News Flash

अर्धा डझन कच्चे लिंबू!  भाग-२

आजच्या दिवसाची वाट सगळ्याच जणी पाहत होत्या.

आजच्या दिवसाची वाट सगळ्याच जणी पाहत होत्या. गेला महिनाभर खूप काम केलं होतं ना! सगळे कागद गोळा केले, एका फाइलमध्ये नीट लावले. आणि मग एक एक यादी करायला घेतली. भरपूर वेळ लागत होता. कुठे काही अडकलं की एकमेकींना व्हॉट्सअपपण करत होत्या. पण काहीही करून सोनल अगरवालने सांगितल्याप्रमाणे आपली यादी तयार ठेवायची हे मात्र नक्की. ठाणे स्टेशन आलं तशा सगळ्या सुगंधाताई आणि सोनलला शोधायला लागल्या. तेवढय़ात धक्काबुक्की करत दोघी जणी आल्या. आज तर चढताना कसरतच होती. ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे लोकलचा नुसता गोंधळ होता. स्टेशन आणि ट्रेनमध्ये माणसं अक्षरश: कोंबली होती. पण तरीही आजची ट्रेन चुकवायची नाही म्हणून सगळ्याजणी जिद्दीने चढल्या होत्या. सोनलने आल्याबरोबर सगळ्यांना मस्त गुड मॉर्निग केलं. पिंजलेले केस नीट करत सुगंधाताई म्हणाल्या, काय सगळी तयारी झाली का? तशा बाकी सगळ्या एकस्वरात मोठय़ाने हो म्हणाल्या. त्यांचा आवाज ऐकून बाकी जणी त्यांना बघून कुजबुजायला लागल्या. तशी आगाऊ  जिग्ना म्हणाली, बघ कशा बघतायेत खडूस कुठल्या. यांची पटर पटर चालू असते तेव्हा कसं? तिला शांत करत सिल्वी म्हणाली, अगं सोड त्यांना. आपण आपल्या कामाला लागूया. सोनलताई, आम्ही सगळ्यांनी याद्या तयार ठेवल्या आहेत. तुम्हाला दाखवू का? सोनलने त्यांच्या कामाचं मनापासून कौतुक केलं आणि म्हणाली, अरे वा! छान. तुम्ही सगळ्यांनी हा टप्पा पार केला आणि तोपण दिलेल्या वेळेत. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना एक एक शाब्बासकी. बरेच जण माहिती गोळा करण्यातच इतके दमतात की पुढे सरकतच नाही. आज करू, उद्या करू असं करण्यात त्यांचे दिवस आणि र्वष कधी निघून जातात हे त्यांनासुद्धा कळत नाही. आर्थिक नियोजन हे एक अतिशय चिकाटीचं काम आहे. चला, आता प्रत्येकीने आपापली माहिती दाखवा बरं, असं म्हणत तिने मीनाक्षीकडे बघितलं. मीनाक्षी लाजत म्हणाली, सोनल दीदी! प्लीज, माझी यादी जोरात नका वाचू. त्यावर जिग्ना लगेच म्हणाली, असं कसं, असं कसं! अरे आपण मैत्रिणी आहोत ना. मग लाजतेस कशाला? आणि असं काय आहे त्या यादीत? सोनल त्यांच्यामध्ये पडत म्हणाली, अरे, हो हो हो! जिग्ना, प्रत्येकाची यादी ही त्याची वैयक्तिक असते. त्यामुळे कुणाला त्याची माहिती असावी हेसुद्धा प्रत्येकाने ठरवायचं असतं. त्यावर मीनाक्षी म्हणाली, नाही असं काही नाही. पण मला माझी यादी थोडी हसू येण्याजोगी वाटली म्हणून म्हटलं. सोनलने पटकन यादी पहिली आणि तिला मीनाक्षीच्या लाजण्यामागचं कारण कळलं. सोनल तिला समजावत म्हणाली, अगं, तुझी यादी छान आहे की. यात काय लाजायचं! आर्थिक उद्दिष्ट हे तीन गोष्टींचं समीकरण असतं. पैसा कशासाठी (स्पष्ट कारण), कधी (स्पष्ट वेळ) आणि किती (स्पष्ट रक्कम) लागणार हे जेव्हा आपण ठरवतो तेव्हा आपलं आर्थिक उद्दिष्ट ठरतं. मग ते शनिवारी शाहरुख खानचा रईस बघणं असो किंवा एक वर्षांनी लग्न करून हनिमूनला जाणं! हे ऐकून खोडकर यास्मिन लाजऱ्या मीनाक्षीला चिमटा काढत म्हणाली, मला माहिती आहे हिच्या यादीत काय आहे ते. नक्कीच हिने तिच्या लग्नाची तयारी केलेली दिसतेय. त्यावर सुगंधाताई म्हणाल्या, अरे वा! मीनाक्षी आपल्या लग्नाचा खर्च तू स्वत: करायचा ठरवला आहेस हे खूप छान. तुझ्यामागे तुझ्या भावाचं शिक्षण आणि वडिलांचा बेताचा पगार या गोष्टींची तू जाणीव ठेवली आहेस हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. तेवढय़ात सोनल सगळ्यांना थांबवत म्हणाली, चला, प्रत्येकीने पटापट द्या बरं आपली उद्दिष्टांची यादी.

