तृप्ती राणे

माधुरीचं लग्न होऊन तीन वर्षं झाली होती. कॉलेजमध्ये तिच्याच वर्गात असणाऱ्या संतोषबरोबर तिने संसार थाटला होता. माधुरीच्या घरची परिस्थिती तशी बेताची. वडील खासगी कंपनीत कामाला होते, तर आई गृहिणी. शिवाय दोन लहान भाऊ. तेव्हा माधुरीने शिकता शिकता शाळेतील मुलांच्या शिकवण्या घेऊन कॉलेज पूर्ण केलं. पुढे शिकायची इच्छा होती पण परिस्थिती नसल्यामुळे नोकरी करावी लागली. पण अतिशय हुशार असल्याने कामाच्या ठिकाणी तिची चांगली प्रगती होत होती. काही वर्ष पैसे साठवले आणि झेपेल तेवढा खर्च करून संतोषबरोबर लग्न केलं.

संतोषसुद्धा मध्यमवर्गीय घरातला होता. पण एकुलता एक आणि वडील सरकारी नोकर. त्यामुळे संतोषवर कधी आर्थिक जबाबदारी नव्हती. कसं-बसं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आणि नोकरी न करता काहीतरी व्यवसाय करायचा निश्चय त्याने केला. स्वभावात फटकळपणा असल्यामुळे त्याच्या व्यवसायाची घडी काही केल्या बसेना. डोकं फिरलं की सगळं टाकून द्यायचा आणि मग शांत झाला की पुन्हा नवीन काही तरी करायचा. घरातल्यांनी अनेकदा समजावलं परंतु तो कोणाचंच ऐकेना. लग्न करायचं ठरलं तेव्हा खरं तर त्याचा हा स्वभाव माधुरीच्या वडिलांना खटकला होता. आणि ते त्यांनी माधुरीला बोलूनसुद्धा दाखवलं, परंतु प्रेमात आंधळ्या झालेल्या माधुरीला वाटलं की लग्नानंतर तो बदलेल. शेवटी मुलीच्या हट्टासमोर वडील नमले आणि लग्न झालं.

नव्याची नवलाई जशी संपली तशी मग माधुरीला जाग आली. संतोष घरी काहीच पैसे द्यायचा नाही. शिवाय कधी कधी तर माधुरीकडून व्यवसायाच्या नावाखाली उसने घ्यायचा. तो नक्की काय करायचा हे तिला कळायचं नाही. कधी विचारलं तर उडत उत्तरं द्यायचा किंवा चिडून निघून जायचा. यामुळे माधुरीकडेसुद्धा बचत होत नव्हती. तिला वाटलं होतं तसा तो काही बदलला नाही. आणि त्याचे आई-वडीलसुद्धा त्याला काही सांगू शकत नव्हते. घरातल्या आर्थिक चणचणीचा माधुरीला त्रास व्हायला लागला आणि याचा परिणाम तिच्या कामावरही होऊ लागला. पुढे काही दिवसांनी तिला दिवस गेले. तिला वाटलं की आता तरी संतोष सुधारेल. पण तसं काहीच न घडता गोष्टी अजून बिघडल्या. बाळ झाल्यावर नोकरी सोडायची इच्छा तिच्या मनात होती. परंतु संतोष तिला तसं करू देईना. घरात तिला काहीच मदत न करता तिचा पगार झाला रे झाला की पैसे घेऊन निघून जायचा. बाळ झाल्यापासून खर्च वाढला होता. पण घरच्या खर्चासाठी माधुरी पैसे मागायला गेली की संतोष टाळाटाळ करायचा आणि नंतर नंतर तर तिला मारूसुद्धा लागला. पुढे तिला कळलं की आपला नवरा काही व्यवसाय वगैरे करत नाही तर छोटी छोटी काम करून जुगारात आणि लॉटरीमध्ये पैसा घालवतो. इतकंच नाही तर त्याची अनेकांची बरीच देणीसुद्धा थकवली आहेत. तिने त्याला समजवायचा प्रयत्न केला, पण शेवटी पदरी निराशाच!

मग स्वत:च्या आणि मुलाच्या भवितव्यासाठी तिने एक महत्त्वाचा निर्णय घेतला – वेगळं व्हायचा! तेसुद्धा संतोषने काही सुखासुखी होऊ दिलं नाही. भलतेसलते आरोप करून तिची केस रद्द होण्यासाठी त्याने बरेच प्रयत्न केले. पण पुढे काही लोकांनी मध्यस्थी करून कसंबसं सगळं प्रकरण मिटवलं आणि एकदाची माधुरी त्याच्या तावडीतून सुटली. पण पुढे काय करायचा हा मोठा प्रश्न तिच्यासमोर आता उभा राहिला होता. सुदैवाने आई-वडील आणि दोन्ही भावंडं तिच्या पाठीशी उभी राहिली आणि माधुरीने तिचं आयुष्य सावरायला सुरुवात केली. बाळाकडे आई लक्ष देणारी होती, म्हणून पूर्वीसारखी लक्ष देऊन नोकरी केली. आणि या वेळी मात्र आर्थिक नियोजन करून हळूहळू आपली गाडी रुळावर आणली. पुढे काही काळानंतर पुन्हा एकदा नवा संसार थाटला. मागच्या चुकांमुळे तिला चांगलाच धडा मिळाला होता. म्हणून या वेळी मात्र तिने संसारासाठी पैसे वापरताना स्वत:ची वेगळी गुंतवणूकसुद्धा  सुरू ठेवली. पुन्हा आपल्यावर अशी परिस्थिती येऊ नये म्हणून तिने काही गुंतवणूक ही फक्त तिच्या एकटीच्या नावावर केली आणि त्यात स्वत:च्या मुलाला ‘नॉमिनी’ म्हणून ठेवलं.

