News Flash

फंडाचा ‘फंडा’… : वित्तीय मार्गदर्शक गरजेचाच!

आपण या गोष्टींसाठी वेळ काढत असलात तरी गुंतवणूक व्यवस्थापन हे प्रत्येकासाठी स्वारस्यपूर्ण नक्कीच नसते.

|| भालचंद्र जोशी

आपल्या बचतीची कार्यक्षमता वाढवायची असेल तर कौटुंबिक डॉक्टरप्रमाणे एक उत्तम आर्थिक सल्लागार व मार्गदर्शक मग तो ‘आरआयए’ किंवा ‘एमएफडी’च्या रूपात शोधायला हवा.

वॉरेन बफे यांचे एक प्रसिद्ध वाक्य मला खूपच आवडते. बफे म्हणतात, kIf you don’t find a way to make money while you sleep, you will work until you diel. अर्थात ‘तुम्ही झोपेत असाल तेव्हा तुमची बचत काम करीत नसेल तर तुम्हाला शेवटपर्यंत पैसे कमविण्यासाठी काम करावे लागेल.’ त्या विधानाचा मला समजलेला अर्थ असा आहे. आता आपण झोपलेलो असताना आपली बचत कार्यरत राहावी असे वाटत असेल तर एका चांगल्या गुंतवणूक सल्लागाराची आवश्यकता आहे. या ठिकाणी गुंतवणूक सल्लागार हा शब्दप्रयोग मार्गदर्शक या व्यापक अर्थाने आहे. ‘अ‍ॅम्फी’ नोंदणीकृत म्युच्युअल फंड वितरक (एमएफडी) आणि ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार (आरआयए) या दोन्हींचा मार्गदर्शक या व्याख्येत समावेश करण्याचे स्वातंत्र्य या लेखापुरते मी घेत आहे.

वर्षानुवर्षे एक प्रश्न कायम विचारला जातो तो म्हणजे, गुंतवणुकीसाठी आर्थिक सल्लागार शोधावा की स्वत:ची गुंतवणूक स्वत: व्यवस्थापित (डीआयवाय) करायची?

हा प्रश्न आणि त्याचे उत्तर हे आपल्या आर्थिक नियोजन प्रक्रियेतील महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय असतो. अनेकांना आर्थिक नियोजक किंवा गुंतवणूक सल्लागारांच्या मदतीची आवश्यकता नाही असे वाटते. परंतु तुम्हाला गुंतवणूक सल्लागारांची आवश्यकता आहे अथवा नाही हे ठरविणाऱ्या गोष्टींची उकल करण्याची अत्यंत गरज आहे. आपली दीर्घकालीन गुंतवणूक व्यवस्थापित करण्यासाठी योग्य निर्णय वेळोवेळी घेणे गरजेचे असते. हा फक्त एका वेळेचा निर्णय नसतो. यासाठी चौफेर ज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करणे आणि त्या अनुषंगाने आपले ज्ञान सतत अपडेट करत रहाणे गरजेचे असते. कौशल्ये आत्मसात करण्यास लागणारा वेळ सतत द्यावा लागतो ही गोष्ट थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू. जो वेळ तुम्ही कौशल्ये आत्मसात करण्यासाठी वापरणार आहात त्या वेळेचा सदुपयोग आयुष्यात बऱ्याच गोष्टी करण्यासाठी तुम्ही प्रभावीपणे वापरू शकता. व्यायाम करणे, फिरायला जाणे, व्यावसायिक कौशल्य आत्मसात करणे. एखादी नवीन भाषा शिकणे यासाठी हा वेळ वापरू शकता. एक लक्षात ठेवा की, वेळ ही आपली सर्वात मौल्यवान गोष्ट आहे आणि ती मर्यादित आहे. व्यस्त अधिकारी, व्यावसायिक, नोकरदार पालक आणि कुटुंबातील सदस्यांच्या गरजेकडे काळजीपूर्वक लक्ष देणारी त्या कुटुंबातील स्त्री अथवा पुरुष यांच्याकडे महत्त्वाच्या अनेक गोष्टी आहेत ज्याला त्यांनी प्राथमिकता द्यायला हवी. आर्थिक प्रश्नांवर सतत संशोधन करण्यासाठी वेळ देणे, उपलब्ध पर्यायांचे सतत मूल्यमापन करून, निर्णयाची अंमलबजावणी करण्यास खूप वेळ द्यावा लागतो. पुन्हा निर्णय चुकला तर होणारे आर्थिक नुकसान निराळे.

