28 January 2020

News Flash

नियोजन भान : तुम्हाला वार्षिकीची गरजच काय?

निश्चित उत्पन्नाची खात्री असणारेही, आवश्यकता नसताना देखील ‘पंतप्रधान वय वंदन’सारखी मर्यादित कालावधीची वार्षिकी घेतली जाते.

(संग्रहित छायाचित्र)

अनुराधा सहस्रबुद्धे

पुण्यातील वर्षां वैशंपायन ‘लोकसत्ता’च्या वाचक आहेत. त्यांनी ऑक्टोबर महिन्याअखेरीस स्वेच्छेने सेवानिवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी त्यांच्या निवृत्तीपश्चात लाभाचा आणि बचतीचा दिलेला तपशील याप्रमाणे आहे –

*  संचित रजा + भविष्य निर्वाह निधी + ग्रॅच्युइटी (अंदाजे)  ३५ लाख

*  भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), २०२२ मध्ये मुदतपूर्ती   २२ लाख

*  समभाग + समभागसंलग्न म्युच्युअल फंड    १२ लाख

६  एलआयसी विमा, २०२२ पर्यंत  मुदतपूर्तीनंतर मिळणारी रक्कम १८ लाख

*  बँकेच्या + पोस्टाच्या मुदत ठेवी, शेवटची मुदत ठेव ऑक्टोबर २०२२  ८ लाख

त्या लिहितात – ‘सेवानिवृत्तीपश्चात मला ३० ते ३२ हजारांदरम्यान पेन्शन मिळेल. सर्व आर्थिक कर्तव्ये पार पाडली आहेत. माझ्यावर शिल्लक अशी कौटुंबिक जबाबदारी नसल्याने बँकेची पेन्शन आम्हा दोघांच्या खर्चास पुरेशी आहे. खरेदी केलेल्या विम्याचा हप्ता वार्षिक २ लाख २०२१ पर्यंत भरावा लागेल. या व्यतिरिक्त माझ्या १५ हजारांच्या ‘एसआयपी’ सुरू आहेत. उपलब्ध निधी नियमित उत्पन्न मिळविण्यासाठी कशा प्रकारे गुंतवावा हे सांगितलेत तर बरे होईल.’

हा प्रश्न विचारताना त्यांनी उपलब्ध गुंतवणूक साधनांपैकी कोणती वार्षिकी (अ‍ॅन्युईटी) खरेदी करू, असा प्रश्न विचारला आहे. बरेच लोक त्यांना निवृत्तीपश्चात नियमित उत्पन्न देण्यासाठी वार्षिकी (अ‍ॅन्युईटी) खरेदी करतात. वार्षिकी हा एका मर्यादित कालावधीसाठी नियमित रक्कम मिळण्यासाठी केलेला करार असतो. नियमित रक्कम मिळत असल्याने अनेक लोकांना वार्षिकी खरेदी करण्याचा मोह होतो. तथापि तुमच्याकडे महिन्याच्या खर्चासाठी बँकेच्या पेन्शन रूपात मिळणारा स्थिर उत्पन्नाचा स्रोत आहे. तुम्ही लिहिल्याप्रमाणे बँकेकडून मिळणारी पेन्शन तुम्हाला महिन्याच्या खर्चाला पुरेशी असल्याने तुम्हाला वेगळी वार्षिकी खरेदी करण्याची आवश्यकता नाही.

निश्चित उत्पन्नाची खात्री असणारेही, आवश्यकता नसताना देखील ‘पंतप्रधान वय वंदन’सारखी मर्यादित कालावधीची वार्षिकी घेतली जाते. किंवा आजीवन नियमित उत्पन्नाची खात्री असलेल्या ‘जीवनअक्षय’सारख्या वार्षिकी योजनांतून पैसे गुंतविण्याचा अनेकांना मोह होतो. जनसामान्यांमध्ये असलेल्या गैरसमजांचा विचार करायला हवा. ‘डू इट युवर सेल्फ’ गुंतवणूकदारांचा एक प्रकार असतो. या प्रकारचे गुंतवणूकदार हे मित्र, सहकारी, नातेवाईकांनी गुंतवणूक केलेली असल्याने अथवा स्वत:ला माहीत असलेल्या, वाचून माहिती मिळविलेल्या योजनांतून गुंतवणूक करतात. यांच्या गुंतवणुकीत व्यावसायिक सल्लागाराला स्थान नसते. मुख्यत्वे अशा प्रकारचे गुंतवणूकदार वार्षिकी खरेदी करतात. म्हणूनच वार्षिकी खरेदी करण्यापूर्वी त्या संबंधाने काही गोष्टी नव्याने समजावून घेणे आवश्यक वाटते.

