04 December 2020

News Flash

नियोजन भान : सुविनियोगात समृद्धी

वेगवेगळ्या वित्तीय ध्येयांसाठी करावयाची तरतूद वर्तमानात अवास्तव वाटली तरी भविष्यात इतकी रक्कम जमविणे सहज शक्य आहे.

(संग्रहित छायाचित्र)

अनुराधा सहस्रबुद्धे

वाचकांच्या येणाऱ्या ईमेल संदेशांपैकी बहुतांश मेल आपली आर्थिक तरतूद त्रयस्थ सल्लागाराकडून तपासून पाहण्याच्या उद्देशाने आलेल्या असतात. त्रयस्थ गुंतवणूक सल्लागाराकडून आपल्या आर्थिक तरतुदी तपासून घेतल्याने तरतुदींमधील चुका कळून येतात आणि आवश्यक असल्यास सुधारण्याची संधी मिळते. पुण्याच्या आनंद जोशी यांची ई-मेल आजच्या सदरासाठी निवडली आहे. आनंद (३४), रेवती (३२) व मुलगी मेखला (२) असे हे कुटुंब आहे. आनंद पुण्यातील खासगी बँकेत नोकरी करतात. रेवती राष्ट्रीयीकृत बँकेत अधिकारी पदावर आहेत.

सध्या राहात असलेल्या घरासाठी त्यांनी संयुक्तरीत्या कर्ज काढले असून या गृहकर्जापैकी १२ लाखाची परतफेड शिल्लक आहे. आनंद आणि रेवती यांच्या उत्पन्नाशी कर्जाचे प्रमाण २० टक्के आहे. आनंद आणि रेवती या दोघांनाही प्रत्येकी तीन लाखांच्या आरोग्य विम्याचे छत्र आपापल्या बँकांतून मिळाले आहे. म्हणजे, आनंद, रेवती आणि मेखला यांना सहा लाखांचे आरोग्य विम्याचे संरक्षण लाभले आहे. आनंद यांच्याकडे एक कोटीचा मुदतीचा विमा असून रेवती यांनी एंडोमेंट आणि मनीबॅक प्रकारातील सात विमा योजना घेतल्या आहेत. आनंद हे अतिरिक्त आरोग्य विमा खरेदी करण्याच्या विचारात आहेत.

जोशी कुटुंबीयांना सल्ला

जोशी कुटुंबात आर्थिक निर्णय दोघांचा असतो. जोशी कुटुंबाने एक गोष्ट अधोरेखित केली की, कितीही आग्रह झाला तरी विम्याच्या योजना गुंतवणूक म्हणून विकत घेणार नाही. रेवती या कमावत्या व्यक्ती असल्याने, कुटुंबासाठी करावयाच्या आर्थिक तरतुदीत त्यांचा समान वाटा असणार आहे.

– रेवती जोशी यांनी एक शुद्ध विमा खरेदी करावा. एलआयसीने नव्याने उपलब्ध करून दिलेल्या ‘जीवन अमर’ या मुदतीच्या विम्याच्या हप्त्यात स्त्रियांना विशेष सूट असल्याने हप्ता कमी बसतो. मुदतीचा विमा खरेदी करताना या योजनेचा प्राधान्याने विचार करावा.

– रेवती यांचे ‘एनपीएस’ खाते आहे तर आनंद यांचे ‘एनपीएस’ खाते नाही. करबचतीसाठी करावयाच्या गुंतवणुकीत दीड लाखांव्यतिरिक्त ‘एनपीएस’मधील ५० हजार गुंतवणुकीवर अतिरिक्त कर बचत होते. बचतीला कर कार्यक्षम करण्यासाठी आनंद यांनी ‘एनपीएस’ खाते उघडणे आवश्यक आहे.