आपण या गोष्टींसाठी वेळ काढत असलात तरी गुंतवणूक व्यवस्थापन हे प्रत्येकासाठी स्वारस्यपूर्ण नक्कीच नसते. आपल्यापैकी अनेकांनी ‘कोअर कॉम्पिटन्सी’ या व्यवस्थापन सिद्धांताबद्दल ऐकले असेल. प्रत्येक कंपनीची (किंवा व्यक्तीची) कार्यक्षमता ही विशिष्ट प्रकारचे काम करण्यात असते. त्या कामासाठी लागणारी संसाधने वापरण्याची आपली क्षमता असते. त्यामध्ये व्यवसायाचे एकंदरीत फायदे असतात. जसे की एखादी वाहन निर्माती कंपनी सुटे भाग विशिष्ट कंपनीकडून विकत घेते. ती वाहननिर्मिती कंपनी सुटे भाग बनवू शकणार नाही असे नसते. परंतु त्या कंपनीचा मुख्य व्यवसाय वाहनांची निर्मिती करणे असल्याने ती वाहन निर्मिती करणारी कंपनी इंजिनची इंधन कार्यक्षमता वाढविणे, नवीन उत्पादने विकसित करणे यासाठी आपले कुशल मनुष्यबळ, वित्त, यंत्रसामग्री आदी संसाधने वापरते. अलीकडच्या काळात असे संशोधनांती सिद्ध झाले आहे की, ज्या व्यक्ती आणि संस्था आपली क्षमता त्यांच्या मुख्य कौशल्ये विकसित करण्यासाठी वापरतात, ते त्यांच्या नोकरीत किंवा व्यवसायात वेगाने प्रगती करतात.

अनेकजण आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधण्यकरिता ‘गूगल’चा वापर करतात. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपल्याला पडलेल्या सर्वच आर्थिक प्रश्नांची उत्तरे ‘गूगल’कडे नसतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की, वित्तीय व्यवस्थापन आणि त्याचे दीर्घकालीन नियोजन ही वैयक्तिक गोष्ट आहे. दोन सख्ख्या भावांचे, दोन बहिणींचे, नवरा बायकोचे, आई मुलीचे, वडील आणि मुलाचे आर्थिक वर्तन वेगवेगळे असते. त्यांच्या भावना, संवेदना, पूर्वानुभव यावर आर्थिक वर्तन निश्चिात होत असते. इतक्या जवळच्या नात्याच्या दोन व्यक्तींचे आर्थिक वर्तन जर एकसारखे नसते तर ‘गूगल’ने सुचविलेल्या अपरिचित कधीही न पाहिलेल्या व्यक्तीचे आणि तुमचे आर्थिक नियोजन सारखे असेल काय? आपले आर्थिक आणि भावनिक जीवन गुंतागुंतीचे आणि एकमेकांशी संबंधित आहे. आर्थिक नियोजनातील चुकीच्या निर्णयामुळे आपल्या आयुष्यातील इतर निगडित निर्णयावर गंभीर परिणाम होऊ  शकतात. एखादा आर्थिक सल्लागार आपल्यासमोर आर्थिक जोखीम आणि उपलब्ध संधी यांचा मेळ साधत तुमच्या बचतीचे उत्तम व्यवस्थापन करू शकेल. सर्वसाधारणपणे आपली गुंतवणूक एकापेक्षा अधिक ठिकाणी विखुरलेली असल्यास आपण आर्थिकदृष्ट्या कुठल्या टप्प्यावर आहोत, हे स्वत:ला जाणून घेणे कठीण जाते. आर्थिक सल्लागार नसल्यास बचत किंवा गुंतवणूक विशिष्ट ध्येयाने / आर्थिक उद्दिष्टाने प्रेरित नसल्यास विस्कळीत होण्याची दाट शक्यता असते. गुंतवणूक सल्लागाराची गरज का असते याचा परामर्श घेतल्यास बफे यांच्या लेखाच्या सुरुवातीला उद्धृत केलेल्या वचनाचा अर्थ समजून घेता येईल. आपल्या बचतीची कार्यक्षमता वाढवायची असेल तर कौटुंबिक डॉक्टरप्रमाणे एक उत्तम आर्थिक सल्लागार व मार्गदर्शक मग तो ‘आरआयए’ किंवा ‘एमएफडी’च्या रूपात शोधायला हवा. गुंतवणूक मार्गदर्शक असल्याचे फायदे पुढील लेखात जाणून घेऊ.

तळटीप : म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखमींच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाचे माहितीपत्रक कृपया सखोल अभ्यासा.

लेखक व्हाइट ओक कॅपिटल  मॅनेजमेंटचे कार्यकारी संचालक आणि मुख्य परिचालन अधिकारी

bhalchandra.joshi@ whiteoakindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2021 12:02 am

Web Title: financial guidance is needed ria or mfd akp 94
Next Stories
1 बाजाराचा  तंत्र-कल : अखेर बाजार सावरला!
2 रपेट बाजाराची : सावधगिरी हवी
3 गोष्ट रिझर्व्ह  बँकेची : पहिले संचालक मंडळ उत्कृष्ट आणि संतुलित
Just Now!
X