणि त्यावरील रकमेवर १०% कर भरावा लागतो). परंतु कर भरण्यासाठी दोन पर्याय आहेत. महागाई निर्देशाकाचा फायदा घेऊन भांडवली नफ्यावर २०% कर आणि महागाई निर्देशांकाचा फायदा न घेता १०% कर. या दोन पर्यायामध्ये जो फायदेशीर असेल तो निवडता येतो. या दोन्ही पर्यायानुसार भांडवली नफ्यावर कर तक्त्यात दिल्याप्रमाणे असेल. आपल्या बाबतीत महागाई निर्देशाकाचा फायदा न घेता आपल्याला कमी कर भरावा लागतो म्हणून आपण हा पर्याय निवडू शकता. या नुसार एकूण करपात्र उत्पन्न आणि कर दायित्व दुसऱ्या तक्त्यात आहे. भांडवली नफ्याव्यतिरिक्त उत्पन्न कमाल करमुक्त मर्यादेपेक्षा कमी (२,५०,००० रुपयांच्या पेक्षा कमी) असल्यामुळे  या उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही. भांडवली नफ्यावर १०% प्रमाणे कर भरू शकता.

  • प्रश्न : मी एक छोटा किरकोळ गृहपयोगी वस्तूंच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय यावर्षी सुरू केला आहे. मला लेखे ठेवणे बंधनकारक आहे का? असल्यास कोणत्या प्रकारचे लेखे ठेवणे गरजेचे आहे? – प्रशांत पाटील : सोलापूर

उत्तर : ज्या व्यक्ती व्यवसाय करतात अशा व्यवसायाचे उत्पन्न २,५०,००० रुपयांपेक्षा जास्त आहे किंवा मागील तीन वर्षांतील कोणत्याही एका वर्षांची उलाढाल किंवा एकूण जमा २५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यांना लेखे ठेवणे बंधनकारक आहे. या तरतुदी फक्त वैयक्तिक किंवा हिंदू अविभक्त कुटुंब यांना लागू आहेत. इतर करदात्यांसाठी वरील उत्पन्नाची मर्यादा १,२०,००० रुपये आणि उलाढालीची मर्यादा १० लाख रुपये इतकी आहे. या तरतुदी ठराविक व्यवसाय करणाऱ्यांसाठी (म्हणजे वकील, डॉक्टर, सी.ए., इंजिनिअर, वगैरे) लागू नाहीत. तुम्ही व्यवसाय यावर्षी सुरू केला असल्यामुळे वर नमूद केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न किंवा उलाढाल व्यवसायातून अपेक्षित असेल तर आपल्याला लेखे ठेवणे बंधनकरक आहे. परंतु तुम्ही ४४ एडी या कलमानुसार जर अनुमानावर आधारित (प्रिझमटीव्ह) ८% किंवा ६% किंवा जास्त नफा दाखवून त्यावर कर भरणार (व्यवसायाची उलाढाल २ कोटी रुपयांपेक्षा कमी असेल तर) असाल तर तुम्हाला लेखे ठेवण्याच्या तरतुदी लागू होत नाहीत. परंतु आपल्या माहितीसाठी लेखे ठेवणे हितावह आहे.

  • प्रश्न : ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज उत्पन्नावर काय सवलत आहेत? – अरविंद काळे.

उत्तर : ज्येष्ठ नागरिकांना (ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे) कलम ८० टीटीबीनुसार, बँकेच्या, पोस्ट ऑफिसच्या किंवा सहकारी बँकेच्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावर ५०,००० रुपयांपर्यंतची उत्पन्नातून सूट मिळते. बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजाचासुद्धा यामध्ये समावेश होतो. इतर नागरिकांना कलम ८० टीटीएनुसार फक्त बचत खात्यावरील व्याजावर १०,००० रुपयांपर्यंतची उत्पन्नातून सूट मिळते. ज्येष्ठ नागरिकांना व्याजावरील उत्पन्नावर होणाऱ्या उद्गम कराच्या (टी.डी.एस.) तरतुदींसाठी सुद्धा मर्यादा ५०,००० रुपये इतकी वाढविली आहे. त्यामुळे ५०,००० रुपयांपेक्षा कमी व्याज मिळणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा उद्गम कर कापला जाणार नाही.

  • प्रश्न : मी पर्मनंट अकाऊंट नंबर (पॅन) काढला नाही. बँकेत काही जुन्या ठेवी आहेत. या ठेवींवरील व्याज आता १०,००० रुपयांपेक्षा जास्त होत असल्यामुळे उद्गम कराच्या तरतुदी लागू होतील असे बँकेने सांगितले आहे आणि उद्गम कर कापला न जाण्यासाठी फॉर्म १५ जी/एच देण्याचे सांगितले आहे. हा फॉर्म बँकेला सादर करू शकते का?   – मेघा सरदेसाई.

उत्तर : ज्या करदात्यांकडे पर्मनंट अकाऊंट नंबर आहे तेच करदाते फॉर्म १५ जी/एच फॉर्म बँकेला देऊ  शकतात. जर आपल्याकडे पॅन नसेल तर बँकेला २०% इतक्या दराने उद्गम कर कापावा लागेल. हे वाचवायचे असेल तर आपण पॅनसाठी अर्ज करून पॅन मिळाल्यानंतर बँकेला फॉर्म १५ जी/एच सादर करू शकता.

  • प्रश्न : वर्षीपासून ४०,००० रुपयांची प्रमाणित वजावट लागू केली आहे. ही वजावट मला फॅमिली पेन्शनच्या उत्पन्नातून घेता येईल का? – कृष्णा जाधव.

उत्तर : या वर्षीपासून (आर्थिक वर्ष २०१८-१९ पासून) लागू करण्यात आलेली ४०,००० रुपयांपर्यंतची प्रमाणित वजावट ही ‘पगारातून’ मिळणाऱ्या उत्पन्नासाठी आहे. फॅमिली पेन्शनचे उत्पन्न हे ‘इतर उत्पन्न’ म्हणून गणले जाते त्यामुळे ही प्रमाणित वजावट फॅमिली पेन्शनच्या उत्पन्नासाठी घेता येत नाही.

  • प्रश्न : वाढदिवसानिमित्त माझ्या १० मित्रांकडून मला प्रत्येकी सरासरी ६,००० रुपये प्रमाणे ६०,००० रुपये भेट मिळाले. किती उत्पन्न करपात्र आहे? – सुरेंद्र वाघुले.

उत्तर : एका वर्षांत करदात्याला ५०,००० रुपयांपेक्षा जास्त भेट मिळाळी असतील तर त्या करपात्र आहेत. ती अनेक व्यक्तींकडून मिळाली असली तरी. जर एकूण भेट ५०,००० रुपयांपेक्षा कमी असतील तर ते उत्पन्न करपात्र उत्पन्नात गणले जात नाही. परंतु एकूण भेट ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर संपूर्ण रक्कम (फक्त ५०,००० रुपयांच्या पेक्षा जास्त नाही) ही करपात्र उत्पन्नात गणली जाते. त्यामुळे आपल्या बाबतीत एकूण भेट ६०,००० रुपये असल्यामुळे आपल्याला ही संपूर्ण रक्कम करपात्र होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2018 12:54 am

Web Title: financial guidance by loksatta
Next Stories
1 मुले व नातवंडांसाठी गुंतवणूक
2 तारेवरची चिनी कसरत
3 यंदा पोलाद उद्योगाला बरे दिवस!
Just Now!
X