सोनलने सगळ्या याद्या सोबत घेतल्या आणि म्हणाली, आता मी यांचा अभ्यास करते आणि प्रत्येकीला माझी प्रतिक्रिया कळवते. इथे मला तुम्हा सर्वाचं कौतुक करायचं की पहिलं पाऊल ठाम उचललंय. तेव्हा याच जोराने आगेकूच करायची आहे. बाकीच्या दोन याद्यांवर आपण पुढच्या वेळी बोलू. चला आता माझी उतरायची वेळ झाली. लवकरच भेटू. गुड डे. आणि खूपशा आशा देत सोनल निघून गेली.

सगळ्याजणी खूश होत्या. आपण काहीतरी चांगलं करतोय ही भावना खरंच फार आनंददायी आणि प्रोत्साहित करणारी असते. सिल्वीने मीनाक्षीचे खूप आभार मानले. दोन शनिवार व रविवार वेळ काढून तिने खूप मदत केली. यास्मिन म्हणाली, चला मीनाक्षीच्या लग्नाचा अहेर गोळा करायला लागा. यावर तिलोत्तमा म्हणाली, काय मॅडम! काय हवं आहे तुम्हाला? स्टीलची भांडी, डिनर सेट की सरळ कॅॅश? हे ऐकून मीनाक्षी कसली लाजली म्हणून सांगू. तिला सावरत सुगंधाताई म्हणाल्या, अरे! नवीन वर्षांत अहेरसुद्धा नवीन असले पाहिजेत. जरा विचार करा. सोनल यापुढे सांगेलच. तोवर सर्वाना टाटा, बाय बाय. आणि असं करत एक एक लिंबू पुन्हा जिद्दीने कामाला लागलं.

टीप : आर्थिक ध्येय ठरवताना महागाईचा आढावा नीट घ्यावा लागतो. नाहीतर खर्चाचे अंदाज खूपच चुकू शकतात. महागाई ही चक्रवाढ दराने वाढते. सरळ दराने नाही. म्हणून आजचा २ लाखांचा खर्च १० वर्षांनी ८% चक्रवाढ दराने ४.३२ लाख होतो ३.६० लाख नाही. काही खर्च जसे – शिक्षण, आरोग्य, उच्च राहणीमान हे सामान्य महागाईच्या तुलनेत जास्त वाढतात. (वरील नमूद व्यक्ती पूर्णपणे काल्पनिक असून आर्थिक नियोजनाच्या कथेत फक्त वेगवेगळ्या व्यक्तिरेखा म्हणून भूमिका साकारत आहेत.)

 

जिग्ना विसारिया (३१ वर्षे) :

जिग्ना नवरा आणि ४ वर्षांच्या मुलाबरोबर भाडय़ाच्या घरात राहते. नवरा एका ब्रोकरकडे कामाला आहे. ही पार्लरमध्ये काम करून स्वत:चं फिरतीचं पार्लरदेखील चालवते. एरवी २०,००० असा पगार मिळतो. पण वरच्या कामांचे १०,००० ते ३०,००० महिनासुद्धा मिळतात. महिन्याच्या शेवटी १०,००० वाचवते. अतिशय बडबडी असल्यामुळे पटापट ओळखी करून काम मिळवते आणि चांगल्या पद्धतीने करूनदेखील देते. तिच्या चाळीच्या आसपासचे लोक तिला हमखास लग्न, साखरपुडा आदी कार्याना रंगरंगोटी करायला बोलावतात. हिला कपडय़ांचा फार सोस आहे. सेल आणि शाहरुख खान हे तिचे जीव की प्राण. महिन्याचा घरखर्च नवरा सांभाळतो आणि गुंतवणुकीचंदेखील तोच बघतो. ही मुलाच्या शिक्षणाचा आणि भविष्यात लागणाऱ्या पैशाची तरतूद करते. मुलाला एमबीए करायचं ठरवलंय दोघांनी. त्यांच्या सध्याच्या गुंतवणुकी आहेत ठेवी, म्युचुअल फंड आणि थोडेसे शेअर. एकच गोष्ट इथे महत्त्वाची आहे. ती म्हणजे जिग्नाच्या नवऱ्याला लवकर श्रीमंत कसं होता येईल याकडे जास्त लक्ष आहे. त्याने शेअर आणि निरनिराळ्या मार्केटिंग स्कीम्समध्ये बऱ्यापैकी पैसा घालवला आहे.

