किरण लाळसंगी

संकटच जागतिक आहे व नुकसान त्यामुळेच होत आहे आणि त्यासाठी माझी काहीच जबाबदारी नाही, असे आपण किंवा इतरांना वागताना पाहिले असेल. मात्र अशा बिकट परिस्थितीतून जात असताना आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. आपले आर्थिक नियोजन – कमाई, बचत व गुंतवणूक या गोष्टी जाणीवपूर्वक शिकल्या पाहिजेत.

संकटामुळे  आपले व्यक्तिमत्व घडते. अनेक प्रसंगी आहे तसे राहते अथवा बिघडते. त्याचप्रमाणे आपल्या आर्थिक व्यक्तिमत्वाचेही असते. वर्तमानातील संकटामुळे आपण ज्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक समस्या अनुभवत आहोत त्या नव्याने विचार व चिंतन करण्यास भाग पाडत आहेत. प्रस्तुत लेखात आपण या परिस्थितील आर्थिक वर्तन समस्या व उपाय पाहणार आहोत.

सध्याची टाळेबंदी आणि संसर्गाची भीती यामुळे थांबलेली कामे, गेलेले रोजगार, कोसळलेला शेअर बाजार आणि व्यापारातील नुकसान यामुळे एक निराशेचे वातावरण तयार झाले आहे. ज्या लोकांचे आर्थिक व्यक्तिमत्व, आर्थिक वर्तन हे गुंतवणुकीचे किंवा बचतीचे होते ते लोक आर्थिक संकटासाठी तयार होते. पण आर्थिक नियोजन नसणारे व गरीब लोक यामुळे खूप प्रभावित झाले.

आर्थिक नियोजन न करण्याची काही मनोवैज्ञानिक कारणे असतात. काही आपल्या आर्थिक संस्कारातून आलेली असतात तर काही स्वानुभवातून विकसित होत आलेली असतात. आपल्या आर्थिक वर्तनामागे कार्यकारण भाव असतो. आपले वर्तन बऱ्याचदा जाणीवपूर्वक घडत असते (कॉन्शस बिहेव्यर) तर बऱ्याचदा ते अजाणतेपणे घडत असते (अनकॉन्शस बिहेव्यर).

आर्थिक बाबतीत मनोवैज्ञानिक संरक्षण यंत्रणा (सायकॉलॉजिकल डिफेन्स मेकॅनिझम) म्हणजे अशी मनोवैज्ञानिक रणनिती की, ज्या कारणामुळे एखाद्या व्यक्तीला अस्वीकार्य विचार, भीती किंवा चिंता अशा भावना उद्भवतात. अशा परिस्थितीत त्या भावना व चिंता दूर ठेवण्यासाठी आपले सुप्तमन अचेतपणे वर्तन घडवून आणते जे सचेत मनाला माहितीही नसते.

आपले सुप्तमन चिंता किंवा अपराधाच्या भावनांपासून आपले संरक्षण करण्यासाठी संरक्षण यंत्रणेचा (डिफेन्स मेकॅनिझमचा) वापर करते जे समजणे खूप अवघड असते.

आपण माहिती आणि तंत्रज्ञानाच्या अशा काळात आहोत की आपल्याला हवी ती माहिती, ज्ञान व तज्ज्ञ मंडळी शोधता येऊ  शकतात व स्वत:मध्ये बदल घडवून आणता येऊ  शकतो.

काही गोष्टी शिकून  आपण त्या बदलूही शकतो. याची काही उदाहरणे :

* वास्तव नाकारणे : या प्रकारात आर्थिक समस्या नाकारली जाते व आर्थिक संकटाचे आपल्या जीवनावर परिणाम होणारच नाही असे मानले जाते. उदाहरणार्थ, करोना संकटाचे आपल्या जीवनावर आर्थिक बाबतीत परिणाम होणार आहे हे वास्तव बरेच जण सुरुवातीला नाकारत होते.

* भावना दडपणे/भविष्यावर सोडून देणे : संकट आले तरी आत्ता लगेच आर्थिक नियोजनाच्या बाबतीत चिंता करण्याची गरज नाही. बघू पुढचे पुढे.

* काही भावना व वास्तव सतत अमान्य केले व त्या वास्तवाची भीती वाटत असते तेंव्हा आपले वर्तन सुप्त मनाद्वारे नियंत्रित केले जाते. उदाहरणार्थ, काही लोक आर्थिक बाबींसंदर्भात चर्चा, बातम्या, व्याखान, मालिका किंवा पुस्तक समोर आले तरी टाळून निघून जातात. कारण अशा गोष्टींमुळे आर्थिक जबाबदारी टाळून चिंतेमुळे सुप्त मनाद्वारे वर्तन नियंत्रित होते व ताण आणणाऱ्या गोष्टी टाळल्या जातात. अशा लोकांना आपण असे का वागतो याची जाणिवही नसते.

* विरुद्ध वर्तन : काही लोक आपल्याला जे सर्वात आवश्यक असते त्याच्या अगदी विरुद्ध वागतात. उदाहरणार्थ, बचत करण्याची गरज असते पण ती व्यक्ती खर्च करत असते. गुंतवणुकीचे पैसे अनावश्यक गोष्टीसाठी खर्च केले जातात.

* काही लोक आर्थिक चुकांची जबाबदारी न स्वीकारता इतरांना त्यासाठी जबाबदार मानून त्यांच्यावर राग काढला जातो. उदाहरणार्थ, स्वत: पैसे साठवू न शकल्याचा राग कुटुंबातील व्यक्तींवर काढणे.

* काही लोक स्वत:ला जबाबदार न धरता इतर गोष्टींना जबाबदार मानतात व युक्तिवाद करतात. उदाहरणार्थ, हे जागतिक संकट आहे त्यामुळे हे नुकसान झाले आहे त्यासाठी माझी काहीच जबाबदारी नाही.

वरीलपैकी आपणही असे वागत असतो किंवा इतरांनाही आपण असे वागताना पाहिले असेल. अशा बिकट परिस्थितीतून जात असताना आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की, आपले आर्थिक वर्तन व आर्थिक व्यक्तिमत्वही अशा समयी बदलले पाहिजे. आपण आपल्या वागण्याची जबाबदारी घेतली पाहिजे.

आपल्या आर्थिक नियोजन — कमाई, बचत व गुंतवणूक या गोष्टी जाणीवपूर्वक शिकल्या पाहिजेत. जाणकारांची, तज्ज्ञांची किंवा मित्रांची मदत घेतली पाहिजे. आपल्या सवयी जाणीवपूर्वक बदलल्या पाहिजेत.

चार पायऱ्या आपण समजल्या पाहिजेत.

१) आपल्या आर्थिक वर्तनांत सुधारणा करणे गरजेचे आहे हे मान्य करावे लागेल.

२) त्याची कारणे शोधावी लागतील.

३) त्यावरती उपाय शोधावे लागतील.

४) आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळविता येऊ  शकते.

(लेखक पुणेस्थित प्रशिक्षक आहेत.)