वर सांगितलेली गोष्ट एक महत्त्वाची जाणीव करून देते. आज तरुण जोडप्यांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण वाढलं आहे. अनेकदा मुलीच्या वाटय़ाला नवऱ्याकडून पुरेशी पोटगीसुद्धा येत नाही. त्यामुळे पैशाच्या आणि त्या अनुषंगाने गुंतवणुकीच्या बाबतीत आर्थिक स्वावलंबन हे हवंच. मग ती एखादा व्यवसाय करणारी उद्योजिका असो वा नोकरदार महिला, भरपूर शिकलेली असो की बेताचं शिक्षण घेतलेली असो. कुणावर कधी आणि कशी परिस्थिती येईल हे सांगता येत नाही. तेव्हा प्रत्येक स्त्रीने स्वत:ला आर्थिकरीत्या स्वावलंबी करायलाच हवं. स्वत:ची मिळकत आणि त्यातून योग्य गुंतवणूक ही झालीच पाहिजे. व्यवहार समजलेच पाहिजे. आज स्मार्टफोनमुळे खूप माहिती मिळते. त्यातील योग्य माहितीच्या आधारे स्वत:चं ज्ञान वाढवावं. जोडीदार निवडतानासुद्धा तिने जागरूक राहायला हवं. कुणाच्याही सवयी सहजासहजी बदलत नाहीत. तेव्हा लग्नानंतर सगळं ठीक होईल या अंधविश्वासाखाली न राहता अतिशय वास्तववादी व्हायला हवं. पुढे जर एकटं राहायची वेळ आली तर पैशांची सोय तर करता आली पाहिजे ना! त्यात जर एखाद्या मुलाची जबाबदारी किंवा वरिष्ठ पालकांची जबाबदारी असेल तर हे आणखीच गरजेचं होऊन बसतं.

आताच्या काळातल्या स्त्रियांसाठी काही टिप्स :

१. तुमच्या कमाईवर तुमचं लक्ष असलंच पाहिजे. ‘सगळा व्यवहार माझा नवरा बघतो आणि म्हणून मी त्यात लक्ष घालत नाही’ असं करू नका. तुमचे पैसे कशासाठी, किती आणि कोण वापरतंय याबाबत तुम्हाला माहिती असलीच पाहिजे.

२. काही गुंतवणूक ही दोघात तर काही तुमची एकटीची असली पाहिजे. भले त्याबाबत माहिती तुमच्या जोडीदाराला असू दे, पण त्या पैशावरचा ताबा हा तुमचाच असला पाहिजे.

३. आयुर्विमा हा फक्त घरातल्या कर्त्यां पुरुषाने घ्यायचा असतो असं म्हणणं चुकीचं आहे. जी स्त्री कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीमध्ये मोलाचा सहभाग करते, तिने स्वत:च्या आयुर्विम्याची खरी गरज ओळखून योग्य विमाकवच नक्की घ्यावे.

४. दुर्दैवाने कधी जर संसारातून बाहेर पडावं लागलं किंवा जोडीदाराच्या आकस्मिक मृत्यूमुळे जर पुढचं आयुष्य एकटं काढायची वेळ आली तर मुळात स्वत:चे हक्क नीट समजून मग त्यानुसार नवऱ्याच्या इस्टेटीमधून कायदेशीररीत्या हक्काची मागणी करावी. काही ठिकाणी सासरची मंडळी यात खूप आडकाठी आणतात, परंतु योग्य सल्ला आणि कायदेशीर कारवाई करावी.

५. जेव्हा मोठी रक्कम हातात येत असेल तेव्हा प्रत्येक वेळी स्वत:च्या जोखीम क्षमतेनुसार आणि गरजेनुसार गुंतवणुकीचा आराखडा तयार करावा आणि त्यावर योग्य लक्ष ठेवावं.

६. ज्या स्त्रियांना काही कारणाने नोकरी सोडावी लागत असेल, त्यांनीसुद्धा इतरांवर परावलंबी न राहता आपल्यासाठी वेगळा निधी नक्की तयार ठेवावा.

७. तुमच्या व्यवहारांची माहिती ही एखाद्या विश्वासू व्यक्तीकडे ठेवा. तुमच्या जोडीदाराव्यतिरिक्त तुमच्या आई, वडील/भावंडं, किंवा एखादी जवळची मैत्रीण/मित्र किंवा तुमच्या आर्थिक सल्लागाराला सगळ्या गुंतवणुकीबाबत माहिती असू द्या.

८. तुमच्या प्रत्येक गुंतवणुकीला नामनिर्देशन हे असायलाच हवं. खासकरून जिथे तुम्हाला तुमच्या पश्चात तुमच्या आई-वडिलांची सोय करायची इच्छा आहे.

९. तुम्ही जर तुमच्या मुलावर अवलंबून असाल तर कायदा समजून घ्या, नाहीतर त्याची बायको सगळं घेऊन जायची.

१०.  एकत्र कुटुंबात राहतानासुद्धा स्वत:चा विचार करायला हवा.

आर्थिक स्वावलंबन ही काळाची गरज आहे. तेव्हा मुलीला नुसतं शिकवून तिचं लग्न लावून देऊ नका. तिला तिची गुंतवणूक करायलाही शिकवा. तिच्या मेहेनतीने कमावलेल्या पैशांचं खऱ्या अर्थाने सार्थ तेव्हाच होईल जेव्हा ती स्वत:च्या विवेकबुद्धीने त्यांचा वापर कुटुंबाच्या आणि स्वत:च्या गरजेसाठी आणि सुबत्तेसाठी करेल.

* लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.

trupti_vrane@yahoo.com