01

तिलोत्तमा बॅनर्जी (३७ वर्षे):

तिलोत्तमाचं कुटुंब मोठं आहे. नवरा, दोन शाळकरी मुलं आणि सासू सासरे यांच्याबरोबर ती राहते. नवरा बँकेत तर ही सरकारी कंपनीत कामाला आहे. स्वत:चा २ बेडरूमचा फ्लॅट आहे. मोठा मुलगा १० वर्षांचा तर छोटा ६ वर्षांचा आहे. महिन्याला हातात ४०,००० येतात आणि साधारणपणे २५,००० महिन्याअखेर वाचतात. शिवाय नवऱ्याचेदेखील पैसे जोडीला असतात. दोघांचे उरलेले पैसे नवरा गुंतवतो. सासू सासऱ्यांच्या औषध-पाण्यामध्ये बऱ्यापैकी पैसा खर्च होतो. सुदैवाने तिला आणि नवऱ्याला पेन्शन असल्यामुळे भविष्याबाबतीत ती थोडी निर्धास्त आहे. सध्या गुंतवणूक म्हणून भविष्य निर्वाह निधी, मुदत ठेवी, सोने, गावचं घर आणि नुकतेच सुरू केलेले थोडेसे म्युच्युअल फंड आहेत. दोन्ही मुलांना उच्च शिक्षण देऊन त्यांची लग्न लावण्याची जबाबदारी तिलोत्तमाने घेतली आहे. घरखर्च आणि सासू सासऱ्यांचा खर्च नवरा सांभाळतो.

02

 

सिल्वी डिसूझा    (४० वर्षे):

सिल्वी अविवाहित आहे. आजारी आईबरोबर भाडय़ाच्या घरात राहते. एका मोठय़ा मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत आहे. महिन्याचा पगार ६०,००० पर्यंत हातात येतो आणि महिन्याच्या शेवटी २५,००० वाचतात. आई आजारपणामुळे अंथरुणाला खिळून आहे. तिला सांभाळायला एक पूर्णवेळ ‘केअर टेकर’ घरी असते. सगळ्याच खर्चाची जबाबदारी हिच्यावर आहे. गोव्याला वडिलोपार्जित घर असल्यामुळे मुंबईत घर घेण्यात तिला रस नाही. सिल्वीला छान राहणे फार आवडते. चांगल्या ब्रँडचे कपडे, परफ्यूम, कॉस्मेटिक्स, चपला, पर्स आणि वीकेंड पाटर्य़ा यावर सिल्वी बराच पैसा खर्च करते. तरीदेखील थोडी गुंतवणूक मुदत ठेवी, भविष्य निर्वाह निधी आणि कोणीतरी सांगितलं म्हणून म्युच्युअल फंडमध्ये केली आहे. सिल्वीची एक इच्छा आहे आणि ती म्हणजे विश्वभ्रमंती.

03

यास्मिन अख्तर (४७ वर्षे) :

यास्मिन तिच्या दोन मुलांबरोबर स्वत:च्या घरात राहते. मुलगा महाविद्यालयात शेवटच्या वर्षांला आहे आणि मुलगी पहिल्या वर्षांला. नवरा दुबईला असतो. त्याचा पगार चांगला आहे. त्यामुळे कुटुंबाची काहीच जबाबदारी हिच्यावर नाही. घरी बसून राहण्यापेक्षा थोडंफार कमावून आपली हौस पूर्ण करायची हेच तिचं ध्येय. शिवाय चारचौघीत वावरलं की दोन-चार नवीन गोष्टी शिकायला मिळतात. म्हणूनच एका खासगी कंपनीत गेली अनेक र्वष रिसेप्शनिस्ट म्हणून थोडय़ा पगारावर जास्त ताण न घेता ती काम करते. पण अतिशय जिज्ञासूवृत्ती असल्यामुळे सतत नवनवीन शिकत असते. यास्मिन एका गरीब कुटुंबातून आलेली आहे. तीन भावांची ही एक बहीण. अतिशय हुशार असल्यामुळे तिच्या वडिलांचा पाठिंबा मिळाला आणि तिने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. सुदैवाने जोडीदारदेखील चांगला मिळाला आणि त्याने तिला नवीन गोष्टी शिकण्यात कधीच आडकाठी केली नाही. तिने लग्नानंतर स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन आणि चिनी या चार भाषांचं रीतसर शिक्षण घेतलं. एवढंच नाही तर दोन्ही मुलांना बारावीपर्यंत कोणतीही शिकवणी न घेता स्वत:च शिकवलं. यापुढे मात्र नवऱ्याबरोबर जग फिरण्याची तिची इच्छा आहे आणि समाजातल्या गरजू स्त्रियांसाठी काहीतरी करावं याचा विचार सुरू आहे. महिन्याचा पगार ४५,००० आणि शिल्लक ३०,००० असा तिचा जमाखर्च. सध्या हिने भविष्य निर्वाह निधी, मुदत ठेवी, आवर्ती ठेव आणि सोन्यामध्ये गुंतवणूक केली आहे. नवरा त्याच्या व्यवहारांबद्दल फारसं काही हिला सांगत नाही. फक्त एवढीच शाश्वती दिली आहे की कुटुंबाला कधीच काहीच कमी पडणार नाही आणि हिच्या पैशाचं काय करायचं हे हिने ठरवावं.

