|| तृप्ती राणे

सगळे मोठे खर्च पटकन डोळ्यासमोर येतात आणि त्यानुसार नियोजन होतं. परंतु या नियोजनातून काही छोटे परंतु वारंवार होणारे खर्च अलगद निसटून जातात. तथापि या खर्चाबद्दल वेळीच विचार झाला पाहिजे. त्यानुसार तरतूद केली गेली तरच इतर गुंतवणुकीमधून पसे काढायची वेळ येत नाही.

‘‘या वर्षी गणपतीला आपल्याला गावी जायचं आहे बरं का!’’ अण्णा फोन ठेवत म्हणाले.

कुमारने वृत्तपत्रामधून डोकं बाहेर काढलं आणि मान डोलावली – ‘‘हो अण्णा, मला माहीत आहे! मी सगळं नियोजन केलं आहे. सर्वाची तिकिटे काढून ठेवलीत आणि कधी, काय, कोण आणणार हेसुद्धा लिहून ठेवलं आहे. तेव्हा आता बॅग भरो और निकलो!!!’’

त्याला आवरत आई म्हणाली – ‘‘अरे मागच्या रविवारी तुझे काका म्हणत होते की गावच्या घरात थोडं काम करावं लागणार आहे. गिझर गेलाय, नळ गळत आहेत. आणि काही ठिकाणी वायिरग बदलावी लागणार आहे. शिवाय कौलांना लावून १० वर्षे होऊन गेलीत. काही ठिकाणी फुटली आहेत. त्यामुळे ही जर कामं करायची तर त्यासाठी आता काही दिवस गावी जाऊन हे करून घ्यायला हवं. गणपतीच्या आधी सगळं झालेलं हवं!’’

तेवढय़ात कावेरीने नजरेचा इशारा करून कुमारला बाल्कनीत बोलावलं. दबक्या आवाजात कावेरी म्हणाली – ‘‘अहो आता हा काय खर्च? तसंही कोकणात जायचं की हात ढिला सोडावा लागतो, दहाचे वीस द्यावे लागतात. आणि मध्येच असा खर्च करायचा तर आपल्या आर्थिक नियोजनात कसं बसणार? आत्ताशी कुठे जरा घडी बसलीय, तेवढय़ात उपसायला सुरुवात करायची का?’’

तिला शांत करत कुमार म्हणाला – ‘‘अगं मलासुद्धा हे कळतंय. खरं तर या गोष्टींची कल्पना आपल्याला यायला हवी होती. आणि त्यानुसार नियोजन करायला हवं होतं, पण ते राहून गेलं. या वेळी जरा जमवावं लागेल पण पुढच्या वेळेसाठी आपण नियोजन बदलून घेऊ.’’ असं सांगून कुमार परत आत गेला आणि चर्चा संपली. पण या चच्रेतून एक गोष्ट प्रकर्षांने समोर आली आणि ती म्हणजे आर्थिक नियोजन करताना राहून गेलेल्या अनेक छोटय़ा छोटय़ा गोष्टी!

आर्थिक नियोजन करताना सर्वसाधारणपणे यादीत असणारी उद्दिष्टं म्हणजे – मुलांचे शिक्षण, मुलांची लग्न आणि निवृत्ती निधी. या सर्वाची तरतूद झाली की मग नंबर येतो तो गाडी, परदेश प्रवास किंवा एखादा खर्चीक छंद. सगळे मोठे खर्च पटकन असे डोळ्यासमोर येतात आणि त्यानुसार नियोजन सुरू होतं. अशा प्रकारच्या नियोजनातून काही छोटे परंतु वारंवार होणारे खर्च अलगद निसटून जातात. हे खर्च तसे वार्षकि यादीतसुद्धा मोडत नसल्याने त्यांचा विसर पडणं साहजिकच आहे. परंतु यांचा विचार वेळीच झाला तर त्यानुसार तरतूद करता येऊ शकते आणि इतर गुंतवणुकीमधून पसे काढायची वेळ येत नाही. आजचा लेख अशा खर्चाच्या व्यवस्थापनासाठी.