*  सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातील फरक :

अल्बर्ट आइनस्टाइन यांनी चक्रवाढ संकल्पनेला जगातील आठवे आश्चर्य मानले आहे. वार्षिकीसारख्या गुंतवणूक साधनात तुम्हाला गरज नसलेली रोकडसुलभता तुम्ही स्वीकारल्याने चक्रवाढ व्याजामुळे मिळणाऱ्या मोठय़ा लाभाला तुम्हाला मुकावे लागते.

*  कर कार्यक्षमता :

वर्षांसनामुळे आपल्या खात्यात जमा केलेले व्याज त्या वर्षांचे उत्पन्न धरून त्यावर करआकारणी होते. जोपर्यंत तुम्हाला वर्षांसनाचा लाभ मिळत आहे तोपर्यंत तुम्हाला त्या रकमेवर प्राप्तिकर भरावा लागेल. ही रक्कम तुम्ही रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडात गुंतविली आणि तीन वर्षांनंतर वार्षिकीच्या दराइतकी (६ ते ६.५ टक्के) रक्कम दरमहा ‘सिस्टेमॅटिक विथड्रॉवल प्लान-  एसडब्यूपी’च्या माध्यमातून काढून घेतली तर ते अधिक कर कार्यक्षम ठरेल. म्हणून वार्षिकी हा प्राप्तिकराच्या दृष्टीने अकार्यक्षम पर्याय आहे.

*  शून्य रोकडसुलभता :

वार्षिकीत एकदा का गुंतवणूक केली की तुम्हाला मुद्दल कधीही काढून घेता येत नाही. भारतात वार्षिकी जास्त लोकप्रिय नाहीत. कारण मुख्य म्हणजे लोकांना रोकडसुलभता हवी असते. त्यामुळे भारतात पंतप्रधान वय वंदन, ज्येष्ठ नागरिक बचत योजना यांसारख्या भांडवल सहा वर्षांनंतर पुन्हा गुंतवणूकदाराला परत मिळणाऱ्या योजनांची लोकप्रियता अधिक आहे.

*  परताव्याचा दर महागाई दरापेक्षा कमी

वार्षिकींचा आणखी एक तोटा म्हणजे ते महागाईशी लढा देत नाहीत. निवृत्तीनंतरही किंमती वाढतच जातील. म्हणूनच निवृत्तीच्या योजनेत महागाईचा परिणाम लक्षात घेण्याची गरज आहे. वर्षां वैशंपायन यांचे उदाहरण घ्यायचे तर त्यांचा मासिक खर्च २५ हजार रुपये आहे. महागाईचा दर ८ टक्के धरल्यास दर दहाव्या वर्षी त्यांचा खर्च दुप्पट होईल. म्हणजे वयाच्या ८०व्या वर्षी त्यांचा मासिक खर्च ८० हजार रुपये असेल. महागाईशी सामना करून त्यांना बचतीची कार्यक्षमता टिकवणे गरजेचे आहे. वार्षिकी पर्यायात समभाग गुंतवणूक वर्ज्य  असल्याने दर वर्षी वार्षिकी बचतीची क्रयशक्ती किमान दोन टक्क्यांनी घटवते. निश्चित उत्पन्न मिळण्याची खात्री की दर वर्षी घटणारी क्रयशक्ती यातून तुम्हाला निवड करायची आहे.

तुमच्या वित्तीय गरजेनुसार तुम्हाला वार्षिकीची गरज नाही. वित्तीय गरज आणि वित्तीय वर्तन यामध्ये असलेल्या दरीमुळे आमच्यासारख्या वित्तीय सल्लागारांची पोटे भरत असतात. तुम्ही तुमचे वर्तन गुंतवणूक गरजेशी सुसंगत ठेवलेत तर तुम्हाला वित्तीय सल्लागाराची निवड करावी लागणार नाही. वार्षिकीचा गुंतवणूक पर्याय म्हणून निवड न करता तुम्ही मालमता विभाजनाद्वारे संपत्तीनिर्मितीचा पर्याय स्वीकारावा. वार्षिक नऊ ते १० टक्के परतावा (नियमित नव्हे) मिळणे शक्य आहे. दरमहा उत्पन्न मिळविण्याऐवजी दर पाच ते सात वर्षांनी भांडवली लाभाचा विनियोग आपल्या मर्जीनुसार करण्याचा विकल्प तुमच्या हिताचा आहे.

(लेखिका पात्रताधारक वित्तीय नियोजनकार आहेत, akswealth@gmail.com ई-मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल)

First Published on September 9, 2019 12:56 am

Web Title: financial planning after voluntarily retirement abn 97
Next Stories
1 बाजाराचा तंत्र कल : भय इथले संपत नाही!
2 नावात काय? : स्टिम्युलस अर्थव्यवस्थेला बूस्टर डोस
3 क.. कमॉडिटीचा : शेअर बाजारातील पडझडीत कमॉडिटी गुंतवणुकीचे महत्त्व
Just Now!
X