04

 

सुगंधा शेलार   (५२ वर्षे):

सुगंधाताई या कंपूमधल्या सर्वात ज्येष्ठ. सर्वसामान्य मराठी स्त्री म्हटल्यावर जी बाई आपल्या डोळ्यासमोर उभी राहते अगदी तशीच ठेवण सुगंधाताई यांची आहे. कपाळावर मोठी टिकली, कॉटनची साडी, सुतरफेणी केसांचा अंबाडा. त्यांच्या या सामान्य दिसण्यामागे एक अतिशय धोरणी व्यक्तिमत्त्व आहे. ताईंचं माहेर कोकणात. मराठी शाळेत शिक्षण. घरात आणि शेतात मदत करून कशीबशी शाळा पूर्ण केली. पण घरची गरिबी असल्यामुळे पुढचं शिक्षण काही घेता नाही आलं आणि त्यांनादेखील फारसा रस नव्हता.

अवघ्या २०व्या वर्षी लग्न करून पहिल्यांदा मुंबईत आल्या तेव्हा गिरगावात वन रूम किचनच्या चाळीतल्या घरात शेलार दाम्पत्याचं मोठं कुटुंब राहत होतं. सासू, सासरे, २ दीर, १ नणंद आणि ही दोघं. त्या जरी कमी शिकल्या तरी त्यांच्याकडे व्यवहारज्ञान मात्र भरपूर होतं. आणि म्हणूनच नवऱ्याच्या पगाराला सोबत म्हणून घरी बसून उद्योग करायला सुरुवात केली. आधी जेवणाचे डबे करायच्या. मग हळू हळू त्यांच्या लक्षात आलं की या उद्योगाला वाढवायची ताकद त्यांच्याकडे नव्हती. मग त्यांनी मसाले बनवायला सुरुवात केली. आधी घरी मग छोटय़ा भाडय़ाच्या जागेत आणि नंतर मुंबई उपनगरात स्वत:चा कारखाना असा प्रवास करत गेली २० वर्षे कधी मागे सरली हे त्यांना कळलं नाही. या प्रवासात नवऱ्याने त्यांना साथ दिली. पण १० वर्षांपूर्वी अचानक एका अपघातात ते गेले.

पण फार दिवस दु:ख न करता ताई परत उभ्या राहिल्या आणि कारखाना व कुटुंब दोन्ही सांभाळत पुढे आल्या. मुलगीही शिकून नोकरीला लागली. आता ताई वाट पाहताहेत ते तिच्या लग्नाची. ताईंना महिन्याभरात कारखान्यातून होणारा नफा ८०,००० ते १,२५,००० रुपये असतो. घरखर्च काढल्यावर साधारणपणे ६०,००० ते १,२०,००० शिल्लक राहतात. आतापर्यंत त्यांची गुंतवणूक भविष्य निर्वाह निधी, मुदत ठेवी, आवर्ती ठेवी, सोने आणि भाडय़ाने दिलेल्या घरामध्ये आहे.

05

मीनाक्षी नायर (२५ वर्षे) :

मीनाक्षी ही आई, वडील आणि भावाबरोबर राहते. एका खासगी बँकेमध्ये खाते उघडायचं काम करते. हातात साधराणपणे २५,००० रुपये येतात. सध्या सगळा पगार वडिलांच्या हातात देते आणि मग ते खर्चाला देतील तेवढय़ाच पैशात महिना काढते. अजिबात इकडे तिकडे खर्च करत नाही. आणि ऑनलाइन खरेदीपासून तर लांबच राहते. तिची राहणी अतिशय साधी आ हे. तिचे वडील तिचा सगळा पैसा बँकेत ठेवतात. खूप मुदत आणि आवर्ती ठेवी काढून ठेवल्या आहेत.

06

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2017 1:49 am

Web Title: financial planning and analysis
Next Stories
1 पोर्टफोलिओेला नव्या पिढीचा पैलू!
2 घाली लोटांगण, वंदी चरण..
3 वाटा गुंतवणुकीच्या
Just Now!
X