  •  घरातील विद्युत उपकरणे जसं की टीव्ही, वॉिशग मशीन, फ्रीज, मिक्सर, म्युझिक सिस्टीम, इत्यादी गोष्टींना एक वयोमर्यादा असते आणि त्यानुसार त्यांना बदलावं लागतं. काही वर्ष छोटी डागडुजी करून आपण त्यांची कार्यक्षमता वाढवतो, पण नंतर त्यांना बाय-बाय करावा लागतो. तेव्हा यांचाही विचार आर्थिक नियोजनात हवाच.
  •  प्रत्येक राहत्या घराला एका ठरावीक काळानंतर डागडुजीची गरज असते. मग यामध्ये रंगकाम, मॉडय़ुलर किचन, प्लंबिंग, फíनचर सगळंच आलं. हा सगळा खर्च एका वेळी करायचा म्हटला तर मोठा होतो आणि शक्यतो आपण सात-आठ वर्षांत किमान एकदा तरी हा खर्च करतो. कधी कधी तर घरात लग्नकार्य ठरतं तेव्हासुद्धा हा खर्च होतो. तेव्हा आर्थिक नियोजन करताना यालासुद्धा ध्यानात ठेवा.
  •  आपल्या पहिल्या गाडीसाठी आपण नियोजन करतो, पण त्यानंतरच्या गाडीचं काय? आपल्या वापरानुसार आणि आवडीनुसार जर आपण दर पाच वर्षांनी गाडी बदलणार असू तर मग त्याचंसुद्धा नियोजन करायलाच लागणार.
  •  काही कुटुंबामध्ये आजी-आजोबा वेगळ्या घरात राहतात. जरी त्यांचे नेहमीचे खर्च ते सांभाळत असले, तरी घरातील गरजांचे मोठे खर्च कदाचित त्यांना झेपणार नसतील आणि अशा खर्चाची तरतूद जर मुलांच्या आर्थिक नियोजनात नसली तर मग आयत्या वेळी जमवाजमव महागात पडते.
  •  भाडय़ाने दिलेल्या घरांनासुद्धा सांभाळावं लागतं. साधारणपणे पाच वर्षांतून एकदा तरी रंगकामाचा आणि प्लंबिंगचा खर्च होतो. शिवाय इमारत जर खूप जुनी असेल, तर संपूर्ण इमारतीचं काम काढण्यात येतं आणि त्याचा खर्च वाटून घेतला जातो. यासाठी एक नियमित रक्कम इमारत निधीच्या नावाखाली जमवायला काहीच हरकत नाही.
  •  नातलगांच्या लग्नात आहेराचा खर्चसुद्धा बऱ्यापकी होतो. त्यात जर बाहेरगावी लग्न असेल तर खर्च अजूनच वाढतो. कधी मोठं कुटुंब म्हणून खर्च होतो तर कधी मोजकं कुटुंब पण जवळचं नातं म्हणूनसुद्धा होतो. तेव्हा याचीसुद्धा दखल घ्यावी.
  •  जवळच्या नात्यात होणारे आपत्कालीन खर्च. अशा प्रकारच्या खर्चाना टाळतासुद्धा येत नाही आणि यांच्या परतफेडीचा अंदाज घेऊ शकत नाही.

हे सर्व खर्च होतात खरे पण किती किंवा कधी होतील याचा अंदाज बांधणं थोडं कठीण असतं. तेव्हा वरील प्रकारच्या खर्चासाठी एखादा फंड निवडून त्यात नियमित गुंतवणूक करावी. आणि गरजेला लागतील तसे पसे काढावे.

 

trupti_vrane@yahoo.com

(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार)

सूचना :

  • जोखीम क्षमता तपासून, सल्लागाराची मदत घेऊन आणि संपूर्ण माहिती मिळवून मग गुंतवणूक करा. तुमच्या फायद्याची किंवा तोटय़ाची जबाबदारी ही तुमचीच असेल.
  • या सदरात गुंतवणुकीसाठी वापरलेले म्युच्युअल फंड आणि शेअर्स हे उदाहरण म्हणून आहेत. कोणत्याही म्युच्युअल फंडाची किंवा शेअरची शिफारस इथे केली जात नाहीये.
  • सर्व नमूद म्युच्युअल फंड रेग्युलर ग्रोथ प्लानचे असून, यातील काही म्युच्युअल फंड आणि शेअर्स हे माझ्याकडे असतील किंवा घेतले/विकले जातील; परंतु त्यांचा या सदरातील पोर्टफोलिओंच्या कामगिरीशी काहीही संबंध नाही.
  • म्युच्युअल फंडांचे एक्झिट लोड, शेअर खरेदी/विक्रीवर होणारा खर्च आणि कर यांचा विचार या सदरात केलेला नाही. कोणतीही गुंतवणूक करताना या खर्चाचा आणि कर नियमांचा आढावा घ्या.