– सध्याच्या परिस्थितीची वास्तविकता अशी की, आजच्या जीवनशैलीमुळे कर्करोग होण्याची शक्यता वाढली आहे. कर्करोगाचे १०० हून अधिक प्रकार असून शरीराच्या कोणत्याही भागात आणि कोणत्याही वयात या रोगाची बाधा होऊ शकते. कर्करोग होण्याची शक्यता बरीच वाढली असताना, अलीकडच्या काळात संशोधनामुळे हा रोग आटोक्यात आला आहे हे मान्य, तरी कर्करोगाच्या उपचारासाठी किती तरी जास्त खर्च करावा लागतो आणि माणसाची संपूर्ण जीवनभराची पुंजी संपून जाण्याची शक्यात आहे. म्हणूनच कर्करोगाविरुद्ध सर्वसमावेशक वैद्यकीय विमा काढणे ही काळाची गरज बनली आहे. जरी आज बाजारात उपलब्ध असणाऱ्या बहुतेक आरोग्य विमा पॉलिसींमध्ये कर्करोगासह जवळजवळ सर्व गंभीर आजारांचा समावेश आहे. परंतु ही पॉलिसी सामान्यत: केवळ भारतातील रुग्णालयात भरती आणि उपचारांसाठी देतात. व्यापक वैद्यकीय विमा (सामान्यत: ‘फ्लोटर’ पॉलिसी ज्यात आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा समावेश असतो) विविध प्रकारच्या वैद्यकीय समस्यांची काळजी घेण्यासाठी विमा संरक्षण असते. तथापि, अशा पॉलिसीद्वारे मिळणारे विमा संरक्षण वेगवेगळ्या परिस्थितीत देय असलेल्या रकमेच्या उप-मर्यादेसह येतो. गंभीर आजाराचा विमा ही समस्या सोडवते. गंभीर आजाराच्या विमाछत्राचा उद्देश विशिष्ट रोगांसाठी आवश्यक असलेल्या महागडय़ा उपचारांच्या खर्चासाठी संरक्षण देणे हा असला तरी या पॉलिसीच्या तुलनेत कॅन्सर कव्हर पॉलिसी तुलनेने स्वस्त असल्याने ही पॉलिसी घेणे आवश्यक आहे. एलआयसीची ही पॉलिसी आधी खरेदी केलेल्या एलआयसी पॉलिसीच्या काही अटी आणि शर्तीच्या अधीन राहून खरेदी करता येते.

– सध्याचे जीवन हे धकाधकीचे झालेले आहे. हल्ली आपण आपल्या आरोग्याकडे काहीसे दुर्लक्ष करू लागलो आहोत. ‘आरोग्यम् धनसंपदा’, ‘आरोग्य हीच खरी संपत्ती आहे’ हे नेहमीच ऐकायला मिळणारे पण तितकेच खरे असलेले बोधवाक्य आपण लहानपणापासून ऐकतो. आरोग्य ही आयुष्यातील सर्वात मोठी पुंजी असते. चांगले आरोग्य राखण्यासाठी प्रसंगी सोने, चांदी, संपत्ती अनाठायी खर्च होण्याची शक्यता असल्याने ‘क्रिटिकल केअर पॉलिसी’सारख्या महागडय़ा उपचारांना विमा संरक्षण प्रदान करणारी पॉलिसी तरुण वयात घेणे कधीही चांगले.

वेगवेगळ्या वित्तीय ध्येयांसाठी करावयाची तरतूद वर्तमानात अवास्तव वाटली तरी भविष्यात इतकी रक्कम जमविणे सहज शक्य आहे. तुमच्या सेवानिवृत्तीपर्यंत पुढील २८ वर्षे, दरमहा २८ हजारांची नियोजनबद्ध गुंतवणूक केल्यास सेवानिवृती पश्चात खर्चाची तरतूद करता येईल. आपल्याकडे पुरेशी रोकडसुलभता असल्याने सर्व वित्तीय ध्येयांची पूर्तता होणे शक्य आहे.

जोशी कुटुंबीयांचे मासिक अंदाजपत्रक

आनंद यांचे वजावटपश्चात वेतन १,०३,०००

रेवती यांचे वजावटपश्चात वेतन  ३५,०००

गृह खर्च  ३५,०००

गृहकर्जाचा हप्ता २१,०००

वाहन कर्जाचा हप्ता  ७,०००

विम्याचा हप्ता  २,०००

इतर खर्च ५,०००

बँकेत सुरू आवर्त ठेव     २२,०००

शिल्लक   ४६,०००

जोशी कुटुंबीयांची वित्तीय ध्येये

दोन ते पाच वर्षे अपेक्षित खर्च

एखादा परदेशी प्रवास ६,००,०००

गृहकर्ज फेड (१२ लाख)  ३,००,०००

मेखलाचा दहावीपर्यंतचा खर्च    ३,००,०००

पाच ते दहा वर्षे अपेक्षित खर्च

मेखलाच्या शिक्षणाची तरतूद    ५,००,०००

दहा वर्षांपश्चात मेखलाचे पदव्युत्तर शिक्षण ५,००,०००

मेखलाच्या लग्नाची तरतूद ५,००,०००

आनंद आणि रेवती यांच्या निवृत्तीपश्चात खर्चाची तरतूद ५००,००,०००

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2019 1:40 am

Web Title: financial provisions term insurance scheme abn 97
Next Stories
1 थेंबे थेंबे तळे साचे : डेट म्युच्युअल फंड निवडताना..
2 कर बोध : दीर्घमुदतीच्या शेअरच्या विक्रीवर करआकारणी
3 अर्थ वल्लभ : दिवाळी विशेष
Just Now!
X